facebook
Sunday , April 30 2017
Breaking News
Home / Uncategorized / शिवाजी स्टेडियमच्या खेळपट्टीचे तीन-तेरा

शिवाजी स्टेडियमच्या खेळपट्टीचे तीन-तेरा

शहरातील एकमेव क्रिकेट मैदान असलेल्या शिवाजी स्टेडियमवरील खेळपट्टीचे तीन-तेरा झाले आहेत. मैदानावर क्रिकेटची खेळपट्टी होती, असे सांगण्याची वेळ आली आहे. खेळपट्टीची निगा राखण्याचे, काळजी घेण्याची कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे आज ही स्थिती निर्माण झाल्याचे दिसत आहे. यावर शहरातील क्रिकेट खेळाडूंनी अतिशय नाराजी व्यक्त केली असून, लवकरात लवकर खेळपट्टी नव्याने तयार करून घेण्याची गरज या व्यक्त केली आहे. दरम्यान, खेळपट्टी रोलिंग करून दुरुस्त होईल, असे मत क्रीडाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. मात्र, खेळपट्टीची अवस्था पाहता केवळ रोलिंग करून ती दुरुस्त होईल, असे दिसत नाही.

कोल्हापुरातील शिवाजी स्टेडियमवरची खेळपट्टी लेदर बॉलवरील खेळासाठी खूप नावाजलेली होती. मैदानावर रणजी सामनेही झाले आहेत. कपिल देव, सचिन तेंडुलकर, अझर, संजय मांजरेकर, विनोद कांबळी ऋषिकेश कानिटकर यांसारख्या खेळाडूंनी शिवाजी स्टेडियमवर सामने खेळले आहेत. सध्या या मैदानाची आवस्था पाहिली, तर मोठाच काय एखादा नवोदित क्रिकेटपटूही मैदानावर खेळण्याची इच्छा व्यक्त करणार नाही.
खेळपट्टी हा क्रिकेटचा गाभा मानला जातो. खेळपट्टीच्या दर्जावरच मैदानाचा दर्जा ठरतो. शिवाजी स्टेडिमयवर आता खेळपट्टी शोधावी लागते. सध्या मैदानावर फुटबॉलचे खेळाडू सराव करतात. यापूर्वीही इतर खेळांची मुले येथे सराव करायची. पण, त्यावेळी खेळपट्टीच्या संरक्षणासाठी बांबू आणि दोरीच्या साह्याने बॅरिकेटिंग केले जायचे. पावसाळ्यात खेळपट्टीच्या सुरक्षेसाठी कोणतेही नियोजन न केल्याने खेळपट्टीच नाहिशी झाली आहे. मैदानावर गेल्या फेब्रुवारीमध्ये सर्वांत मोठी स्पर्धा झाली होती. हॉटेल कर्मचाऱ्यांनी टेनिस बॉल स्पर्धाही याच मैदानावर याच खेळपट्टीवर झाली होती. सध्याची खेळपट्टी पाहता भविष्यात लवकर येथे एखादा क्रिकेट सामना पाहायला मिळेल, अशी आशा बाळगणे शहाणपणाचे ठरणार नाही. खेळपट्टीची दुरुस्ती करायची असल्यास, आता मुळापासून सुरुवात करावी लागणार असल्याचे मत क्रिकेटपटू व्यक्त करत आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ आणि तज्ज्ञांची गरज भासणार असल्याचे क्रिकेटपटू सांगतात.

क्रिकेटपटूंनीच उभारले मैदान

शिवाजी स्टेडियमच्या उभारणीत कोल्हापुरातील जुन्या खेळाडू आणि क्रीडाप्रेमींचा मोठा वाटा होता. कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनची स्थापना करण्यात मोलाचा वाटा असलेले बापूसाहेब खराडे, बाळासाहेब खराडे आणि जयसिंगराव कुसाळे यांनी एकत्र येत शिवाजी स्टेडियमची खेळपट्टी तयार केली होती. दिवंगत क्रिकेटपटू पॉली उम्रीगर यांना तीन महिन्यांत खेळपट्टी तयार करतो, असे सांगून या तिघांनी इतरांच्या मदतीने खेळपट्टी तयार करून घेतली होती. मात्र, याच खेळपट्टीचे नुकसान झालेले पाहून दुःख होत असल्याची भावना ज्येष्ठ क्रिकेटपटू सदा पाटील यांनी व्यक्त केली.

क्लाइव्ह लॉइड यांच्याकडूनही कौतुक

वेस्ट इंडिजचा संघ १९८३ मध्ये भारत दौऱ्यावर आला होता. त्यावेळी अध्यक्षीय संघासोबतचा सामना कोल्हापूरच्या शिवाजी स्टेडियमवर झाला होता. कोल्हापुरात झालेल्या मोठ्या सामन्यांपैकी तो एक सामना होता. त्यावेळी क्लाइव्ह लॉइड यांनी कोल्हापूरच्या खेळपट्टीचे कौतुक केले होते. भारतातील चांगल्या खेळपट्ट्यांपैकी ही एक खेळपट्टी असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले होते.

सगळ्या खेळाडूंना पायाभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत. त्यात क्रिकेटसाठी चांगली खेळपट्टी मिळायला पाहिजे. क्रीडाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन खेळपट्टी नव्याने तयार करण्याचे नियोजन करावे. तसेच ही खेळपट्टी सांभाळण्याकडेही लक्ष द्यावे. मैदानावर होणाऱ्या इतर कोणत्याही खेळाला आमचा विरोध नाही.

– सदा पाटील, क्रिकेटपटू

फुटबॉलचा सराव करणाऱ्या मुलांमुळे खेळपट्टी खराब झाली आहे. रोलिंग करून ती पुन्हा दुरुस्त करता येईल. येत्या महिन्याभरात खेळपट्टीची दुरुस्ती करून घेण्याचे नियोजन आहे. त्यानंतर खेळपट्टीला बॅरिकेटिंग करणार आहोत. जेणेकरून पुन्हा खेळपट्टी खराब होऊ नये.

– माणिक वाघमारे, जिल्हा क्रीडा अधिकारी

शिवाजी स्टेडियमच्या खेळपट्टीवर कोल्हापुरातील सगळ्यात चांगले गवत आहे. त्यावर खूप वर्षांपासून चांगले काम झाले होते. पण, आता खेळपट्टीसाठी मुळापासून सुरुवात करावी लागणार आहे. त्याचबरोबर खेळपट्टी झाल्यानंतर पावसाळ्यात किंवा इतर खेळांसाठी मुले मैदानावर आल्यानंतर खेळपट्टी झाकून ठेवण्यासाठी एखादा लोखंडी ट्रे तयार करावा.

– सचिन केसरकर, क्रिकेटपटू

 

Check Also

राष्ट्रवादीला जबर फटका

स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून दिल्या जाणाऱ्या सहा जागांचे निकाल आज जाहीर झाले असून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *