facebook
Saturday , December 10 2016
Home / जळगाव / डोक्यातून शिरलेली गोळी गालात अडकली
gun

डोक्यातून शिरलेली गोळी गालात अडकली

कौटुंबिक वाद आणि पूर्ववैमनस्यातून जळगावच्या आंबेडकरनगरमध्ये गुरुवारी मामा-भाच्यावर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात मामा चंद्रमणी तायडे यांच्या डोक्यात, तर भाचा गोविंद सोनवणे यांच्या छातीवर गोळी झाडण्यात आली होती. तायडे यांच्या डोक्यातून गेलेली गोळी गालात अडकली असल्याने त्यांना उपचारार्थ मुंबईला हलविण्यात आले आहे. पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे, तर उर्वरित तिघांचा शोध चालू आहे.

आंबेडकरनगरात गुरुवारी रात्री गोविंदा सोनवणे यांच्या घरासमोर सोनवणे यांच्यासह चंद्रमणी तायडे, दीपक पवार, राहूल सोनवणे टीव्ही बघत होते. यावेळी सतीश गायकवाड, सचिन सैंदाणे, शोभा गायकवाड, पद्माबाई गायकवाड, प्रकाश गायकवाड, लक्ष्मी सैंदाणे हे सहा संशयित रिक्षातून आले. सतीश गायकवाड याने गोविंद सोनवणे यांच्या छातीत, तसेच हातावर गोळी झाडली, तर सैंदाणे याने चंद्रमणी तायडे यांच्या डोक्यात गोळी घातली. ही गोळी तायडे यांच्या डोक्यात मागच्या बाजूने घुसली. त्यामुळे चंद्रमणी रक्ताच्या थारोळ्यात पडले. हल्ल्यामुळे संपूर्ण घरात अंगणात रक्ताचा सडा पडला होता. आवाज ऐकून आंबेडकरनगरातील नागरिक सोनवणे यांच्या घराकडे धावत आले. तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले होते. बेशुद्ध अवस्थेत असलेले चंद्रमणी तायडे व गोविंदा सोनवणे यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. चंद्रमणी यांच्या डोक्याचा एक्सरे काढल्यानंतर गोळी डोक्यातून आत शिरून गालात अडकल्याचे निष्पन्न झाले. त्यांना रातोरात मुंबई येथील एम. के. हॉस्पिटलला उपचारार्थ हलविण्यात आले, तर गोंविदा सोनवणे यांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.
घटनास्थळाची पाहणी

घटनेनंतर शुक्रवारी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. जे. डी. सुपेकर, अपर पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, डीवायएसपी सचिन सांगळे व शनिपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक आत्माराम प्रधान यांनी आंबेडकरनगरातील गोंविद सोनवणे यांच्या घरी जाऊन पाहणी केली. संशयित रिक्षांतून (एमएच १९ व्ही ९१५०, एमएच १९ व्ही ९३०८) आले होते.

तिघांना अटक

सहा हल्लेखोरांपैकी सतीश गायकवाड, शोभाबाई गायकवाड, पद्माबाई गायकवाड या तिघा संशयितांना काही तासांतच शनिपेठ पोलिसांनी अटक केली. सचिन सैंदाणे, लक्ष्मी सैंदाणे, प्रकाश गायकवाड यांच्या शोधासाठी शनिपेठ पोलिसांची दोन पथके पाचोरा व धरणगांवला रवाना झाली आहेत.

हद्दपारीचे प्रस्ताव

सतीश गायकवाड व गोविंद सोनवणे या दोन गटांमध्ये नेहमीच वाद होत असल्याने त्यांच्याविरूध्द गणेश उत्सवादरम्यान हद्दपारीचे प्रस्ताव शनिपेठ पोलिस स्टेशनतर्फे पोलिस अधीक्षक कार्यालयात पाठविण्यात आले होते मात्र, त्यावर कार्यवाही करण्यात आली नव्हती, अशी माहिती समोर येत आहे.

Check Also

aawaz-news-image

‘पोलिसांची भीती मनातून काढून टाका’

आवाज न्यूज नेटवर्क – जळगाव – कायदा वा नियम हे समाजाच्या भल्यासाठीच असून, त्यांचे जो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *