facebook
Thursday , April 27 2017
Breaking News
Home / जळगाव / जळगावमध्ये वादळी पावसाने नुकसान

जळगावमध्ये वादळी पावसाने नुकसान

जळगाव जिल्ह्यात सलग आठव्या दिवशी परतीच्या पावसाने हजेरी लावली असून, नदी व नाले तुडूंब भरून वाहू लागले आहेत. शुक्रवार व शनिवार या दोन दिवसांत जळगाव तालुक्यात झालेल्या वादळी पावसामुळे अनेक हेक्टरवरील केळी, कापूस व सोयाबीनचे नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाचा मुक्काम वाढणार असल्याची शक्यता वेधशाळेने व्यक्त केली आहे.

जळगाव तालुक्यातील भोकर, किनोद, कानळदा, गाढोदा, कठोरा, भादली, चोपडा तालुक्यातील खेडीभोकरी, मंगरूळ आणि धरणगाव तालुक्यातील काही गावांमध्ये शुक्रवारी संध्याकाळी वादळी पावसाने हजेरी लावली. यामुळे केळी व कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे. शनिवारी दुपारीदेखील जिल्ह्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे ऐन कापणीवर आलेले केळीचे पीक जमीनदोस्त होऊन शेतकरी अडचणीत आला आहे. यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे आनंदात असलेल्या शेतकऱ्याची परतीच्या पावसामुळे निराशा झाली आहे.
शहरात गेल्या आठ दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाने हजेरी लावली. अर्धातास झालेल्या या पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचले होते. शिवाजीनगर, नवी पेठ, सिव्हील हॉस्पिटल, ख्वॉजामिया चौक परिसर, बजरंग बोगदा परिसरात पाणी साचल्यामुळे वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागला. शिवाजीनगर, लाकूड पेठ, खोटेनगर भागात झाडे पडल्याचे प्रकार घडले. काही भागांमध्ये वीजपुरवठा खंडीत झाला होता. त्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास आकाशात ढगांनी गर्दी केली होती. त्यामुळे शहरात अंधार पसरला होता. विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट कायम होता. संध्याकाळी उशिरापर्यंत पावसाची रिपरिप कायम होती. या पावसामुळे हवेत गारवा आला आहे. मेहरूण तलावातील जलपातळीत काही अंशी वाढ झाली असल्याचे दिसत आहे.

२४ तासांत जोरदार पावसाचा अंदाज

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात डेरेदाखल झालेला परतीच्या पावसाचा मुक्काम अजून आठ दिवस वाढणार असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेने व्यक्त केला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे पावसाचा जोर कायम राहणार असल्याची माहिती कुलाबा वेधशाळेचे हवामान तज्ज्ञ अजयकुमार यांनी दिली. उत्तर व मध्य महाराष्ट्र, विदर्भ, कोकण या भागांमध्ये पावसाचा जोर आठ दिवस कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. येत्या २४ तासांत जोरदार पावसाचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

Check Also

एकच पर्व, बहुजन सर्व!

‘एकच पर्व बहुजन सर्व’ चा नारा देत बहुजन समाजाच्या विविध मागण्यांसाठी हजारोंच्या संख्येने बहुजन बांधवांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *