facebook
Sunday , April 30 2017
Breaking News
Home / मुंबई / मुंबईतच पाण्याचे असमान वाटप

मुंबईतच पाण्याचे असमान वाटप

मुंबई : राज्यघटनेनुसार समन्यायी तत्त्वावर पाणीवाटप व्हायला हवे, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला असला तरी, खुद्द राज्याच्या राजधानीत, मुंबईतच वर्षानुवर्षे असमान पाणीवाटप होत आहे. शहरातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या पश्चिम तसेच पूर्व उपनगराला कमी पाणी मिळत असून, सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या शहर भागाला मात्र जादा पाणी मिळत आहे. न्यायालयीन निकालाच्या पार्श्वभूमीवर आता मुंबईत पुन्हा समान पाणीवाटपाचा मुद्दा चर्चेला आला आहे.

धरणे, जलाशयांत साठवलेले पाणी ही राज्याची संपत्ती आहे. त्यामुळे राज्य सरकार त्याचे विश्वस्त असून, सर्व नागरिक त्याचे लाभार्थी आहेत, असे स्पष्ट करीत, राज्यघटनेतील अनुच्छेद ३९ (ब)अन्वये समन्यायी तत्त्वावरच पाणीवाटप व्हायला हवे आणि ती जबाबदारी राज्य सरकारची आहे, असा महत्त्वपूर्ण निवाडा मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला. पण पाण्याच्या समन्यायी तत्त्वाचा विचार करता पूर्व-पश्चिम उपनगरातील आमदार, नगरसेवक अनेक वर्षांपासून लोकसंख्येनुसार पाणीवाटप करण्याची मागणी महापालिकेकडे करत आहेत. मात्र त्यांच्या मागण्यांना वाटण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत.

मुंबईच्या सुमारे सव्वाकोटी लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी पालिका दररोज ३,७५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करते. त्यातील सर्वाधिक पाणी शहराकडे जात असल्याचा आरोप आहे. वांद्रे ते दहिसर या पट्ट्यातील पश्चिम उपनगरात ६० लाखांहून अधिक लोकसंख्या असताना सुमारे १४०० दशलक्ष लिटर, पूर्व उपनगरात कुर्ला ते मुलुंडपर्यंत ४० लाख लोकसंख्येला ११०० दशलक्ष लिटर तर कुलाबा ते माहीम या शहर भागात ३० लाख लोकसंख्येला १२०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत आहे.
मुंबई वापरते सहा शहरांचे पाणी

मुंबईत लोकसंख्येचा स्फोट होत असल्याने महापालिकेने दोन वर्षांपूर्वी पाणीपुरवठा वाढवल्यानंतरही शहराची तहान भागली जात नसल्याचे चित्र आहे. केवळ मुंबई सहा शहरांचे पाणी वापरत आहे.

ठाणे शहराची लोकसंख्या २० लाख तर पाणीपुरवठा ४६० दशलक्ष लिटर, नाशिकची लोकसंख्या १४ लाख ५० हजार पाणीपुरवठा ४१० दशलक्ष लिटर, ३५ लाख लोकसंख्येच्या पुणे शहराचा पुरवठा ११२५ दशलक्ष लिटर तर औरंगाबादची लोकसंख्या १२ लाख असून, पुरवठा १३० ते १४५ दशलक्ष लिटर इतका आहे. सरकारी आकडेवारीनुसार नागपूरची लोकसंख्या २६ लाख तर अनधिकृत ३५ लाख इतकी असून, ६८० दशलक्ष लिटर पुरवठा करावा लागतो. या सगळ्या शहरांना लागणारा रोजचा पुरवठा एकत्रित केला तरी मुंबईत आणखी ५०० एमएलडी पाणी जादा लागते. म्हणजे मुंबई या सहा शहरांचे पाणी फस्त करते.

समान पाणीवाटपाची आखणी

मुंबईचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी, तसेच नागरिकांना समान पद्धतीने पाणीवाटप व्हावे यासाठी येत्या दोन महिन्यांत तोडगा काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात दिले आहे. जलक्षेत्रातील तज्ज्ञांची समिती नेमून, समान पाणीवाटपाचा ‘रोडमॅप’ तयार करण्यात येईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केल्याने मुख्यमंत्र्यांकडून मोठ्या अपेक्षा असल्याचे पूर्व-पश्चिम उपनगरातींल आमदारांचे म्हणणे आहे.

Check Also

१० कोटी मुलींचा विवाह १८ वर्षांआधीच

देशातील आरोग्याची स्थ‌तिी चिंताजनक असून, देशात दरवर्षी सुमारे १० कोटी ३० लाख मुलींचा विवाह त्यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *