facebook
Sunday , April 23 2017
Breaking News
Home / Featured / राफेल करारावर काँग्रेसचे प्रश्नचिन्ह

राफेल करारावर काँग्रेसचे प्रश्नचिन्ह

फ्रान्सकडून भारताने खरेदी केलेल्या राफेल विमानांची संख्या पुरेशी नसून ती ७१५ कोटींऐवजी सोळाशे कोटींच्या चढ्या भावाने विकत घेण्यात आल्याचा दावा शनिवारी काँग्रेसने केला. भारताला १२६ राफेल विमानांची तातडीने आवश्यकता असताना मोदी सरकारने केलेला केवळ ३६ विमान खरेदीचा सौदा पुरेसा ठरणार नसल्याचे मत माजी संरक्षण मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अँटनी यांनी व्यक्त केले.

एकीकडे ‘मेक इन इंडिया’च्या घोषणा करणाऱ्या मोदी सरकारने सर्व विमाने फ्रान्सकडून विकत घेण्याचे ठरवून भारतात या विमानांचे उत्पादन करण्याचा यूपीए सरकारचा संकल्पही मोडीत काढल्याची टीकाही त्यांनी केली. यूपीए सरकारने केलेल्या सौद्यानुसार एका विमानाची किंमत ७१५ कोटी रुपये होती. मोदी सरकारने ती सोळाशे कोटींवर कशी नेली, असा सवालही काँग्रेसने केला आहे. भारत-फ्रान्स यांच्यात शुक्रवारी झालेल्या ५९ हजार कोटींच्या राफेल विमान खरेदी सौद्यावर अँटनी यांनी प्राथमिक भाष्य केले. आज हवाई दलात ३२ स्क्वॅड्रन आहेत. २०२२ पर्यंत ही संख्या २५ वर येईल. अशा स्थितीत १२६ ऐवजी ३६ विमानांची खरेदी पुरेशी ठरणार नाही. पाकिस्तान आपल्या हवाई दलाची क्षमता दिवसेंदिवस वाढवत असताना; भारत ही तूट कशी भरून काढणार? असा सवाल अँटनी यांनी केला. यूपीएच्या काळात भारताने १२६ राफेल विमानांच्या खरेदीचा निर्णय घेतला होता. त्यावेळी फ्रान्सकडून केवळ १८ विमानेच खरेदी करायची आणि उर्वरित १०८ विमाने हिंदुस्थान एरोनॉटिक्सने भारतात निर्माण करायची, असे ठरले होते. फ्रान्सने राफेल विमानांचे तंत्रज्ञान हस्तांतरीत करायचे आणि ५० टक्के सुटे भाग भारताकडून खरेदी करायचे, असा करार यूपीएने केला होता. नव्या करारात या महत्त्वाच्या अटींचा समावेश नसून त्याचा भारताला मोठा भुर्दंड सहन करावा लागणार असल्याची टीका अँटनी यांनी केली.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *