facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / Featured / विदर्भासाठी अणेंचा पक्ष

विदर्भासाठी अणेंचा पक्ष

राज्याच्या महाधिवक्तापदावरून वेगळ्या विदर्भाचा शंख फुंकत विदर्भविरोधकांना अंगावर घेणारे ज्येष्ठ विधिज्ञ श्रीहरी अणे यांनी विदर्भ राज्य आघाडीची (विरा) राजकीय पक्ष म्हणून शनिवारी घोषणा केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका लढण्याचा निर्धारही त्यांनी एका मेळाव्यात व्यक्त केला. वेगळ्या विदर्भाच्या लढ्यात आतापर्यंत अनेक पक्ष स्थापन झाले असून त्यातील काही लोप पावले. विरामुळे वेगळ्या विदर्भाच्या मागणीच्या लढ्यात आणखी एका पक्षाची भर पडली आहे.

सत्तारुढ भाजप, विरोधी पक्षात असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात हा पक्ष राहील. वेगळ्या राज्याला विरोध करणारे शिवसेना आणि मनसे आमच्या खिजगणतीत नाही. केंद्र व राज्यात सत्तेत असलेले भाजप वेगळे राज्य देऊ शकत नाही आणि काँग्रेस व राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट नाही. राजकीय पर्यायाखेरीज राज्य मिळणार नसल्याने आंदोलनासाठी स्थापन केलेल्या विराचे राजकीय पक्षात रूपांतर करण्यात आल्याचे अणे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. आंदोलन हे तात्कालिक ठरतात किंवा इव्हेंट होतो. राजकीय पक्ष हा चांगला पर्याय असून या माध्यमातून जनतेच्या दरबारातून वेगळे राज्य मिळवणे दृष्टिपथात दिसते. ग्रामपंचायतपासून महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढण्यात येतील. जनमतातून ‘टेस्ट’ सिद्ध करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
वेगळ्या राज्याच्या मुद्यावर राजकुमार तिरपुडे यांचा ‘विदर्भ माझा’सारखे अनेक पक्ष निवडणूक लढणार असल्याकडे लक्ष वेधले असता, कोणत्याही विदर्भवादी पक्षाला विरोध राहणार नाही. विदर्भ आंदोलन समिती असो वा विदर्भ माझा त्यांचे उमेदवार असल्यास समझोता करण्यात येईल. सर्व विदर्भवाद्यांचा आदर करत लढत टाळण्याचे प्रयत्न होतील. त्यासाठी प्राथमिक चर्चा सुरू झाली आहे.

विदर्भाच्या नावावर भाजप वा काँग्रेससारखे पक्ष हात मिळवणीसाठी पुढे आल्यास त्यांच्याशी कुठलाही समझोता होणार नाही. तथापि, रिपब्लिकन पार्टीचे विविध गट, बसप, आपसारख्या पक्षांचा निश्चितच विचार होऊ शकतो व त्याचा लाभदेखील होईल, असा दावा अणे यांनी केला. निवडणुकीत तरुण आणि नवीन चेहऱ्यांवर फोकस करण्यात येणार आहे. प्रस्थापित प्रतिस्पर्धी भाजप, काँग्रेसला घाम फुटला तरी अर्धी लढाई जिंकली असे सिद्ध होईल, असेही अणे म्हणाले.

मोदी विदर्भविरोधी

भाजपमध्ये प्रचंड उदासीनता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विदर्भाबाबत कोणताच निर्णय घेऊ शकत नाही. वेगळ्या राज्याचा निर्णय घेऊ शकणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी एकमेव नेते असून त्यांची भूमिका विदर्भविरोधी दिसून येते, अशी टीका श्रीहरी अणे यांनी केली.

भीती वाटू लागली

हात तोडा, पाय तोडा ही भाषा विदर्भ विरोधकांकडून सुरू झाली, याचाच अर्थ त्यांना आता भीती वाटू लागली. यापूर्वी इतरांसाठी अशी भाषा वापरली गेली नाही. विदर्भ, मराठवाड्याचे नाव काढताच विरोधकांच्या पोटात गोळा उठला. महाधिवक्तापदाचा राजीनाम्याने घाम का बरे फुटला? अद्याप महाधिवक्ता का नियुक्त करण्यात आले नाही? त्यांना भीती विदर्भ मागण्याची आहे, असे श्रीहरी अणे म्हणाले.

विदर्भाचे लढे

विदर्भाच्या नावावर आतापर्यंत अनेक पक्ष व संघटना स्थापन झाल्या. यात सर्वाधिक यश १९६०-७० च्या दशकात बापूजी अणे आणि जांबुवंतराव धोटे यांना मिळाले. महापालिकेपासून लोकसभेपर्यंत त्यांचे उमेदवार निवडून आले. गेल्या दोन दशकात पक्ष व संघटनांचे पीक आले पण, त्यातील अनेक पक्ष लोप पावले, त्यांचे आज अस्विस्तदेखील दिसत नाही. अलीकडच्या काळातील पक्ष व संघटनांना अत्यल्प मते मिळाल्याने त्याचे दाखले पश्चिम महाराष्ट्रातील नेते देतात.

विदर्भ राज्य आंदोलन – लोकनायक बापूजी अणे

महाविदर्भ राज्य संघर्ष समिती – जांबुवंतराव धोटे

नाग-विदर्भ आंदोलन समिती – राजे विश्वेश्वरराव

विदर्भ राज्य आंदोलन समिती – वामनराव चटप, राम नेवले

विदर्भ राज्य संघर्ष समिती – बनवारीलाल पुरोहित, गणेश शर्मा

विदर्भ राज्य पार्टी – बनवारीलाल पुरोहित

विदर्भ जनता काँग्रेस – जांबुवंतराव धोटे

विदर्भ माझा – राजकुमार तिरपुडे

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *