facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / Featured / सीरियात रशियाचे २४ तासांत २०० हवाई हल्ले

सीरियात रशियाचे २४ तासांत २०० हवाई हल्ले

सीरिया मध्ये एका आठवड्यापासून सुरू असलेली युद्धबंदी संपल्यानंतर, बंडखोरांच्या ताब्यातील अलेप्पो भागात रशियानं २४ तासांत तब्बल २०० हवाई हल्ले केले आहेत. त्यात एकेकाळी सीरियाची व्यापारी राजधानी असलेलं अलेप्पो शहर उद्ध्वस्त झालं असून १०० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात निष्पाप नागरिकांचा, बालकांचा समावेश असल्यानं जागतिक स्तरावर रशियाचा निषेध होतोय.

सीरियातील हल्ल्याची गंभीर दखल घेऊन, ब्रिटन, फ्रान्स आणि अमेरिकेने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक बोलावली आहे, तर हे हल्ले म्हणजे मानवाधिकारांचं उल्लंघन असल्याची संतप्त प्रतिक्रिया युरोपीयन युनियननं व्यक्त केली आहे.
अलेप्पोचा पश्चिम भाग सीरिया सरकारकडे आहे, तर पूर्व भागावर बंडखोरांनी कब्जा केला आहे. या बंडखोरांवर रशियाचा राग असून त्यांना संपवण्याचा विडाच त्यांनी उचलला आहे. परंतु, पूर्व अलेप्पोमध्ये अडीच लाख लोक राहतात; त्यांचा या हल्ल्यांत नाहक बळी जातोय. शुक्रवारी आणि शनिवारी रशियानं सीरियन लष्कराच्या मदतीनं २०० हवाई हल्ले केले. बॅरल आणि व्हॅक्यूम बॉम्बद्वारे हे हल्ला करण्यात आल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. त्यामुळे शहरातील अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्यात. त्या ढिगाऱ्याखाली कैक नागरिक अडकले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ‘व्हाइट हेल्मेट’ या रेस्क्यू ग्रूपच्या मुख्यालयाचंही नुकसान झालं असून त्यांच्या तीन अॅम्ब्युलन्स आणि दोन हॉस्पिटलवरही बॉम्ब टाकण्यात आले.

या हल्ल्यांत अलेप्पो आणि आसपासच्या भागात पाणीपुरवठा करणारी यंत्रणा नष्ट झाली आहे. त्यामुळे २० लाख लोकसंख्येला पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे.

बाब अल-नैराबमधील हल्ल्यानंतर, एका पाच वर्षीय मुलीला इमारतीच्या ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात आलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तिचं नाव रवन अलोश असल्याचं स्पष्ट झालंय. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, या चिमुरडीचे आई-वडील आणि चार भाऊ-बहिणी इमारत कोसळल्याने मृत्युमुखी पडले आहेत. बशकतीन शहरात तर एकाच कुटुंबातील १५ जणांचा मृत्यू झाला आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *