facebook
Saturday , December 10 2016
Home / कोल्हापूर / मराठा क्रांती मोर्चाची जय्यत तयारी
maratha

मराठा क्रांती मोर्चाची जय्यत तयारी

सकल मराठा समाजाच्यावतीने कोल्हापुरात १५ ऑक्टोबरला महामूक मोर्चाचे आयोजन केले आहे. १५ लाख मराठा समाजबांधवांच्या उपस्थितीत मोर्चा काढण्याचा निर्धार नियोजन बैठकीत केला असल्याने मोर्चाच्या तयारीसाठी कार्यकर्ते अहोरात्र कष्ट घेत आहेत. मोर्चा शांततेत आणि शिस्तबद्ध करण्यासाठी समाजामध्ये जागृती निर्माण केली जात आहे. कोपरा सभा, प्रभात फेरी, विविध सरकारी कार्यालयांत बैठका घेण्याबरोबरच सोशल मीडियांमधून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी व्हावी, अॅट्रॉसिटी कायद्यात दुरुस्ती करावी, आदी मागण्यांसाठी राज्यभर मराठा समाजाचे लाखो संख्येचे मोर्चे निघत आहेत. संपूर्ण अहिंसात्मक मार्गाने काढण्यात येणाऱ्या मूकमोर्चाने अनेकांना धडकी भरवली आहे. इतर जिल्ह्यांप्रमाणेच कोल्हापूर जिल्ह्यातही पंधरा लाखांचा मोर्चा काढण्याचा निर्धार करत मोर्चा समितीने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. मोर्चाच्या तयारीसाठी बोलाविलेल्या बैठकीला तब्बल दहा हजार मराठा बांधवांनी हजेरी लावल्याने सर्वांना कोल्हापुरातील मोर्चाबाबत उत्सुकता लागली आहे. इतर जिल्ह्यांपेक्षा सर्वांत मोठ्या लोकसंख्येचा मोर्चा काढण्याचा निर्धार करत नियोजन समितीचे कार्यकर्ते पायाला भिंगरी बांधल्याप्रमाणे फिरत आहेत. गाव अन् गाव पिंजून काढत प्रत्येक युवक मंडळाशी स्वतंत्र संपर्क साधत आहेत.

मोर्चा यशस्वी करण्यासाठी जबाबदारी देण्यापूर्वीच सर्वजण स्वतंत्र पातळीवर प्रयत्न करत आहेत. मोर्चामध्ये अधिकधिक युवकांच्या सहभागासाठी सोशल मीडियाद्वारे आवाहन केले जात आहे. सोशल मीडिया प्रभावी माध्यम ठरत असल्याने वेगवेगळे ग्रुप अॅक्टिव झाले आहेत. याच माध्यमातून मोर्चातील मराठा बांधवांची संख्या जास्त असल्याने पार्किंगचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी मोर्चात विनावाहन सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे. प्रत्येक वाहनावर मोर्चाची तारीख, स्थळ, प्रमुख मागण्या असलेले स्टिकर लावले जात आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी ‘सकल मराठा मोर्चा’ असे स्टिकर लावलेली वाहने सर्रास दिसत आहेत. तसेच मोर्चातील युवकांना टी-शर्ट देण्याचे नियोजन केले आहे. असे मोफत टी-शर्टऐवजी स्वतः टी-शर्ट तयार करण्यास विविध ग्रुपनी सुरुवात केली आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेला मोर्चा यशस्वी करण्यासाठी व्यक्तिगत पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत.

मोर्चाच्या तयारीसाठी आज बैठक

१५ ऑक्टोबरच्या सकल मराठा क्रांती मोर्चाच्या तयारीसाठी रविवारी (ता. २५) सायंकाळी सहा वाजता मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिरातील हिंदू एकता समितीच्या कार्यालयात बैठक होणार आहे. बैठकीत मंगळवार पेठ येथील सर्व तालीम संस्था, तरुण मंडळे, महिला मंडळे, बचत गट व सर्व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. बैठकीस सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन निमंत्रकांनी केले आहे.

मुख्य कार्यालयाचे आज उद्घाटन

कोल्हापुरात मराठा मोर्चाचे आयोजन १५ ऑक्टोबर रोजी केले आहे. याची सर्वत्र तयारी सुरू असून, मराठा समाजातील सर्व कार्यकर्त्यांना एकच संपर्क कार्यालय असावे, यासाठी शिवाजी पेठ येथील शिवाजी मंदिरात ‘मराठा क्रांती मोर्चा’ प्रधान कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. कार्यालयाचे उघाटन रविवारी (ता. २५) सकाळी ११ वाजता मराठा समाजातील पाच विद्यार्थिनींच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी सर्व तालीम संस्था व मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे. उदघाटन समारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन ‘सकल मराठा समाजा’च्यावतीने केले आहे.

Check Also

news-3

नेटबँकिंगचा वाढला टक्का

आवाज न्यूज नेटवर्क – कोल्हापूर – कॅशलेस व्यवस्थेला पर्याय म्हणून अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *