facebook
Thursday , December 8 2016
Home / अहमदनगर / कारखान्यांकडे मर्यादेपेक्षा जास्त साखर
2360236623262352-2325236623522326236623442366

कारखान्यांकडे मर्यादेपेक्षा जास्त साखर

नगर ः सरकारने उत्पादकांना घालून दिलेल्या साठा मर्यादेपेक्षा जास्त साखर गोदामांमध्ये ठेवता येणार नसल्याने साखरेचे आगार असलेल्या जिल्ह्यातील तब्बल ९ कारखान्यांना महिनाभरात लाखो क्विंटल साखर विक्री करून साठा मर्यादा पाळावी लागणार आहे. जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांकडे ५८ लाख क्विंटल साखर गोदामांमध्ये असून, मागील हंगामात उत्पादन केल्यापैकी निम्मी साखर गोदामांमध्ये साठा करून ठेवण्यात आली आहे.

किरकोळ बाजारात साखरेची किंमत वाढून चाळीस रुपये किलोने विकली जात आहे. साखरेचा भाव वाढून ५५ रुपये किलोपर्यंत जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. साखरेचा भाव वाढल्याने सामान्य ग्राहकांना फटका बसला आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने साखरेची किंमत नियंत्रित ठेवण्यासाठी पावले उचलली आहेत. घाऊक व किरकोळ विक्रेत्यांना साखर साठा मर्यादा ठरवून देण्यात आली होती. या विक्रेत्यांचे गोदामही तपासण्यात येत आहे. त्याचबरोबर साखर उत्पादन करणाऱ्या कारखान्यांना साखरेचा साठा साठवून ठेवण्याबाबत मर्यादा घालण्यात आल्या आहेत. याबाबत केंद्र सरकारने पंधरा दिवसांपूर्वी आदेश काढला होता. त्यानुसार राज्य सरकारच्या पुरवठा विभागाने कार्यवाही सुरू केली आहे. त्याबाबत कारखान्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. या आदेशानुसार सप्टेंबरअखेरपर्यंत कारखान्यांना ३७ टक्के, ऑक्टोबर अखेरपर्यंत २४ टक्केच साठा गोदामामध्ये ठेवता येणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील अशोक, ज्ञानेश्वर, कोपरगाव, कुकडी, मुळा, संगमनेर, संजीवनी, श्रीगोंदा या सहकारी व अंबालिका या खासगी कारखान्यांकडे घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त साखरसाठा असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे. तर अगस्ती, प्रवरा, वृद्धेश्वर, गणेश, गंगामाई या कारखान्यांचा साखरसाठा मर्यादेपेक्षा कमी आहे.

केंद्र सरकारच्या नियमांनुसार या साखर कारखान्यांनी साखरेची विक्री सुरू केली असली तरी साखर उपसंचालक कार्यालयातील १५ सप्टेंबरच्या अहवालानुसार अजूनही जिल्ह्यातील कारखान्यांनी उत्पादन केलेल्या साखरेपैकी ५० टक्के म्हणजेच ५८ लाख क्विंटल साखर गोदामात पडून आहे. साठा मर्यादा नियम पाळण्यासाठी सर्व कारखान्यांना या महिन्याभरात असलेल्या साठ्यांपैकी निम्मी साखर विक्री करावी लागणार आहे. तरच घालून दिलेली मर्यादा पाळली जाणार आहे. अन्यथा, मर्यादेपेक्षा जास्त साखर ठेवल्यास कारखान्यांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत तहसीलदारांनी साखर कारखाना प्रशासनांच्या बैठका घेतल्या आहेत. तसेच तहसीलदारांमार्फतच साखर कारखान्यांची गोदामे तपासण्यात येणार आहेत.

चौकट ः

काय आहे मर्यादा

सप्टेंबर अखेर – ३७ टक्के साठा

ऑक्टोबरअखेर – २४ टक्के साठा

कारखान्यांकडे असलेला साठा (१५ सप्टेंबरच्या अहवालानुसार)

कारखाना शिल्लक साठा (क्विंटलमध्ये)

अशोक ३ लाख ९ हजार

ज्ञानेश्वर ६ लाख ३८ हजार

अंबालिका ७ लाख ९६ हजार

कोपरगाव ४ लाख ५ हजार

कुकडी २ लाख ७६ हजार

मुळा ५ लाख ७४ हजार

संगमनेर ७ लाख ६९ हजार

संजीवनी ४ लाख ५३ हजार

श्रीगोंदा ३ लाख २५ हजार

Check Also

news-1

वस्तूऐवजी पैसे देण्यास विरोध

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – राज्य सरकारने विविध कल्याणकारी योजनांमध्ये लाभार्थ्यांना प्रत्यक्ष वस्तू देण्याऐवजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *