facebook
Wednesday , December 7 2016
Home / अहमदनगर / महामार्गावर खड्ड्यांचे त्रिशतक
showimageinstory

महामार्गावर खड्ड्यांचे त्रिशतक

नगर शहरातून जाणाऱ्या मनमाड महामार्गावरील अवघ्या ५ ते ६ किलोमीटरच्या अंतरात तब्बल ३१३ खड्डे झाले आहेत. यातील काही खड्डे अर्धा ते एक फूट खोलीचे झाल्याने नगर-मनमाड महामार्गावरील स्थानिक व बाहेरच्या वाहतुकीला दणक्यावर दणके बसू लागले आहेत. पाऊस सुरू झाला की काही वेळातच या महामार्गावरील काही ठिकाणी पाण्याची तळी होतात.

शहरातील डीएसपी चौक ते पत्रकार चौक व पत्रकार चौक ते बोल्हेगाव फाटा येथील उड्डाणपुलापर्यंत असणाऱ्या रस्त्यावर लहान-मोठ्या खड्ड्यांचे त्रिशतक झाले असल्याचे ‘मटा’ टीमने रविवारी (२५ सप्टेंबर) केलेल्या पाहणीत स्पष्ट झाले. महामार्गांवरील खड्ड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. डीएसपी चौक-पत्रकार चौक-प्रेमदान चौक-बोल्हेगाव फाट्याजवळ असणाऱ्या उड्डाणपुलापर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला मिळून ३१३ छोटे-मोठे खड्डे आढळले. या खड्ड्यांमधून वाट काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. रात्रीच्या अंधारात यापैकी बहुतांश खड्डे दिसत नाहीत, त्यामुळे वेगाने येणाऱ्या गाड्यांचा अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. बोल्हेगाव फाटा येथे असणाऱ्या उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूला मिळून तर ३८ खड्डे आहेत. तसेच, या पुलाच्या दोन्ही बाजूला प्रवेश करतानाच खराब रस्त्याचा वाहनचालकांना सामना करावा लागतो. त्यामुळे या पुलाजवळचा प्रवास अधिकच धोकादायक बनला आहे.

१० ते ४० सेंटीमीटर खोल खड्डे

डीएसपी चौक ते बोल्हेगाव फाट्यापर्यंत असणाऱ्या काही खड्ड्यांची खोली १० सेंटीमीटर ते ४० सेंटीमीटरच्या दरम्यान आहे. नगर-मनमाड महामार्गावर डॉन बॉस्को स्कूलकडे जाणाऱ्या रस्त्याच्या समोर ३५ सेंटीमीटर खोल खड्डा आहे. येथून जवळच असणाऱ्या उड्डाणपुलावरील खड्ड्यांची खोलीदेखील १५ ते २५ सेंटीमीटरच्या दरम्यान आहे. तर, सावेडी नाका ते प्रेमदान चौक या मार्गावर असणाऱ्या पंचशील हॉटेलसमोर ३० सेंटीमीटरपर्यंत खोल असणारा खड्डा पडला आहे. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे त्यांच्या खोलीचा अंदाज वाहनचालकांना येत नाही. त्यामुळे हे खड्डे वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत असून ते तातडीने बुजवण्याची मागणी होत आहे.

पाण्याच्या तळ्यांचे वैशिष्ट्य

खरे तर, महामार्गांची रचना मध्यभागी उंचवटा व खालच्या बाजूला उताराची असते. पावसाचे पाणी वाहून जाणे त्यामुळे सोपे होते. नगर-मनमाड महामार्गाची रचना बऱ्याच अंशी अशी असली तरी या महामार्गावर साठणारी पाण्याची तळी हे नवे वैशिष्ट्य होऊ लागले आहे. नगर शहराच्या विविध भागात जशी पाण्याची तळी होतात, तशी ती आता मनमाड महामार्गावरही दिसू लागली आहेत. तारकपूर बसस्थानकासमोर, सावेडीतील पद्मावती पेट्रोल पंपाजवळील गोविंद पानसरे चौक (पाइपलाइन रोडकडे जाणारा रस्ता), हॉटेल संजोग समोर, हुंडेकरी लॉन्सजवळ व पंचशील हॉटेलसमोर अशा विविध ठिकाणी पावसाचे पाणी साठले असल्याचे आढळले. नगर शहरातून सात महामार्ग जातात. शिर्डी व शनिशिंगणापूरसह विदर्भ-मराठवाड्याकडे जाणारी छोटी-मोठी वाहने या रस्त्यांवरून जा-ये करतात. सातपैकी एका महामार्गातील केवळ सहा किलोमीटरच्या परिसरात तब्बल तीनशेवर खड्डे असल्याने अन्य महामार्गांवरील खड्ड्यांची स्थितीही यापेक्षा वेगळी नसणार आहे. किमान बाहेरगावच्या मंडळींमध्ये नगरचा लौकिक राखण्यासाठी तरी महामार्गांवरील खड्डे दुरुस्ती तातडीने सुरू करण्याची गरज व्यक्त होत आहे.

Check Also

news-1

कर्जत तालुक्यातील रस्ते धोकादायक

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – तालुक्यातील एकही रस्ता दर्जेदार राहीलेला नाही. सर्व रस्त्यांवर एक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *