facebook
Tuesday , May 30 2017
Breaking News
Home / अहमदनगर / ‘तापी’चा शिवसेनेला ताप

‘तापी’चा शिवसेनेला ताप

केंद्र व राज्य सरकारच्या निधीतून नगरमध्ये होणाऱ्या अमृत योजनेचे काम तापी प्रिस्टेस कंपनीला द्यावे की नाही, यावरून मनपातील सत्ताधारी शिवसेनेच्या डोक्याला ताप होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मनपा आयुक्त दिलीप गावडे यांनी यासंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार महासभेला असल्याचे सांगून सेनेच्या कोर्टात चेंडू ढकलला आहे, तर दुसरीकडे तापी प्रिस्टेस कंपनीला अमृत योजनेचे काम देण्यास विरोध करणारे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनीही आयुक्तांना पत्र देऊन अमृतसंदर्भातील संबंधित निविदेचा प्रस्ताव महासभेत पाठविण्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता मनपातील सत्ताधारी शिवसेनेसमोर तापीची निविदा व त्यावरील प्रशासनाचा अहवाल महासभेसमोर ठेवण्याचा दबाव वाढू लागला आहे.

केंद्र व राज्य सरकारच्या निधीतून १३४ कोटींची अमृत योजना नगरमध्ये होणार आहे. नगरच्या पाणीपुरवठा योजनेत मुळा धरण ते नगर नवी पाइपलाईइन, विळदला नवे जलशुद्धीकरण केंद्र व अन्य विकास कामे यात होणार आहेत. या योजनेचा ७२ कोटींचा निधी पहिल्या टप्प्यात मंजूर झाला असून, त्यातून ही कामे केली जाणार आहेत. त्यामुळे यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे; मात्र, नगरमध्ये मागील सहा वर्षांपासून सुरू असलेल्या फेज-२ या पाणी योजनेचे काम करणाऱ्या तापी प्रिस्टेस कंपनीचीच निविदा या नव्या कामासाठी पात्र ठरली आहे. पण फेज-२ ही पाणी योजना याच कंपनीमुळे ऱखडली असल्याने या कंपनीला नवे अमृत योजनेचे काम दिले जाऊ नये, अशी मागणी उपमहापौर छिंदम यांनी केली आहे. त्यामुळे ही योजना व तापी कंपनीही चर्चेत आली आहे.

सेनेअंतर्गतही खदखद

मनपातील सत्ताधारी शिवसेनेतील काही मंडळींना ‘तापी’लाच अमृत योजनेचे काम देण्याची इच्छा आहे. पण सेनेअंतर्गत काहींचा याला विरोध आहे. नगर शहर व उपनगरातील पाणीपुरवठ्याच्या विस्कळितपणाचा फटका नगरसेवकांना बसत आहे. रोज सकाळी सात वाजताच नागरिकांचे पाण्यासाठी फोन सुरू होतात. फेज-२चे काम सुरू असल्याचे सांगून नगरसेवकही थकले आहेत. अशा स्थितीत नव्या पाणी योजनेचे कामही फेज-२च्या कंपनीला दिल्यास आणखी पाच वर्षे नगरच्या पाण्याचा विषय मार्गी लागणार नाही, असे काहींचे म्हणणे आहे. पण मनपात स्वतःच्या पक्षाची सत्ता असल्याने थेट विरोध केला जात नाही; मात्र, श्रेष्ठींपर्यंत भावना पोहोचविल्या जात आहेत. शिवाय आता उपमहापौर छिंदम यांनीच या कंपनीविरुद्ध दंड थोपटल्याने त्यांनाही अप्रत्यक्षरित्या पाठबळ देण्याचे घाटत आहे. अशा स्थितीत आयुक्त गावडे यांनीही तापी प्रिस्टेस कंपनीची निविदा योग्य असली तरी या कंपनीला काम द्यायचे की नाही, याचा निर्णय महासभाच घेऊ शकते, असे स्पष्ट केल्याने सत्तेतील सेनेच्या काही मंडळींच्या डोक्याचा ताप वाढणार आहे.

प्रशासनच असमाधानी

तापी कंपनीद्वारे शहरात सध्या सुरू असलेल्या फेज-२ या पाणी योजनेचे ७० टक्के काम पूर्ण झाल्याचे आयुक्त गावडे यांचे म्हणणे आहे. पाण्याच्या टाक्या, जादा क्षमतेच्या वीज मोटारींची उभारणी व अन्य मोठी कामे झाली असली तरी शहराअंतर्गत पाणी वितरणाचे जाळे अद्याप झाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. अशा स्थितीत ‘तापी’ला काम द्यावे की नाही, याबाबत प्रोजेक्ट मॉनिटरिंग कमिटी (पीएमसी) असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा अभिप्राय त्यांनी मागवला आहे. तर दुसरीकडे उपमहापौर छिंदम यांनीही प्राधिकरणाकडे तक्रार करताना तापी प्रिस्टेसला काम दिले जाऊ नये, असे स्पष्ट केले आहे. त्यांच्या या तक्रारीतील विविध मुद्यांची शहानिशा प्राधिकरणाच्या स्तरावर सुरू झाली आहे. अशा स्थितीत मनपामध्ये सध्या अमृत योजना व तापी प्रिस्टेस कंपनीला तिचे काम मिळणार की नाही, याचीच जोरदार चर्चा झडत आहे. हा विषय आता महासभेच्या दिशेने वाटचाल करू लागल्याने व त्याचा निर्णय याच आठवड्यात होण्याची शक्यता असल्याने सत्ताधारी शिवसेनेतील काहीजण अस्वस्थ झाले आहेत.

चौकट – १

उपमहापौरांच्या पत्राचे औत्सुक्य

उपमहापौर छिंदम यांनी आयुक्त गावडे यांना पत्र देऊन अमृत योजनेच्या ई-निविदेबाबतचा सविस्तर अहवाल महासभेत मांडण्याची मागणी केली आहे. फेज-२ या पाणी योजनेचे काम संबंधित कंपनीने सहा वर्षात पूर्ण केले नसल्याने या कंपनीला अमृत योजनेतील कामे द्यायची की नाहीत, याबाबतचा निर्णय महासभेत सर्व सदस्यांच्या चर्चेतून घेतला जावा, असे त्यांचे म्हणणे आहे. यावर आयुक्त त्यांना काय उत्तर देतात, याचे औत्सुक्य आहे.

चौकट – २

काँग्रेस-राष्ट्रवादीचे मौन

मनपा सत्तेतील दोन्ही पक्षांमध्ये अमृत योजनेचे काम कोणाला द्यावे वा देऊ नये, यावरून काहीसा संघर्ष दिसत असताना राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने मात्र मौन बाळगले आहे. अर्थात नव्या अमृत योजनेचे काम तापी कंपनीला द्यावे की नाही, याचा विषय महासभेत जर आला तर त्या वेळी दोन्ही काँग्रेसची भूमिकाच महत्त्वाची राहणार आहे.

Check Also

मूलतत्त्ववादाचा देशाला धोका

‘जगभर धर्मवादाने व मूलतत्त्ववादाने गोंधळ घातला असताना देशात आज हिंदू धर्माचे राष्ट्र निर्माण झाले तर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *