facebook
Monday , February 27 2017
Breaking News
Home / Featured / शाळा इमारत मोडकळीस

शाळा इमारत मोडकळीस

आवाज न्यूज लाईन

शहरातील सदाफुले वस्तीवरील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची दुरवस्था झाली आहे. शाळेची इमारत जीर्ण झाली आहे. पत्रे कुजले आहेत. घाणीचे साम्राज्य पसरले आहे. घाणीमुळे डुकरांचा वावर आहे. ज्या ठिकाणी शालेय पोषण आहार शिजवला जातो तेथे डुकरे असतात. मृत प्राणीही शाळेच्या जवळच टाकले जातात. शाळेला संरक्षण भिंत नसल्याने लोक शौचासही तेथेच बसतात आणि अशा घाणीमध्येच मुले शिक्षणाची बाराखडी गिरवतात. यामुळे मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच शाळेची इमारत कोसळून अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

शहराच्या मध्यवर्ती भागात ही शाळा असूनही इतकी दुरवस्था व परिसरात घाणीचे साम्राज्य आहे. जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थी संख्या घटत असल्याने शाळा ओस पडू लागली आहे. वर्गात पाणी शिरत असून छत गळू लागले आहे. दुरवस्थेतील शाळा इमारतीमुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. याकडे शिक्षण विभागाने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. या शाळांची दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे देण्यात आला आहे, मात्र वर्षभरानंतरही त्याला मंजुरी मिळालेली नाही.

जिल्हा परिषदेच्या पहिली ते चौथीपर्यंत शाळा व अंगणवाडीही येथेच भरते. शाळेत शंभरच्या आसपास विद्यार्थी आहेत. चार शिक्षक आहेत. शाळांसाठी गावातील काही व्यक्तींनी जमिनी दान केल्या, सुविधा निर्माण केल्या, गावातील मुलांमध्ये शिक्षणाची गोडी वाढावी म्हणून बक्षिसे जाहीर केली; मात्र, त्याच शाळा आता मोडकळीस आल्या आहेत. गावातील बहुतांश विद्यार्थी खासगी किंवा इंग्रजी माध्यमांच्या शाळांतून शिक्षण घेत आहेत. त्यामुळे या शाळांकडे दुर्लक्ष केले जात आहे. जिल्हा परिषद शाळेत ४ थीचा वर्ग पाच वर्षांपासून पडझड झालेल्या खोल्यांमध्ये भरविण्यात येत आहे. या इमारतीच्या भिंतींना छिद्र पडली असून खोल्यांचे दरवाजे आणि खिडक्या, पत्रे तुटले आहेत. छतालाही छिद्रे पडली आहेत. त्यामुळे पावसाळ्यात या खोल्यांमध्ये पाणी गळते. इमारतीची अवस्था दिवसेंदिवस अधिकच वाईट होत आहे. शाळेच्या इमारतीचे बांधकाम कालबाह्य झाल्याने दुरवस्था झाली आहे.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *