facebook
Thursday , December 8 2016
Home / Featured / सरकारी कामांसाठी ‘वर्क स्टेशन’निर्मिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
phadanvis400

सरकारी कामांसाठी ‘वर्क स्टेशन’निर्मिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आवाज न्यूज लाईन

भारत संचार निगम लिमिटेडची (बीएसएनएल) कनेक्टिव्हिटी मिळत नसल्याने तालुक्यातील सरकारी कार्यालयांमधील कामांमध्ये अडसर येत असल्याने प्रत्येक जिल्ह्यात ‘वर्क स्टेशन’ उभारण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन व विकास समितीतून (डीपीडीसी) निधी उपलब्ध करून दिला जाणार असून, याबाबतच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांना दिल्या आहेत.
ग्रामीण भागांमध्ये कनेक्टिव्हिटी नसल्याने नोंदी होत नाहीत. त्यामुळे यंत्रणा असूनही त्याचा उपयोग होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात वर्कस्टेशन उभारावे लागणार आहे. संबंधित कामासाठी लागणारा निधी हा ‘डीपीडीसी’तून उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी पालकमंत्र्यांना दिल्या आहेत. नुकतीच मुख्यमंत्र्यांनी पुणे विभागीय आढावा बैठक घेतली. त्यामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांच्या कामकाजाचा आढावा घेताना त्यांनी विविध सूचना केल्या.

या पाचही जिल्ह्यांत सर्व्हरचा वापर सुमारे २० टक्केच झाला आहे. त्यामुळे प्रत्येक विभागाला सर्व्हर देण्यात येणार आहे. ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी, वर्कस्टेशनसाठी आवश्यक तो निधी ‘डीपीडीसी’तून देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांना दिले. जलयुक्त शिवार योजनेमध्ये नाला खोलीकरण, नाला रुंदीकरण आणि सिमेंटचे बंधारे यापेक्षा अन्य कामे केली जात नसल्याचे दिसते. मात्र, आता डोंगरमाथ्यावरची कामे करावी, असा आदेशही त्यांनी दिला आहे.
विविध विकासकामांना प्रशासकीय मान्यता देण्यास प्रशासनाकडून चालढकल केली जाते. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. पावसाळा संपल्यावर ताबडतोब कामे सुरू करा, असा आदेश देतानाच, ‘प्रशासकीय मान्यता विचाराधीन आहे’ असा शेरा मारू नका, असेही सुनावले. या शेऱ्याच्या आधारे वर्ष निघून जाते. त्यामुळे या पद्धतीने कामे करू नका, असा सल्ला त्यांनी दिला. सेवा वेळेवर दिली, तर लोकांचा विश्वास बसतो. त्यामुळे चांगले काम करणाऱ्या तालुक्यांना दर तीन महिन्यांनी पुरस्कार देण्याची घोषणा त्यांनी केली. वाईट काम करणाऱ्यांवर टीका केली जाते; पण चांगले काम केल्यास त्यांची प्रशंसा झाली पाहिजे, असेही फडणवीस म्हणाले.
‘आकडा खरा आहे ना’
‘राइट टू सर्व्हिस’ अंतर्गत आलेले अर्ज आणि पूर्तता केलेल्या अर्जांबाबत सामान्य प्रशासनाने अहवाल सादर केला. त्यामध्ये दिलेली आकडेवारी पाहून मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले; पण दिलेल्या आकडेवारीनुसार सर्व अर्ज निकाली काढल्याचे दिसत होते. १९ लाख ९२ हजार ६७० अर्ज आले होते. त्या सर्वांची पूर्तता केल्याचे निदर्शनास आल्यावर मुख्यमंत्र्यांनी हा आकडा खरा आहे ना? अशी विचारणाही केली. ‘आकडे तंतोतंत जुळले कसे?’ अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

Check Also

aawaz-news-image

‘पोलिसांची भीती मनातून काढून टाका’

आवाज न्यूज नेटवर्क – जळगाव – कायदा वा नियम हे समाजाच्या भल्यासाठीच असून, त्यांचे जो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *