facebook
Wednesday , December 7 2016
Home / Featured / ग्राहकसेवेला देणार ‘महावितरण‘ कात्री
13516340_115290022235705_871404053873110509_n

ग्राहकसेवेला देणार ‘महावितरण‘ कात्री

पुणे : ग्राहकांना सेवा देणाऱ्या ‘फील्ड’वरील कर्मचाऱ्यांच्या संख्येला कात्री; आणि ऑफिसात बसून कागद रंगविणाऱ्या पदांमध्ये वाढ, असा महावितरणचा नवा ‘स्टाफ पॅटर्न’ नुकताच मान्य झाला. अनेक कर्मचारी संघटनांच्या विरोधानंतरही महावितरणची ‘महा’ विभागणी सरकार पुढे रेटणार, हे त्यातून स्पष्ट झाले आहे.
वीजपुरवठा क्षेत्रातील प्रमुख कंपनी असलेल्या महावितरणच्या विभागणीचा घाट घालण्यात आला आहे. त्यामध्ये राज्यात पुणे, कल्याण, नागपूर आणि औरंगाबाद असे चार प्रशासकीय विभाग स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्याला विविध कर्मचारी संघटनांनी तीव्र विरोध केला. त्यामुळे अद्याप अंमलबजावणीचा मुहूर्त जाहीर झालेला नाही. मात्र, या नव्या विभागांचा नवा स्टाफ पॅटर्न तयार करण्यात आला असून, त्याला नुकतीच महावितरणच्या संचालक मंडळाने मान्यता दिली. मात्र, या पॅटर्ननुसार प्रत्यक्षात ग्राहकांना सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येला कात्री लावण्यात आली आहे आणि त्याउलट ऑफिसांमध्ये बसून फक्त देखरेखीची कामे करणाऱ्यांच्या पदांमध्ये वाढ होणार असल्याची टीका करण्यात येत आहे. त्यामुळे कंपनीत बाबूगिरी वाढेल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.

यामध्ये प्रामुख्याने परिमंडळ स्तरावरील कर्मचारी व अधिकारी या प्रादेशिक कार्यालयांकडे हस्तांतरीत होणार असल्याने परिमंडळ कार्यालयांचे महत्त्व कमी होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. प्रत्यक्षात विभागणीचे तत्त्व गृहित धरल्यावर मुख्य कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी हस्तांतरीत होणे अपेक्षित आहे. मात्र, तसे न करता वेगवेगळ्या परिमंडळ कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांच्या संख्येला कात्री लावण्यात आल्याची टीकाही संघटनांकडून होत आहे.
या विभागणीत नागपूर विभागात विदर्भातील ११ जिल्हे, औरंगाबाद विभागात मराठवाडा आणि खानदेश, पुणे विभागात पश्चिम महाराष्ट्र आणि कल्याण विभागामध्ये कोकण आणि ठाणे-भांडुप या विभागांचा समावेश करून तेथे विभागीय कार्यकारी संचालकांची नियुक्ती करण्याची ही योजना आहे. या विभागांपैकी दोन ठिकाणी तांत्रिक संचालकांची नियुक्ती करण्यात येणार असून उर्वरीत दोन ठिकाणी प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची (आयएएस) नियुक्ती करण्याचाही विचार आहे. त्याबरोबरच फक्त विभागीय कार्यालये वाढवून खर्च वाढेल, त्यातून ग्राहकसेवेचे कोणतेही उद्दिष्ट साध्य होणार नाही, अशी टीका संघटनांनी केली आहे. विभाग वाढविण्याऐवजी मंडळ कार्यालये (सेक्शन ऑफिसेस) वाढविण्याची गरज आहे, असे संघटनांनी म्हटले आहे. अनेक वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या सेक्शन ऑफिसांकडील ग्राहकांची संख्या जवळपास दुप्पट झाल्याने त्यांना सेवा देण्यात दमछाक होत आहे. त्यामुळे फक्त प्रशासकीय पसारा वाढविण्याऐवजी तांत्रिक मनुष्यबळ वाढवा, अशी मागणी करण्यात आहे.

Check Also

swapnil-shinde_2051

विविध कार्यक्रमांनी महामानवाला अभिवादन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६०व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मंगळवारी शहरात विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *