facebook
Wednesday , April 26 2017
Breaking News
Home / Featured / कर्मचारी पतसंस्थेवर आर्थिक आरिष्ट

कर्मचारी पतसंस्थेवर आर्थिक आरिष्ट

आवाज न्यूज लाईन

अहमदनगर : महापालिकेच्या कामगार व कर्मचाऱ्यांची असलेली सहकारी पतसंस्था आर्थिक आरिष्टात सापडली आहे. महापालिकेच्या तिजोरीत असलेल्या खडखडाटाचा फटका या पतसंस्थेलाही बसला आहे. पतसंस्थेने सभासदांना दिलेल्या कर्ज रकमेचे सुमारे साडेआठ कोटीचे हप्ते कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापून घेऊनही मनपाने पतसंस्थेकडे जमा केले नसल्याने पतसंस्थेचे नवे कर्जवितरण ठप्प झाले आहे. या सुमारे साडेआठ कोटीच्या वसुलीसाठी पतसंस्थेच्या संचालक मंडळाने मनपासमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.
नगरला नगरपालिका असतानाच्या काळात म्हणजे १९११ मध्ये स्थापन झालेल्या अहमदनगर मनपा कर्मचारी सहकारी पतसंस्थेला आता १०५ वर्षे झाली आहेत. संस्थेचे १९०० सभासद असून, ही सारी मंडळी मनपाचे कनिष्ठ अधिकारी व कर्मचारी आहेत. पतसंस्थेकडून जास्तीतजास्त ३ लाखापर्यंत कर्ज सभासदांना दिले जाते. या कर्जाचे हप्ते मनपा संबंधित कर्मचाऱ्याच्या मासिक वेतनातून कापून पतसंस्थेकडे जमा करते. पगारातून कपात केल्यानंतर १० दिवसात ही रक्कम पतसंस्थेकडे जमा होणे आवश्यक असते. कर्मचाऱ्यांच्या पगारातून वजा केली जाणारी पतसंस्था कपातीची दर महिन्याला सुमारे ९२ लाखाची रक्कम होते. मागील ८-१० महिन्यांपासून अशी कपात केलेली रक्कम पतसंस्थेकडे मनपाने भरलेली नाही. ८ कोटी ५५ लाख ४६ हजार ६४९ रुपयांची ही रक्कम मनपाकडेच अडकून पडल्याने पतसंस्थेच्या आर्थिक कामकाजावर परिणाम झाला आहे. नवे कर्जवितरण ठप्प झाले असून, पतसंस्था आर्थिक आरिष्टात सापडली आहे. त्यामुळे पतसंस्थेचे अध्यक्ष जितेंद्र सारसर यांच्यासह सर्व संचालक मंडळ सदस्य व मनपा कर्मचाऱ्यांनी येत्या ३ ऑक्टोबरला मनपासमोर उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला आहे.
कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात केलेली रक्कम पतसंस्थेकडे जमा करण्यासाठी आयुक्त, उपायुक्तांसह अकाउंट विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार करूनही ही रक्कम जमा होत नाही. पतसंस्थेकडे ४६ लाखाच्या ठेवी असून, १४ कोटीचे कर्जवितरण आहे. जिल्हा सहकारी बँकेचे कॅश क्रेडीट पतसंस्थेने घेतले आहे. पूर्वी कॅश क्रेडीटच्या घेतलेल्या रकमेवर व्याज आकारणी होत असे. पण आता मंजूर कॅश क्रेडीट लिमिटनुसार पैसे उचलले वा उचलले नाही तरी काही प्रमाणात व्याज आकारणी होते, असे सारसर यांनी सांगितले. त्यामुळे पतसंस्था दोन्ही बाजूने आर्थिक अडचणीत सापडली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पतसंस्थेकडे पैसेच उपलब्ध नसल्याने मागील दीड-दोन महिन्यांपासून कर्जवितरणही बंद झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रगतीला बसला फटका

मनपा कर्मचारी पतसंस्था पगारदार पतसंस्थांमध्ये असल्याने व कर्मचाऱ्यांच्या पगारातून कर्जरकमेचा हप्ता कपात करून मनपाद्वारे पतसंस्थेत जमा होत असल्याने वसुलीची फारशी अडचण नसते. पण मनपाने कपात केलेली रक्कमच जमा केली नसल्याने मागील वर्षी पतसंस्थेला तब्बल ८० लाखाचे आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे तसेच सभासदांना लाभांशही १५ टक्क्यावरून अवघा १२ टक्के वाटावा लागला आहे. नियमितपणे हप्ते भरणाऱ्या कर्जदारांना २ टक्के रिबेटचा फायदाही देता आला नसल्याने त्यांचेही आर्थिक नुकसान झाले आहे, असे सारसर यांनी सांगितले. दरम्यान, पतसंस्थेकडे नव्याने कर्ज वितरण करण्यास पुरेसा निधी नसल्याने कर्ज रकमेचे दिलेले धनादेशही वटलेले नाहीत. मनपाने कपात केलेले पैसे दिले नाही तर पतसंस्थेला टाळे लागण्याची स्थिती दिसू लागली आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *