facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / Featured / कोल्हापुरातील मोर्चा उच्चांकी होईल

कोल्हापुरातील मोर्चा उच्चांकी होईल

आवाज न्यूज लाईन

कोल्हापूर : ‘सकल मराठा समाज न्याय्य मागण्यांसाठी रस्त्यावर उतरला असून त्यासाठी इतर समाजाचा मिळत असलेला वाढता पाठींबा लक्षात घेता कोल्हापुरात १५ ऑक्टोबरला निघणारा मराठा समाजाचा मोर्चा गर्दीचा उच्चांक प्रस्थापित करेल,’ असे प्रतिपादन आमदार सत्यजित पाटील यांनी केले. चौंडेश्वरी सांस्कृतिक हॉल, सरूड (ता. शाहूवाडी) येथे मराठा मोर्चाच्या नियोजनासाठी आयोजित शाहूवाडी-पन्हाळा तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी राजू सावंत, रुपेश पाटील, बाबा महाडिक प्रमुख उपस्थित होते.

आमदार पाटील पुढे म्हणाले, ‘कोपर्डी घटनेतील अत्याचार पिडीत मुलीला न्याय देण्याच्या मागणीसह इतर प्रमुख पाच मागण्यांसाठी सकल मराठा समाज मूक मोर्चाच्या माध्यमातून लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरला आहे. समाजासाठी काहीतरी करून दाखविण्याची संधी उपलब्ध झाल्याची प्रत्येकाची भावना निर्माण झाल्याने कोणाच्याही नेतृत्वाशिवाय आणि स्वयंशिस्तीने निघणाऱ्या या मूक मोर्चाची सरकारला दखल घ्यावीच लागेल. डोंगराळ आणि दुर्गम परिस्थिती लक्षात घेवून शाहूवाडीतील जिल्हा परिषदेचे चार, पंचायत समितीचे पाच तसेच पन्हाळा पंचायत समितीतील एक अशा दहा सदस्यांनी आपआपल्या मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यापर्यंत मराठा मोर्चाबाबत प्रबोधन करावे. हा कोणत्या एका पक्षाचा कार्यक्रम नसल्याने कोणाच्याही निमंत्रणाची वाट न पाहता कोल्हापूरच्या मूक मोर्चात सहभाग नोंदवा.’

राजू सावंत म्हणाले, ‘आरक्षणाअभावी शिक्षण व नोकरीपासून वंचित राहिलेली मराठा समाजाची मुले गुन्हेगारीकडे वळण्याचा धोका निर्माण झाला आहे. जनआंदोलन, जनरेट्याची गरज ओळखून रस्त्यावर उतरलेला हा सकल मराठा समाज शोषित असला तरी सुसंस्कारित व जाणकार असल्याचे आजवर निघालेल्या लाखोंच्या मोर्चाने सिद्ध केले आहे.’ महामोर्चाचे वाढते स्वरूप पाहता १५ ऑक्टोबर रोजी ‘कोल्हापूरला नो व्हेईकल झोन’ घोषित करणाऱ्या पोलिस प्रशासनाला सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन सावंत केले.

रुपेश पाटील यांनी मोर्चासंबंधी आचारसंहिता स्पष्ट करताना मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्यांनी स्वयंशिस्त आणि स्वच्छता यांचे काटेकोर पालन करणे तसेच सोशल मिडीयाद्वारे आक्षेपार्ह मजकूर ‘फॉरवर्ड’ न करण्याची सूचना केली. शिवाय या मोर्चासाठी जिल्ह्यातून किमान दहा हजार स्वयंसेवकांची गरज असून त्यासाठी इच्छुकांनी संयोजकांकडे नावनोंदणी करण्याचे आवाहन केले. या स्वयंसेवकांना आठवड्याभरात प्रशिक्षण दिले जाणार असल्याचेही रुपेश पाटील यांनी सांगितले.

यावेळी युवराज पाटील, रमेश चांदणे, हंबीरराव पाटील, नामदेव पाटील-सावेकर, अमर पाटील, सर्जेराव पाटील-माणकर, जालिंदर पाटील, तानाजी चौगुले, निवास जगताप, दत्ता राणे, विजय पाटील, दिलीप पाटील आदींसह शाहूवाडी-पन्हाळ्यातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

चौकट

मुस्लिम, ओबीसी समाजाचा पाठिंबा

दरम्यान, बांबवडे (ता. शाहूवाडी) येथे मराठा मोर्चाच्या नियोजनासंबंधी परिसरातील कार्यकर्त्यांची बैठक झाली. यामध्ये एका व्यापारी कार्यकर्त्याने दहा हजार प्रसिद्धी स्टीकर्स, पत्रके तर काहींनी पाचशे टी शर्ट्स, सहभागी मुलींसाठी फेटे पुरविणार असल्याचे सांगितले. १ ऑक्टोबर रोजी बांबवडे येथे मराठा मूक मोर्चा संपर्क कार्यालय सुरु होत असल्याची माहितीही यावेळी संयोजकांकडून देण्यात आली. ९ ऑक्टोबरनंतर मोर्चा प्रबोधनासाठी तालुक्याच्या मुख्य भागातून रॅलीचे आयोजन केले जाणार आहे. यावेळी अमर पाटील, सुनील पाटील, के. एन. लाड, अजित काटकर, उदय पाटील, अमर पाटील, अनिल पाटील, पैलवान पोपट दळवी आदींसह परिसरातील ग्रामपंचायत व विविध संस्थांचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. तर मलकापूर येथे झालेल्या बैठकीत मुस्लिम व ओबीसी समाजाने मराठा मोर्चाला पाठींबा व्यक्त केला. कोल्हापूर येथील नियोजित मोर्चासाठी महाविद्यालयीन युवक-युवतींचा सक्रीय सहभाग राहणार असल्याचे सांगितले. येथील बैठकीला भाई भारत पाटील, राजू प्रभावळकर, उपनगराध्यक्ष सुरेश भोगटे, प्रकाश पाटील, रमेश पडवळ, मानसिंग पाटील आदी उपस्थित होते.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *