facebook
Saturday , February 25 2017
Breaking News
Home / Featured / खासगी टॅक्सी चालकांना रिक्षाचालकांचा जाच

खासगी टॅक्सी चालकांना रिक्षाचालकांचा जाच

रेल्वे स्थानक परिसरात एखाद्या लांब पल्ल्याच्या गाडीतून आलेले प्रवासी स्थानिक रिक्षाचालकांच्या मुजोरीला वैतागून ‘ऑनलाइन अॅप’च्या माध्यमातून खासगी टॅक्सी बुक करतात. मात्र स्थानकाजवळील सॅटिस परिसरात खासगी टॅक्सी दाखल होताच तेथील रिक्षाचालकच जवळील चौकीतील वाहतूक पोलिसांना याबाबत माहिती देऊन ‘इशारा’ करतात. त्यानंतर टॅक्सी चालकाची चौकशी सुरू होते आणि त्यात प्रवाशांच्या वेळेचा अपव्यय होतो. त्यामुळे खासगी टॅक्सी चालकांना हकनाक त्रास देऊन परिणामी प्रवाशांची गैरसोय करणाऱ्या रिक्षाचालकांवर स्वतःची सुविधा सुधारण्याची वेळ आली असून या प्रकारांना वाहतूक पोलिसांनीही लवकरच चाप बसविण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

ठाणे पश्चिमेकडील सॅटिस पुलाखालून दररोज हजारो प्रवासी शहरातील विविध भागात प्रवास करतात. यामध्ये शहराबाहेरून येणाऱ्या प्रवाशांचा टक्काही लक्षणीय असतो. त्यातच प्रवासी रिक्षेसाठी नेहमीच लांबचलांब रांगा लागलेल्या असल्याने प्रवासी खाजगी टॅक्सी सेवेकडे वळू लागले आहेत. त्यामुळे रिक्षाचालकांचे धाबे दणाणले असून सॅटिसखाली दिवसभरात येणाऱ्या प्रत्येक खासगी टॅक्सीवर रिक्षाचालक टपून बसलेले असतात. तसेच टॅक्सी दिसताच त्याची माहिती तेथील चौकीतील वाहतूक पोलिसांना देतात. यानंतर टॅक्सी चालकाला रोखून नेहमीच्या कागदपत्रांची मागणी करून वेळकाढूपणा केला जातो. मात्र यामध्ये हकनाक प्रवाशांचा वेळ खर्ची पडत असल्याने प्रवासी त्रस्त होताना दिसत आहेत.

दरम्यान, सॅटिस परिसरात खासगी टॅक्सींना ‘प्रवेशबंदी’चे कोणतीही परिपत्रक नसल्याचे वाहतूक शाखेतील सूत्रांनी सांगितले. मात्र सॅटिसखाली वाहतूककोंडी होत असल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते, असा युक्तिवादही वाहतूक अधिकाऱ्यांनी मांडला. मात्र वाहतुकीस अडथळा करणाऱ्या रिक्षांवर कारवाई करण्याचे सोडून प्रवाशांना ‘पिकअप’ करण्यासाठी येणाऱ्या खासगी टॅक्सी चालकांना नाहक चौकशीत गोवणे, हे कोणते वाहतूक नियमन आहे, असा प्रश्नच या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. याबाबत वाहतूक शाखेतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता होऊ शकलेला नाही.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *