facebook
Sunday , April 23 2017
Breaking News
Home / Featured / चणाडाळ नसेल तर वाटाण्याची डाळ खा!

चणाडाळ नसेल तर वाटाण्याची डाळ खा!

चणाडाळीच्या किंमती स्थिर आहेत व त्याची पुरेशी उपलब्धताही आहे, अशा वल्गना करणाऱ्या राज्य सरकारने चणाडाळीच्या किंमती कमी करून ग्राहकांना दिलासा देण्यासाठी काय करता येईल याची चर्चा करण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन केले होते. मात्र, यात ग्राहकांना सणासुदीच्या दिवसांत चणाडाळीच्या किंमती कमी करण्याच्या पर्यायांचा विचार करण्याऐवजी ‘चणाडाळ परवडत नसेल तर वाटाण्याची डाळ खा’, असा सल्ला देण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे.

शिधावाटप संचालकांनी बोलावलेल्या या बैठकीमध्ये शहरांतील घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते, मोठ्या साखळी कंपन्यासह मुंबई ग्राहक पंचायत प्रतिनिधींची उपस्थिती होती. ग्राहकांना दिलासा देण्यासाठी ‘चणाडाळ परवडत नसेल तर वाटाण्याची डाळ खा’, असे मुंबई ग्राहक पंचायतीने ग्राहकांना सांगावे, असे शिधावाटप नियंत्रक तसेच अन्न व नागरी पुरवठा संचालक अविनाश सुभेदार यांनी यावेळी सांगितले. ‘किरकोळ विक्रेत्यांनी नफा कमावायला हरकत नाही; मात्र त्यात मार्जिन कमी ठेवा’, असाही सल्ला द्यायला ते विसरले नाहीत. यासंदर्भात विचारणा करण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्याशी दूरध्वनीवर वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही प्रतिक्रिया मिळाली नाही.

तूरडाळीच्या वाढीव किंमतीमुळे वरणभात खाणेही सर्वसामान्य माणसाला मुश्कील झाले आहे. त्यात आता चणाडाळीच्या व उडीद डाळींच्या किंमतीचा भडका वाढतो आहे. सहा महिन्यांपूर्वी साठ ते सत्तर रुपये प्रतिकिलो असलेली हीच डाळ किरकोळ विक्रेत्यांकडे एकशे चाळीस ते एकशे साठ रुपये दराने विकली जाते. चणाडाळींची किंमत ऐकूनच एक किलो डाळ नेण्यास सर्वसामान्य ग्राहक धजावत नाही. त्यावर उतारा म्हणून विक्रेत्यांनी शंभर ग्रॅम ते पाव किलो असे वर्गीकरण करून चणाडाळ विकण्यास सुरुवात केली आहे.

या सर्व परिस्थितीमध्ये राज्य सरकारने अत्यावश्यक वस्तू नियंत्रण कायद्याचा वापर करून चणाडाळीच्या किंमती स्थिर करायला हव्यात. ते न करता असे ‘वाटाणा डाळ’ खाण्याबाबतचे बिनकामाचे पर्याय शिधावाटप संचालकांनी बोलावलेल्या या बैठकीमध्ये शिधानियंत्रक सुचवत असतील तर ग्राहकांनी खिशाला खार लावून घेण्याची तयारी ठेवावी, अशी प्रतिक्रिया या बैठकीनंतर घाऊक विक्रेत्यांनी व्यक्त केली.

विक्रेत्यांचे सावध धोरण

तूरडाळीच्या किंमती वाढल्यानंतर किरकोळ विक्रेत्यांना सरकारने वेठीस धरले होते. त्यामुळे चणाडाळींच्या किंमतीसंदर्भात विक्रेत्यांनी सावध धोरण घेतले आहे. ग्राहकांना आम्हाला भुर्दंड द्यायचा नाही, राज्य सरकार ज्या किंमती स्थिर करून देईल त्या दराने चणाडाळ विकण्याची तयारीही आम्ही दर्शवू, अशी भूमिका विक्रेत्यांनी यावेळी मांडली.
डाळींच्या किंमतीसंदर्भात चर्चा करण्याऐवजी ग्राहकांची चेष्टा करणारे असे फुकटचे सल्ले देणे हा तर सरकारचा फार्सच आहे. डाळींच्या किंमती का वाढल्या, आता कोणत्या उपायांची गरज आहे, यावर तातडीने विचार होणे गरजेचे आहे, ते न करता ‘वाटाण्याची डाळ खा’, हे म्हणणे कितपत शोभा देते

-वर्षा राऊत, मुंबई ग्राहक पंचायत.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *