facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / Featured / दुष्काळग्रस्तांना दिलासा

दुष्काळग्रस्तांना दिलासा

आवाज न्यूज लाईन

मराठा मूक क्रांती मोर्चाने राजकीय वातावरण ढवळून निघत असताना, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी गेल्या मोसमातील खरीप आणि रब्बी हंगामात झालेल्या हानीच्या भरपाईसाठी १२६९ कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केंद्र सरकारने बुधवारी केली.

दुष्काळ, नापिकी आणि पीकहानीमुळे शेती व्यवसाय अडचणीत आल्यामुळे केंद्राने कर्जमाफी, तसेच स्वामीनाथन समितीच्या शिफारशींनुसार शेतीला उद्योगाचा दर्जा द्यावा, अशा मागण्या केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने नुकसानभरपाईची घोषणा करून राज्यातील शेतकऱ्यांच्या मागण्यांची काही प्रमाणात दखल घेतल्याचे मानले जात आहे.

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करून केंद्रीय पथकाने दिलेल्या अहवालाच्या आधारे, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत ही नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला. कृषिमंत्री राधामोहन सिंह, गृह राज्यमंत्री किरेन रिजिजू, केंद्रीय गृह सचिव राजीव मेहर्षी, तसेच गृह, वित्त आणि कृषी विभागांचे ज्येष्ठ अधिकारी उपस्थित होते. खरीप पिकांच्या मोसमात झालेल्या हानीसाठी ५८९.४६ कोटी, तर रब्बीच्या मोसमात झालेल्या पीकहानीसाठी ६७९.५४ कोटी रुपयांची भरपाई देण्यात आली आहे.

मराठा मोर्चांचे समर्थन

केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी मराठा मोर्चांचे समर्थन केले आहे. ‘देशाने यापूर्वी जाट आणि पाटीदारांचे हिंसक मोर्चे अनुभवले; पण मराठा मूक मोर्चांतून देशाला महाराष्ट्राची संस्कृती कळत असून, हे मोर्चे इतर आंदोलनांसाठीही आदर्श ठरत आहेत,’ असे मत त्यांनी व्यक्त केले. ‘मराठा समाजातील गरीब मराठ्यांनाच आरक्षण मिळेल. गरीब मराठे आणि ओबीसी एकमेकांचे भाऊ-भाऊच आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मागणीचा ओबीसी नेत्यांनी विरोध करू नये,’ असे आवाहनही त्यांनी केले आहेत.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *