facebook
Saturday , April 29 2017
Breaking News
Home / Featured / पुरंदरच्या जमिनीची चांदी

पुरंदरच्या जमिनीची चांदी

आवाज न्यूज लाईन

पुणे : वर्षानुवर्षे दुष्काळामुळे फारसे आर्थिक उत्पन्न नसलेल्या पुरंदर तालुक्यातील भागातील जमिनींना आता ‘भाव’ फुटायला सुरुवात झाली आहे. विमानतळाच्या प्रस्तावामुळे या भागात रस्ते, वीज, दळणवळणाची साधने, पायाभूत सुविधा उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांच्या हातात पैसा खुळखुळणार आहे.
काही वर्षांपूर्वी चाकण, खेड येथे विमानतळ होणार असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. त्या संदर्भात विविध जागांची चाचपणी करण्यात आली होती. काही ठिकाणांना एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या (एआयआय) पथकाने पसंतीही दर्शविली होती. त्यामुळे बड्या कंपन्यांनी येथे उद्योगधंदे उभारले. कंपन्या स्थिरावल्याने रस्ते, वीज, पाणी, दळणवळणाची साधने उपलब्ध झाली आणि जागांचा भाव गगनाला भिडला. जागांचे भाव वाढले तरी, विमानतळाला शेतकऱ्यांनी विरोध केल्यामुळे ‘एआयआय’च्या पथकाने पुरंदरकडे मोर्चा वळविला. तालुक्यातील वाघापूर, राजेवाडी, पारगाव मेमाणे या भागातील जमिनींची पाहणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरंदरमध्ये विमानतळ होणार असल्याचे जाहीर करून टाकल्याने शेतकऱ्यांसह नागरिकामध्ये चैतन्याचे वातावरण आहे.
‘पुरंदर तालुका दुष्काळी पट्टा समजला जातो. तालुक्यात गायरान जमिनीचे प्रमाण अधिक आहे. शेततळ्यांच्या माध्यमातून फळबागा जगविल्या आहेत. परंतु, दुष्काळामुळे जमीन असूनही उत्पादन नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळत नाही. विमानतळ होणार असल्याने तालुक्यातील जमीन देण्यास शेतकऱ्यांची तयारी आहे. जमिनीच्या बदल्यात आर्थिक मोबादला मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. या आशेने जमिनीला भाव फुटायला सुरुवात झाली आहे,’ अशी माहिती तालुक्यातील जाणकारांनी दिली.
‘आमच्या जमिनी नापीक, माळरान स्वरूपाच्या आहेत. त्यात काहीच पिकत नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे उत्पादन घेता येत नाही. त्यामुळे जमीन मोकळीच पडून असते. विमानतळ होणार असल्याने आमच्यासारख्या जमिनीतून शेतकऱ्यांना पैसे मिळतील. त्यामुळे तालुक्यात विमानतळ व्हायला हवा,’ अशी अपेक्षा मालन कुंजीर या स्थानिक महिलेने व्यक्त केली.
..
रेल्वे वाहतुकीचीही संधी
पुरंदरमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार असल्याने त्याचा फायदा नजीकच्या तालुक्यातील प्रवाशांना होण्याची शक्यता आहे. बारामती, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर तसेच कोकणातील प्रवाशांना हे विमानतळ सोयीचे ठरणार आहे. त्यासाठी पूर्वीप्रमाणे मुंबईला जाण्याची गरज राहणार नाही. शिवाय कोल्हापूरहून थेट पुण्याकडे रेल्वेची सुविधा आहे. राजेवाडी येथे रेल्वेचे स्टेशन आहे. राजेवाडी येथे रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सुरू असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. यामुळे पश्चिम महाराष्ट्राशी ‘कनेक्टिव्हिटी₨ वाढणार असल्याने त्यामुळे पूरक व्यवसायांच्या वाढीला संधी मिळणार आहे, अशी आशा ग्रामस्थांना आहे.
..
‘मेडिकल’ टुरिझम’ वाढणार?
पुण्यात लोहगाव येथे विमानतळ आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय उड्डाणांची संख्या कमी असल्याने परदेशी पेशंटना पुण्यात येण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे अनेक जण दिल्ली, चेन्नई, कोलकाता तसेच मुंबईच्या हॉस्पिटलकडे रवाना होतात. पुण्यात मोठ्या प्रमाणात वैद्यकीय सुविधा आहेत. पुरंदर तालुका हा पुण्यापासून एका तासाच्या अंतरावर असल्याने त्यामुळे मेडिकल टुरिझम वाढण्यास फायदा होऊ शकतो, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांना वाटते‍.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *