facebook
Monday , February 27 2017
Breaking News
Home / Featured / मुंबई मेट्रोचा खर्च दुप्पट!

मुंबई मेट्रोचा खर्च दुप्पट!

मुंबई : मेट्रो मार्गात झालेले बदल आणि नव्या कॉरिडोरची निर्मिती लक्षात घेता सर्वच मेट्रो प्रकल्पांचा खर्च जवळपास दुपटीने वाढला आहे. मेट्रो मार्गांची आखणी झाली तेव्हा सर्व प्रकल्पांकरिता ३५ हजार ४०० कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. परंतु खर्चाचा हा आकडा ६१ हजार २८९ कोटींच्या घरात गेला आहे.

उपनगरीय रेल्वेवरील वाढता ताण आणि रस्ता वाहतुकीची अभूतपूर्व कोंडी फोडण्याकरिता उपनगरीय रेल्वेची सुविधा ज्या भागातील लोकांना उपलब्ध नाही, किंबहुना जे भाग रेल्वेच्या कक्षेपासून दूर आहेत, अशा भागातील लोकांना सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध व्हावा, किमान अर्धा ते एक कि.मी. अंतरावर मेट्रोची सुविधा मिळावी, या हेतूने एमएमआरडीएने दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या सहकार्याने मेट्रोचा मास्टर प्लान तयार केला होता. २००३ सालापासून ही प्रक्रिया सुरू होती. त्यानंतर या प्लानमध्ये प्रसंगानुरूप बदलही करण्यात आले.

मेट्रोचे नऊ कॉरिडोर बांधण्याचे ठरले होते. परंतु या कॉरिडोरमध्ये जास्तीत जास्त विभाग येत नसल्याने फेरविचार झाला. वडाळा-ठाणे मेट्रोमुळे मेट्रोचा आवाका वाढला आणि मुंबईसह, मुंबई परिसरही मेट्रोच्या कक्षेत आला. त्यामुळे पूर्व व पश्चिम उपनगरे, हार्बर मार्गावरील विभाग, दक्षिण मुंबई आणि मुंबई व नव्या मुंबईपर्यंत मेट्रोचा विस्तार करण्याचे ठरले आहे. तुकड्या तुकड्याने सर्व विभाग जोडण्यापेक्षा संपूर्ण मुंबई व मुंबई परिसरच मेट्रोने जोडण्याला प्राधान्य द्यावे लागल्याने खर्चाची गणिते बदलली आहेत.

मेट्रोच्या प्रकल्पांना सुमारे ३५ हजार कोटी खर्च येईल, असे एमएमआरडीएने स्पष्ट केले होते. परंतु मेट्रोचा विस्तार आणि प्रत्यक्ष टेंडर प्रक्रिया सुरू झाल्यानंतर तो पुरेसा नसल्याचे दिसले.

या खर्चाची पूर्तता करण्यासाठी एमएमआरडीएने आंतरराष्ट्रीय स्तरावरील बँकांचे सहकार्य घेतले आहे. एवढ्या निधीसाठी भरीव योगदान देणे केंद्र व राज्य सरकारला शक्य नसल्यामुळे वित्तीय संस्थांच्या सहकार्यावरच प्रकल्प तडीस न्यावे लागणार आहेत, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *