facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / Featured / शेतकऱ्यांना दंडव्याज माफ

शेतकऱ्यांना दंडव्याज माफ

आवाज न्यूज लाईन

जळगाव : यंदा पाऊस चांगला झाला असला, तरी गेल्या काही वर्षांपासून दुष्काळाचा सामना करावा लागत असलेल्या शेतकऱ्यांना यंदा फार काही फायदा होणार नाही. त्यामुळे जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना दंडव्याज माफ करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती बँकेचे संचालक एकनाथ खडसे यांनी दिली.

जळगाव जिल्हा बँकेची शतक महोत्सवी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी झाली. यावेळी खडसे बोलत होते. जिल्हा बँकेच्या चेअरमन अॅड. रोहिणी खडसे, खासदार ए. टी. पाटील, संजय सावकारे, सुरेश पाटील, राजीव देशमुख, संजय पवार, वाडीलाल राठोड, बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख आदी उपस्थित होते. एकनाथ खडसे यांनी सांगितले की, भविष्यात शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी बँकेकडून शेतकरी हितासाठी निर्णय घेण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना सौरपंप, पॉली हाऊससाठी कर्ज देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कठोर निर्णय घेणार

जळगाव जिल्हा बँकेची स्थिती अतिशय खराब होती. एकेकाळी ड वर्गात गेलेल्या बँकेला अ वर्ग प्राप्त झाला असून, बँकेची स्थिती चांगली ठेवण्यासाठी आगामी काळात कठोर निर्णय घेण्येचे सूतोवाच खडसेंनी केले. आगामी काळात बँकेचा एनपीए कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. बँकेच्या ठेवी २७०० कोटी रुपयांच्या झाल्या असल्याचे सांगण्यात आले.

भरती प्रक्रियेला मंजुरी

जिल्हा बँकेत ४२५ कर्मचारी कमी असून, भरती प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार आहे. त्याला राज्य शासनाने मंजुरी दिली असल्याचेही खडसेंनी सांगितले. या भरतीत केवळ जिल्ह्यातीलच मुलांना घेता यावा यासाठी शासनाला पत्र पाठविले असल्याचे खडसेंनी सांगितले. ही भरती प्रक्रिया एमपीएससीच्या धर्तीवर घेतली जाईल. त्यामुळे अधिक पारदर्शकता येईल, असेही खडसेंनी सांगितले. जिल्ह्यात पीक कर्ज पुनर्गठनासाठी शासनाकडे ६०० कोटी रुपयांची मागणी केली आहे. परंतु, अद्याप शासनाकडून पैसा आलेला नाही. हा निधी मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. जिल्हा बँकेला ६०० कोटी रुपये मिळावे यासाठी राज्यसहकार मंत्री गुलाबराव पाटलांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे खडसेंनी सांगितले.

नवीन बोधचिन्ह

स्थापनेची शंभर वर्षे पूर्ण करीत असलेल्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नवीन ओळख मिळाली आहे. बँकेच्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण बुधवारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि खासदार ए. टी. पाटील यांचे हस्ते झाले. याप्रसंगी बँकेचे संचालक मंडळ उपस्थित होते.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *