facebook
Thursday , December 8 2016
Home / Featured / आडत्यांनी वाचला तक्रारींचा पाढा

आडत्यांनी वाचला तक्रारींचा पाढा

आवाज न्यूज लाईन

पुणे : मार्केट यार्डाच्या आवारात दरवर्षी रस्ता, वाहतूक कोंडी, पाणी, स्वच्छता, सुरक्षा, पार्किंग यासारख्या सेवा समाधानकारक मिळत नाहीत. सेसच्या रूपाने बाजार समिती पैसेही घेते. तरीही आम्हाला काहीच सुविधा मिळत नाही, अशा स्वरुपाच्या तक्रारींचा पाढा शेतकरी, आडतदार, व्यापारी, तसेच कामगारांनी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीपुढे वाचला.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विविध घटकांनी प्रश्न उपस्थित केले. समितीचा कारभार पारदर्शी असून, लवकरच सर्व प्रश्न सोडविले जातील, असे आश्वासन बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे यांनी दिले. सभेत गेल्या वर्षातील विविध कामांचा आढावा घेण्यात आला. या वेळी उपसभापती भूषण तुपे, सचिव पी. एल. खंडागळे उपस्थित होते.
किराणा भुसार मालाच्या बाजारातील रस्ते, स्वच्छता, सुरक्षितता या प्रश्नांकडे वेळोवेळी प्रशासनाचे लध वेधण्यात आले. तरीही कार्यवाही केली जात नाही, अशी खंत पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष प्रवीण चोरबेले यांनी व्यक्त केली. बाजार आवारात स्वच्छतागृहांची संख्या अपुरी आहे. महिलांसाठी स्वच्छतागृहे उभारण्यात यावीत, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी आडते असोसिएशनचे अध्यक्ष शिवलाल भोसले यांनी बाजार आवारातील गाळ्यांचा पुर्नविकास करण्यापूर्वी आडत्यांना विश्वासात घ्या, अशी मागणी केली. रस्त्यातील खड्ड्यांसंदर्भात सांगितले तर अधिकारी वेगळाच सल्ला देत असल्याचे टेम्पो पंचायतीचे संतोष नांगरे म्हणाले. प्रत्येक टेम्पो चालकाकडून १५०० रुपये शुल्क बाजार समिती घेते. परंतु, पार्किंगची सुविधा, स्वच्छतागृहांची अपुरी संख्या आहेत, अशी तक्रार त्यांनी केली.
‘व्यापारी सेस रूपाने पैसे देतो, पण त्याला समितीकडून काहीच मिळत नाही. पिंपरी येथे रस्त्यावरील फूल बाजारातील व्यापाऱ्यांकडून सेस वसूल केला जातो,’ असे माजी खासदार गजानन बाबर म्हणाले. बाजारात असलेल्या अनधिकृत संघटनांची चौकशी करून बोगस परवाने रद्द करावेत, अशी मागणी अप्पा गायकवाड यांनी केली. फूल बाजारातील अनधिकृत व्यापाऱ्यांवर कारवाईची मागणी एम. चौधरी यांनी केली. विलास भुजबळ, राजेंद्र चोरघे, विनायक वाघोले, दादा तुपे यांनीही विविध मुद्दे मांडले.
..
बाजार समितीचा खर्च वाढला
वार्षिक सर्वसाधारण सभेत २०१५-१६ या वर्षाचा आर्थिक ताळेबंद मांडण्यात आला. गेल्या वर्षी ५६ कोटी १२ लाख ९२ हजार ९९० रुपयांचे उत्पन्न समितीला मिळाले. विविध कारणांसाठी ३२ कोटी २२हजार ३६२ रुपयांचा खर्च झाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पन्नात सहा कोटी १० लाख ८७ हजार रुपयांची वाढ झाली आहे.

Check Also

aawaz-news-image

‘पोलिसांची भीती मनातून काढून टाका’

आवाज न्यूज नेटवर्क – जळगाव – कायदा वा नियम हे समाजाच्या भल्यासाठीच असून, त्यांचे जो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *