facebook
Saturday , December 10 2016
Home / Featured / धो धो पाऊस तरीही भिस्त टँकरवरच!
tanker

धो धो पाऊस तरीही भिस्त टँकरवरच!

आवाज न्यूज लाईन

नाशिक : नाशिक विभागातील अहमदनगर जिल्ह्यात यंदा सर्वाधिक पाऊस पडूनही २१० गावांमधील रहिवाशांना टँकरखाली ओंजळ धरावी लागते आहे. यंदा १३० टक्के एवढा रेकॉर्डब्रेक पाऊस होऊनही नगर जिल्ह्यात ४८ टँकरच्या वाऱ्या सुरूच आहेत. धुळे जिल्ह्यातही चार गावे अद्याप तहानलेलीच आहेत. सप्टेंबर अखेरपर्यंत नाशिक विभागात ९८ टक्के पाऊस झाला असतानाही पाणी टंचाईच्या झळांतून नाशिक विभाग पूर्णत: मुक्त झाला नसल्याचे वास्तव पुढे आले आहे.

यंदा दुष्काळाच्या झळांमध्ये उत्तर महाराष्ट्रातील नाशिकसह अहमदनगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार हे सर्वच जिल्हे पोळून निघाले. मात्र जून ते सप्टेंबर या कालावधीत झालेल्या पावसाने सर्वच बॅकलाक भरून काढला. विशेष म्हणजे नगर जिल्ह्यात रेकॉर्डब्रेक म्हणजेच १२९.८ टक्के पावसाची नोंद झाली, तर नाशिक जिल्ह्यातही १०१.९ टक्के पाऊस झाला. गतवर्षी याच कालावधीत दोन्ही जिल्ह्यात अनुक्रमे ८०.४ आणि ६५.१ टक्के पाऊस झाला होता. गतवर्षी उत्तर महाराष्ट्रात सप्टेंबर अखेरपर्यंत ७५.७ टक्के पाऊस झाला होता. यंदा त्यामध्ये २२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

नगर जिल्ह्यातील १४ पैकी १३ तालुक्यांमध्ये १०० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला असला तरी त्यापैकीच चार तालुक्यांमध्ये अजूनही टँकरच्या फेऱ्या सुरू आहेत. नाशिक जिल्ह्यातही १५ पैकी ११ तालुक्यांमध्ये पावसाने १०० टक्क्यांचा आकडा ओलांडला आहे. गतवर्षी धुळ्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत ९३.४ टक्के पाऊस झाला होता. यंदा मात्र वरुणराजाने या जिल्ह्याकडे काहीशी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वात कमी ७८.६ टक्के पाऊस धुळ्यात झाला आहे. नंदुरबारमध्ये गतवर्षी इतकाच ८४ टक्के पाऊस झाला आहे. तर जळगावात गतवर्षीच्या तुलनेत ३० टक्के अधिक पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे. उत्तर महाराष्ट्रात सरासरी ६९५.८८ मिलीमीटर पाऊस पडतो. आतापर्यंत तेथे ६६८.६८ मिमी म्हणजेच ९७.७ टक्के पाऊस पडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नगर, धुळ्यातही टँकर

सप्टेंबर महिना उजाडला तरी उत्तर महाराष्ट्रातील २१४ गावांमध्ये अजूनही टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ नगर आणि धुळे जिल्हा प्रशासनांवर आली आहे. धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा तालुक्यातील चार गावांमध्ये अजूनही चार टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. अहमदनगर जिल्ह्यात १२८ टक्के पाऊस झाला असला तरी अजूनही येथील काही तालुके तहानलेलेच आहेत. अहमदनगर, संगमनेर, कर्जत, पारनेर शहर आणि पारनेर तालुक्यातील २१० ठिकाणच्या रहिवाशांची तहान भागविण्याचे काम ४८ टँकर अजूनही करीत आहेत.

तालुक्यांमधील टक्केवारी निहाय पाऊस

जिल्हा २६ ते ५० ५१ ते ७५ ७५ ते १०० १०० हून अधिक एकूण

नाशिक ० ० ४ ११ १५

धुळे १ १ १ १ ४

नंदुरबार ० २ २ २ ६

जळगाव ० २ ६ ७ १५

अ.नगर ० १ ० १३ १४

एकूण १ ६ १३ ३४ ५४

Check Also

news-1

नियमितीकरणासाठी फक्त एक रुपया

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – नगर शहरात खासगी व सरकारी खुल्या जागांवर असलेल्या सर्वधर्मिय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *