facebook
Sunday , April 23 2017
Breaking News
Home / Featured / पीएमपी बसचा रंग बदलणार

पीएमपी बसचा रंग बदलणार

आवाज न्यूज लाईन

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (पीएमपीएमएल) सेवेकडे अधिकाधिक प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी पीएमपी बसचा रंग बदलण्यात येणार आहे. शहरातील वाहतूक सक्षम करण्यासाठी ‘पीएमपीएमएल’च्या वतीने खरेदी करण्यात येणाऱ्या सुमारे १५०० बस नव्या रंगात रंगणार आहेत. बसचा रंग निवडण्यासाठी पुणेकरांची मते जाणून घेतली जाणार आहेत. नवीन बसची तीन डिझाइन पालिकेने तयार केली असून, ते अंतिम करण्यासाठी ५ ते १२ ऑक्टोबर दरम्यान नागरिकांची मते जाणून घेतली जाणार आहेत.
शहरातील सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध प्रकारच्या उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. याचा भाग म्हणून पीएमपीच्या वतीने खरेदी केल्या जाणाऱ्या दीड हजार बसना नवीन रंग देण्यात येणार आहे. बीआरटी मार्गातून धावणाऱ्या बस आणि उर्वरित रस्त्यावरून धावणाऱ्या बससाठी वेगवेगळे रंग असणार आहेत. त्यासाठी आकर्षक रंगसंगती निवडून डिझाइन करून घेतले जाणार असल्याचे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
पीएमपीएमएलच्या ताफ्यात सध्या असलेल्या बसचा रंग हा लाल आणि पिवळा आहे. या बस अधिक चांगल्या दिसाव्यात आणि त्यांच्याकडे नागरिकांचे लक्ष जावे, यासाठी हिरवट आणि त्यावर विविध रंगछटा असलेल्या गुलमोहोर आणि गुलमोहाराच्या पानांचे डिझाइन, पक्षांची चित्रे रेखाटली आहेत. प्रशासनाने तयार केलेल्या तीनही बसची छायाचित्रे प्रसिद्ध करून त्यावर नागरिकांकडून मते मागविली जाणार आहेत. यातील कोणते डिझाइन स्वीकारायचे यासाठी नागरिकांची मते जाणून घेतली जाणार आहेत. ५ ते १२ ऑक्टोबर दरम्यान नागरिकांना ७८८७८१०००३ या टोल फ्री क्रमांकावर मिस कॉल देऊन मत नोंदविता येणार आहे.
‘बसच्या आत जाहिरात शक्य‘
पीएमपीच्या बसवर केल्या जाणाऱ्या जाहिरातीमधून प्रशासनाला तुटपुंजे उत्पन्न मिळते. त्यामुळे बसची बाह्यरंगसंगती बदलताना त्यावर कोणत्याही प्रकारची जाहिरात करण्याची परवानगी‌ दिली जाणार नाही. बसच्या आतील बाजूला असलेल्या सीटच्या मागे तसेच बसमध्ये डिजिटल बोर्ड लावून जाहिरात सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नव्याने घेण्यात आलेल्या बसचा रंग बदलल्यानंतर जुन्या बसचा रंग देखील टप्प्याटप्प्याने बदलण्याचा विचार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
‘बायो सीएनजीवर बस चालविणार’
महापालिकेच्यावतीने ओल्या कचऱ्यापासून बायो सीएनजी तयार करण्याचा प्रकल्प तळेगाव येथे बीओटी तत्वावर उभारण्यात आला आहे. या ठिकाणी तयार झालेल्या बायो सीएनजी गॅसवर बस धावू शकतात, हे संशोधनातून समोर आले आहे. ‘एआरएआय’ आणि ‘डीआरडीई’ने देखील याला मान्यता दिली आहे. या प्रकल्पात तयार होणारा सीएनजी गॅस पिंपरी येथील पीएमपीएमएल डेपोतील सीएनजी केंद्रात आणला जाईल. पीएमपीएमएलच्या सीएनजीवर धावणाऱ्या ४० ते ४५ बस कचऱ्यापासून तयार होणाऱ्या या बायो सीएनजीवर धावू शकतील. अशा प्रकारे सीएनजीवर सार्वजनिक बसेस चालविण्याचा हा देशातील पहिला एकमेव उपक्रम असेल, असे पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *