facebook
Saturday , December 10 2016
Home / नाशिक / विद्यार्थ्याकडे आढळले वाघाचे कातडे!
katade

विद्यार्थ्याकडे आढळले वाघाचे कातडे!

पट्टेरी वाघाचे कातडे विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या १९ वर्षीय तरुणाला गुरुवारी सरकारवाडा पोलिसांनी अटक केली. तो फॅशन डिझायनिंगचा विद्यार्थी आहे. शहरामध्ये प्रथमच असा प्रकार समोर आला असून, पोलिस संबंधित संशयिताकडे कसून चौकशी करीत आहेत.

ओमकार राजेंद्र आहेर (१९ रा. गजरा पार्कजवळ, ऋषिका निवास, कमोदनगर) असे या संशयित आरोपीचे नाव आहे. तो फॅशन डिझाइनच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी असून, बुधवारी रात्री कॉलेजरोड येथून त्याला अटक करण्यात आली. याबाबत पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले, की ओमकार वाघाचे कातडे विकण्याचा प्रयत्न करीत होता. त्यातूनच त्याने काही व्यक्तींशी संपर्क साधला. त्यातील एका व्यक्तीने सरकारवाडा पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक उबाळे यांना ही माहिती दिली. उबाळे यांच्यापर्यंत आलेली माहिती खरी असल्याने सहायक पोलिस आयुक्त राजू भुजबळ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सोनवणे, पीएसआय चव्हाण, हवालदार दिलीप शिंदे, पोलिस नाईक सचिन आहिरराव आदींनी सापळा रचला.

पोलिसांपर्यंत पोहोचलेल्या व्यक्तीलाच हे कातडे विकत घ्यायचे असल्याचे संशयिताला सांगण्यात आले. २५ लाख रुपयांना सौदा ठरला. कातडे घेण्यासाठी कॉलेजरोड येथे संशयितास पाचारण करण्यात आले. रात्री दहा वाजेच्या सुमारास ओमकार स्कूल बॅगमध्ये वाघाचे कातडे घेऊन कॉलेज रोडवरील बिग बाझारजवळ आला असता, पोलिसांनी त्याला अटक केली. वाघाचे कातडे जुने असून, सुस्थितीत आहे. हे कातडे त्याच्यापर्यंत कसे आले, या गुन्ह्यात आणखी काही व्यक्तींचा सहभाग आहे काय, याचा पोलिस तपास करीत आहेत. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीनुसार, या वाघाचे कातडे ओमकारला त्याच्या वडिलांनी दिले. वडिलोपार्जित आणि कित्येक वर्षांपासून हे कातडे आपल्या घरातच पडून असल्याचे ओमकारने पोलिसांना सांगितले. तपासधिकारी सर्व शक्यता तपासून पाहत असून, पोलिस कोठडीदरम्यान अनेक बाबी स्पष्ट होतील, असे पोलिस निरीक्षक कोल्हे यांनी सांगितले. संशयित आरोपीविरोधात वन्यप्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वन विभागाला गुन्ह्याची माहिती देण्यात आली आहे. वाघाच्या कातड्याची किंमत २५ लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. संशयिताची कसून चौकशी सुरू आहे.

– लक्ष्मीकांत पाटील, पोलिस उपायुक्त

Check Also

aawaz-news-image

भंगार बाजार टार्गेटवर

आवाज न्यूज नेटवर्क – नाशिक – शहरातील गुन्हेगारांचा अड्डा असलेल्या अंबड लिंकरोडवरील अनधिकृत भंगार बाजारवर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *