facebook
Sunday , April 23 2017
Breaking News
Home / Featured / युवा पिढीची नौदलाला गरज

युवा पिढीची नौदलाला गरज

मुंबई : भारतीय नौदलात सर्वाधिक गरज युवा पिढीची असून, नौदल युवकांसाठी नव्या संधीचा सागर आहे. भारतीय व्यापारातील ९० टक्के आयात-निर्यात आजही समुद्रमार्गे केली जाते. याचा प्रचंड भार नौदलावर आहे. त्यामुळे युवा पिढीने नौदलात यावे. त्यांचे नक्कीच स्वागत आहे, असे आवाहन नौदलाचे रिअर अॅडमिरल सतीश घोरमाडे यांनी शुक्रवारी केले.

 मुलुंड येथील महाराष्ट्र सेवा संघाच्या वतीने आयोजित नौदलाच्या प्रदर्शन सोहळ्याच्या उदघाटनप्रसंगी घोरमाडे बोलत होते. सॅल्यूट इंडिया अर्थात वंदे भारतम कार्यक्रमांतर्गत संघातर्फे नौदलाविषयी माहिती, युद्धनौका, जहाजांच्या व पाणबुड्यांच्या प्रतिकृतीचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. पश्चिम नौदल कमांडच्या महाराष्ट्र विभागाचे प्रमुख असलेले घोरमाडे, एल अॅण्ड टीचे जनरल मॅनेजर अतुल पाठक, महाराष्ट्र सेवा संघाचे चंद्रशेखर वझे यांच्या उपस्थितीत प्रदर्शनाचे उदघाटन झाले.

आम्ही शिवाजी महाराजांना फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणून अभ्यासतो. त्यासाठी खास आयएनएस शिवाजी नावाने एक नेव्हल बेस लोणावळा येथे तयार करण्यात आला आहे. तसेच महाराजांनी कान्होजी आंग्रे यांना नौदलाचे नेतृत्व देऊ केले होते. त्यांच्या नावानेही आंग्रे नेव्हल बेसची स्थापना करण्यात आली आहे. युवा पिढीला नौदलात करिअर घडवण्याची खूप संधी आहे. त्यासाठी आम्ही पूर्ण सहकार्य करण्यास तयार असल्याचे घोरमाडे यांनी सांगितले. सैनिकांनाही अशा एकोप्याची आणि सामाजिक कार्यक्रमातून एकत्र येण्याची अत्यंत गरज असते. त्यासाठी महाराष्ट्र सेवा संघाने घेतलेल्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.
याप्रसंगी वझे म्हणाले की, आपल्या राष्ट्राच्या सुरक्षेची जबाबदारी केवळ सरकार आणि संरक्षण दले यांच्यावर नसून एक नागरिक म्हणून आपलीही काही जबाबदारी आहे. संरक्षणदलांविषयी असलेले आकर्षण आणि कुतूहल लक्षात घेऊन महाराष्ट्र सेवा संघाच्या वतीने या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे, तर एल अॅण्ड टी ५० वर्षे नौदलाच्या प्रत्येक कामात साथ देत आहे. ‘मेक इन इंडिया’ आतापासून आले असले, तरी कंपनीने याची सुरुवात खूप आधीपासून केली आहे, असे पाठक म्हणाले,

प्रदर्शनात ठेवण्यात आलेल्या नौकांची माहिती एका पुस्तिकेत संकलित करण्यात आली असून, त्याचे संकलन प्रोफेसर सचिन पेंडसे आणि डॉ. ज्ञानेश्वरी यांनी केले आहे. हे प्रदर्शन प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय नौदल, महाराष्ट्र विभाग, माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, मेरिटाइम हिस्ट्री सोसायटी, यांचे सहकार्य लाभल्याचे संघाच्या वतीने सांगण्यात आले. कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजी आंग्रे यांनीदेखील प्रदर्शनाला विशेष उपस्थिती लावली. २ ऑक्टोबरला या प्रदर्शनाची सांगता संध्याकाळी ६ वाजता नेव्हल बँडच्या साथीने करण्यात येणार आहे, असे संघाच्या वतीने सांगण्यात आले.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *