facebook
Saturday , April 29 2017
Breaking News
Home / क्रीडाजगत / प्रमुख शिफारशींना बीसीसीआयकडून ठेंगा

प्रमुख शिफारशींना बीसीसीआयकडून ठेंगा

भारतीय क्रिकेट बोर्डाच्या कारभारातील सुधारणेसाठी न्यायाधीश राजेंद्र लोढा समितीने काही शिफारशी केल्या असल्या आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी बोर्डाला सहा महिन्यांचा अवधी दिला असला तरी त्यातील काही महत्त्वाच्या शिफारशी स्वीकारण्यास बीसीसीआय अजूनही तयार नसल्याचे त्यांच्या येथे झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत स्पष्ट झाले. लोढा समितीच्या शिफारशींबाबत अगदी बारकाईने चर्चा करून बीसीसीआयने काही फुटकळ शिफारसी मान्य केल्या. सर्व सदस्यांची मते विचारात घेतली गेल्यामुळे ही बैठक तब्बल सहा तास चालली. पण पदाधिकाऱ्यांना ७० वयाची अट, ३ वर्षांच्या एका कार्यकालानंतर पुढील तीन वर्षे विराम घेण्याची शिफारस, तीन सदस्यांची निवड समिती या शिफारशींना स्वीकारण्याची बोर्डाची अद्याप तयारी नाही, हे स्पष्ट झाले. लोढा समितीने मात्र या सर्व शिफारशी स्वीकारल्याच गेल्या पाहिजेत असे म्हटलेले आहे. त्यामुळे आता लोढा समिती काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

लोढा समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीसंदर्भात चर्चा करण्यासाठी बोर्डाने विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते पण शुक्रवारी काही सदस्यांनी या सभेसाठी आवश्यक असलेली योग्य स्वरूपातील पत्रे न आणल्यामुळे बैठक एकदिवस पुढे ढकलण्यात आली होती.

 शिखर समिती,खेळाडूंची संघटना होणार

त्याव्यतिरिक्त बोर्डाने लोढा समितीच्या म्हणण्यानुसार शिखर समिती तयार करण्याची तयारी दर्शविली आहे पण त्यात काही सुधारणा त्यांना अपेक्षित आहेत. या समितीत तसेच आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलमध्ये महालेखापरीक्षकांच्या प्रतिनिधीची नियुक्ती करण्याची तयारी मात्र बोर्डाने दाखविली आहे. लोढा समितीने म्हटल्याप्रमाणे विविध समित्यांची स्थापनाही बोर्ड करणार आहे. त्यात महिलांची समिती व अपंग खेळाडूंच्या समितीचा समावेश आहे. खेळाडूंची संघटना व त्यांना समितीत प्रतिनिधित्व देण्यासही बोर्ड तयार आहे. आयसीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सहसदस्यांना मतांचा अधिकार देण्याबाबत बीसीसीआयच्या सदस्यांमध्ये एकमत दिसले. पुदुचेरीला सहसदस्य देण्यात आले आहे.

लोढा समितीच्या शिफारशींपैकी पुढील हंगामातील आयपीएलसाठी जी शिफारस करण्यात आली आहे ती मान्य करण्यात आली. त्यानुसार खेळाडू व संघव्यवस्थापकांसाठी आचारसंहिता, उत्तेजकविरोधी नियमावली, वर्णद्वेषाविरुद्ध आचारसंहिता, भ्रष्टाचाराविरोधातील संहिता यांचा अवलंब केला जाणार आहे. खेळाडूंच्या एजन्टच्या नोंदणीची शिफारसही एकमताने स्वीकारण्यात आली.

बीसीसीआयला सध्याच्या ३० राज्ये व क्रिकेट संघटनांची संरचना योग्य वाटते, पण सहसदस्य संघटनांना मतांचा अधिकार देण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे. जे सदस्य बोर्डासह गेली ९० वर्षे आहेत त्यांचा मतांचा अधिकार हिरावून घेण्याची बोर्डाची तयारी नाही. त्याची भरपाई करण्यासाठी इशान्य भारतातील राज्यांना प्रत्येकी एक मत देण्यात येईल. त्यामुळे एक राज्य, एक मत या शिफारशीची पूर्ती होऊ शकेल, असा बोर्डाचा दावा आहे.

विदर्भाने स्वीकारल्या लोढांच्या शिफारशी

नागपूर : विदर्भ क्रिकेट असोसिएशनने लोढा यांच्या शिफारशी स्वीकारल्या आहेत. शुक्रवारी झालेल्या या असोसिएशनच्या विशेष सर्वसाधारण सभेत नव्या घटनेचा प्रस्ताव ठेवण्यात आला. त्यानुसार प्रकाश दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत हा प्रस्ताव स्वीकारण्यात आला. त्याशिवाय, लोढा समितीने जी मुदत देण्यात आली आहे, त्यानुसार नोव्हेंबर महिन्यात किंवा त्याआधी निवडणुकीची प्रक्रिया पार पडेल. या शिफारशी सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केलेल्या असल्यामुळे त्या मान्य कराव्यात, असे बैठकीत ठरले.

Check Also

मालिकावीर अश्विनवर वीरेंद्र सेहवागचा मजेशीर ट्विट्स

नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील मालिकावीराचा किताब मिळालेल्या फिरकीपटू आर.अश्विनवर मजेशीर ट्विट केले. इंदूर कसोटीमध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *