facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / Featured / महाराष्ट्रात राहतो तो मराठा – डॉ. सदानंद मोरे

महाराष्ट्रात राहतो तो मराठा – डॉ. सदानंद मोरे

जात, धर्म आणि पंथ कोणताही असो; जो महाराष्ट्रात राहतो आणि मराठी बोलतो तो मराठा, असे मत ज्येष्ठ साहित्यक डॉ. सदानंद मोरे यांनी शनिवारी व्यक्त केले. महाराष्ट्राच्या इतिहासातील मराठय़ांचे योगदान या विषयाची योग्य मांडणी करण्याचे काम गेली काही दशके करीत असून त्याला समाजमान्यता मिळत असल्याचा आनंद वाटतो, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

स्नेहल प्रकाशनतर्फे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांच्या हस्ते डॉ. मोरे यांना स्नेहांजली पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या ‘कोप्पेश्वर (खिद्रापूर) मंदिर आणि मूर्ती’ या तसेच अनिल बळेल यांच्या ‘बाबूजी’ (संगीतकार सुधीर फडके) या पुस्तकांचे प्रकाशन या वेळी करण्यात आले. प्रकाशक रवींद्र घाटपांडे या वेळी उपस्थित होते.

मोरे म्हणाले, महाराष्ट्र, मराठी आणि मराठा ही त्रिपुटी असल्याचे राजारामशास्त्री भागवत यांनी सांगितले होते. म्हणूनच लोकमान्य टिळक यांच्या इंग्रजी वृत्तपत्राचे आणि आचार्य अत्रे यांच्या वृत्तपत्राचे नाव ‘मराठा’ असेच होते. १८ वे शतक हे मराठय़ांचेच होते. मराठी साम्राज्य देशभर परसले होते. मराठय़ांमुळेच ब्रिटिशांची गुलामगिरी उशिराने आली. मराठय़ांच्या या योगदानाचा जयजयकार झाला नाही. पाठय़पुस्तक निर्मिती मंडळावर नियुक्त केलेल्या अमराठी लोकांनी मराठय़ांचा इतिहास पुढे येऊ दिला नाही. त्या विरोधात गेल्या दहा वर्षांपासून आमचा संघर्ष सुरू आहे. आता सहस्रबुद्धे यांनी त्यामध्ये लक्ष घालावे.

सहस्रबुद्धे म्हणाले, महाराष्ट्रात विशिष्ट अशी वैचारिक बाजारशक्ती विकसित झाली आहे. जे खपते त्यालाच प्राधान्य या तत्त्वावर अन्य विचारांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले. विशिष्ट विचारसरणीतून इतिहासाची मांडणी केली जात आहे. ही अस्पृश्यता दूर करून सर्वसमावेशक लोकतांत्रिक वृत्ती स्वीकारायला हवी. इतिहासाची मांडणी करताना वस्तुनिष्ठ दृष्टिकोन आणि वैचारिक लोकशाहीचे भान न ठेवल्यास देश पुन्हा अंध:काराकडे जाईल. देगलूरकर म्हणाले, मंदिर आणि मूर्ती यांचे महत्त्व, त्यांची वैशिष्टय़े याची माहिती झाल्याखेरीज मूर्तीचे आणि देवळाचे रक्षण करण्याची बुद्धी आपल्याला होणार नाही. मूर्ती या समाज परिवर्तन, समाज प्रबोधन आणि सामाजिक अभिसरणासाठी आरसा म्हणून काम करतात.

रवींद्र घाटपांडे यांनी प्रास्ताविक केले. सुप्रिया अत्रे यांनी सूत्रसंचालन केले.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *