facebook
Thursday , March 2 2017
Breaking News
Home / Featured / भारताचा कोलकाता कसोटीत दणदणीत विजय

भारताचा कोलकाता कसोटीत दणदणीत विजय

कसोटी क्रमवारीत भारत पुन्हा अव्वल

भारतीय संघाने कोलकाता कसोटीत चौथ्याच दिवशी १७८ धावांनी विजय प्राप्त करून तीन कसोटी सामन्यांची मालिका २-० अशी खिशात घातली आहे. भारतीय संघाने या मालिका विजयासह आतंरराष्ट्रीय कसोटी क्रमवारीत देखील पुन्हा एकदा अव्वल स्थान प्राप्त केले आहे. कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान होण्याची भारतीय संघाची ही चौथी वेळ आहे. दुसऱया डावात भारतीय संघाकडून मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा आणि अश्विन यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या, तर भुवनेश्वर कुमारने एक महत्त्वपूर्ण विकेट मिळवली.

कोलकाता कसोटीत दुसऱया डावात भारतीय संघाला सर्वबाद २६३ धावा करता आल्या होत्या. त्यामुळे पहिल्या डावातील ११२ धावांच्या आघाडीसह भारतीय संघाला न्यूझीलंडसमोर विजयासाठी ३७६ धावांचे आव्हान ठेवले होते. भारतीय संघाच्या या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाला केवळ १९७ धावांपर्यंतच मजल मारता आली. न्यूझीलंडकडून सलामीवीर लॅथमने सर्वाधिक ७४ धावा केल्या. लॅथम बाद झाल्यानंतर ठरावीक अंतराने न्यूझीलंडच्या विकेट्स गेल्या आणि चौथ्या दिवसाचा खेळ संपण्यासाठी केवळ एक षटक शिल्लक असताना भारतीय संघाने न्यूझीलंडची शेवटची विकेट घेऊन दणदणीत विजय साजरा केला.

तत्पूर्वी, सामन्याच्या चौथ्या दिवशी वृद्धीमान साहाने आपले अर्धशतक पूर्ण केले होते. साहाने नाबाद ५८ धावांचे योगदान दिले, तर भुवनेश्वर कुमारने २१ धावा केल्या. भारतीय संघाच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरूवात चांगली झाली होती. उपहारापर्यंत झालेल्या १६ षटकांच्या खेळात न्यूझीलंडच्या संघाला बिनबाद ५५ धावा करता आल्या. अश्विनने भारतीय संघाला पहिले यश मिळवून दिले. अश्विनने गप्तील माघारी धाडले. त्यानंतर निकोल्स आणि लॅथम यांनी संघाच्या धावसंख्येला सावरण्याचा प्रयत्न केला. त्यात लॅथमच्या प्रयत्नांना बऱयापैकी यश देखील आले. लॅथमने आपले अर्धशतक देखील साजरे केले. पण त्याला दुसऱया बाजूने साजेशी साथ मिळू शकली नाही आणि भारतीय गोलंदाजांसमोर किवींनी हात टेकले.

तिसऱया दिवसाच्या अखेरीस भारतीय संघाला दुसऱया डावात ३३९ धावांची आघाडी घेता आली होती. तिसऱया दिवासाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाची धावसंख्या ८ बाद २२७ अशी होती. भारताकडून रोहित शर्माने सर्वाधिक ८२ धावांचे योगदान दिले, तर कर्णधार कोहलीने ४५ धावा केल्या. पहिल्या डावात ११२ धावांची आघाडी घेतल्यानंतर भारतीय संघाच्या दुसऱया डावाची सुरूवात निराशाजनक झाली होती. अवघ्या ४३ धावांत भारतीय संघाचे ४ फलंदाज तंबूत दाखल झाले. त्यामुळे पहिल्या डावात ११२ धावांची आघाडी मिळवूनही दुसऱया डावात न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत सामन्यात पुनरागमन केले. कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी भारतीय संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण कोहली देखील ४५ धावांवर पायचीत होऊन माघारी परतला. मग मोक्याच्या क्षणी रोहित शर्माने वृद्धीमान साहाच्या साथीने अर्धशतकी खेळी साकारून भारतीय संघाला सामन्यात पुन्हा एकदा मजबूत पकड निर्माण करून दिली. न्यूझीलंडकडून सँटनर आणि हेन्री यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या, तर ट्रेंट बोल्टने दोन विकेट्स मिळवल्या.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *