facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / नाशिक / मैत्रेयच्या संचालकांनी बँकेत पाच कोटी रुपये भरावेत

मैत्रेयच्या संचालकांनी बँकेत पाच कोटी रुपये भरावेत

धुळे जिल्हा सत्र न्यायालयाचे आदेश

मैत्रेयच्या गुंतवणूकदारांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. मैत्रेयच्या संचालिका वर्षां सत्पाळकर यांना शहरातील अॅक्सिस बँकेत खाते उघडून त्यात महिनाभराच्या आत पाच कोटी रुपये जमा करण्याचे आदेश जिल्हा सत्र न्यायालयाने दिले आहेत.

शहर पोलीस ठाण्यात मैत्रेय ग्रुप ऑफ कंपनीच्या संचालिका वर्षां मधुसूदन सत्पाळकर यांच्याविरुद्ध ऑगस्ट २०१६ रोजी फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यास गुंतवणूकदारांतर्फे अॅड. किरण कुमावत यांनी हरकत घेतली. त्यामुळे त्यांना १४ सप्टेंबपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर केला. त्याच दिवशी मैत्रेयमध्ये फसवणूक झालेल्या तीन हजार ठेवीदारांची यादी सादर केली. संबंधितांची रक्कम २० कोटींहून अधिक आहे.

संशयितास जामीन मंजूर केल्यास ठेवीदारांचे नुकसान होईल ही बाब ठेवीदारांच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर सत्पाळकर यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत हजेरी लावण्याचे आदेश दिले. त्यानुसार दोन दिवस त्यांनी हजेरी लावली. मात्र नंतर एक दिवस त्या गैरहजर राहिल्याने ठेवीदारांनी आक्षेप घेतला. त्यांना अटक करण्याचीही मागणी करण्यात आली. या प्रकरणात दोन्ही पक्षांकडून युक्तिवाद झाल्यानंतर न्या. आर. आर. कदम यांनी आदेश दिले. नाशिक निकालाच्या धर्तीवर मैत्रेयने ३ ऑक्टोबर रोजी धुळे येथील अॅक्सिस बँकेत इस्क्रो खाते उघडून महिनाभरात त्यात पाच कोटी रुपये जमा करण्यास सूचित करण्यात आले आहे. या खात्यात जमा होणाऱ्या रकमेचे वाटप करण्यासाठी पाच जणांची समितीही तयार करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक देवीदास शेळके यांचे सहकार्य लाभले. ठेवीदारांतर्फे अॅड. किरण कुमावत यांनी काम पाहिले. सरकारी पक्षाकडून जिल्हा सरकारी वकील सुनील जैन यांनी बाजू मांडली.

इस्क्रो खात्यात रक्कम जमा न केल्यास मैत्रेयच्या संचालकांना अटक करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला देण्यात आले आहेत. दरम्यान, वर्षां सत्पाळकर सोमवारी हजर राहण्याची शक्यता आहे. मैत्रेयमध्ये गुंतवणूक केलेल्या सहा हजार तक्रारी आतापर्यंत प्राप्त झाल्या आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर महिनाभराच्या आत न्यायालयाने पाच कोटी भरण्याचा निकाल दिल्याने ठेवीदारांना दिलासा मिळाला आहे. रकमेच्या वाटपासाठी पाच सदस्यांची एक समिती गठित करण्यात आलेली आहे. त्यात जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी दर्जाचा प्रतिनिधी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून पोलीस निरीक्षक देवीदास शेळके, मैत्रेयकडून शाखा अधिकारी संजय पाटील, ठेवीदारांच्या वतीने अॅड. किरण कुमावत व सरकार पक्षाकडून अॅड. नीलेश कलाल यांचा समावेश आहे. मैत्रेयच्या संचालकांकडून खात्यात रक्कम जमा झाल्यानंतर समितीमार्फत त्याचे वाटप केले जाईल. त्यात २० हजारांच्या आतील ठेवीदार, त्यानंतर धनादेश अनादर झालेले ठेवीदार, मुदत पूर्ण झालेले, २० हजारांहून अधिक रक्कम असणारे ठेवीदार असा प्राधान्यक्रम ठरवून पैशांचे वितरण केले जाईल, असे सांगण्यात आले.

Check Also

मार्केट फुलले; चेहरे उतरले

रविवारच्या साप्ताहिक सुटीनंतर सोमवारी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे येवला मुख्य बाजार आवार लाल कांदा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *