facebook
Thursday , December 8 2016
Home / मुंबई / मुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर
monsoon830x553

मुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर

आजही पावसाची शक्यता ; मराठवाडय़ात अनेक ठिकाणी अतिवृष्टी

सप्टेंबमध्ये काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवसापासून पावसाने ताल धरला आहे. दिवसभर ढगाळ वातावरण आणि मध्येच कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईमधील वातावरण थंड झाले असून गेले दोन दिवस मुंबई मुक्कामी असलेल्या पावसामुळे मुंबईकर सुखावले आहेत.

गेल्या २४ तासांमध्ये सांताक्रूझ येथे १४ मि.मी., तर कुलाबा येथे ८.६ मि.मी. पावसाची नोंद झाली. तसेच सोमवारीही काही भागात पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नवरात्रौत्सवामुळे सध्या मुंबईमध्ये दांडियाची धुम सुरू झाली आहे. मात्र पावसाची रिपरिप सुरू झाल्यामुळे दांडियाच्या आनंदावर विरजण पडू लागले आहे.

मराठवाडय़ाला झोडपले

मराठवाडय़ाला अक्षरश: झोडपून काढलेले असतानाच लातूर, नांदेड, उस्मानाबाद, बीड या जिल्ह्य़ांत रविवारीही पावसाचा जोर कायम राहिला. दरम्यान, लातूर जिल्ह्य़ातील लोहा-कंधार तालुक्यात मन्याड नदीच्या पुरात अडकलेल्या २३ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आले. पूरस्थितीत अडलेल्यांची सुटका करण्यात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (एनडीआरएफ) जवान आणि प्रशासकीय यंत्रणा एकत्रितरीत्या काम करत आहेत.

लातुरात पावसाचा जोर

लातूर जिल्ह्य़ात शनिवारी रात्रीतून ६ तालुक्यांत व २२ मंडळांत अतिवृष्टी झाली. उदगीर तालुक्यातील वाढवणा मंडळात ढगफुटी झाली. १७ गावांतील १२६५ जणांना पुरापासून वाचविण्यासाठी स्थलांतरित करावे लागले. मांजरा धरणाचे दरवाजे दीड मीटरने उघडल्यामुळे लातूर-नांदेड मार्गावरील वाहतूक रविवारी सकाळी  बंद होती. मावरजा, भंडारवाडी मध्यम प्रकल्पाचे दरवाजेही उघडावे लागले. रेणापूर, लातूर, अहमदपूर, चाकूर, उदगीर, जळकोट या सहा तालुक्यांत व २८ मंडळांत १४ तासांत अतिवृष्टी झाली आहे. तब्बल १०६३.५६ मि.मी. पाऊस झाला असून मराठवाडय़ात हा सर्वाधिक पाऊस आहे.

दोन दिवसांपासून उस्मानाबाद  जिल्ह्य़ात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्य़ातील आठ महसूल मंडळाला झोडपून काढले आहे, तर उस्मानाबाद शहरात मागील काही वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

बिंदुसरेला पूर आल्याने अध्रे बीड शहर जलमय

बीड : वार्षकि सरासरी ओलांडलेल्या पावसाने तिसऱ्या दिवशीही बीड जिल्ह्य़ात दमदार हजेरी लावली. जिल्ह्य़ातील चौदा महसूल मंडळात अतिवृष्टी झाली असून नद्या-नाल्यांना पुन्हा पूर आला आहे. दासखेड(ता. पाटोदा) येथील पाझर तलाव फुटल्याने आणि पावसाचा जोर सुरूच असल्याने िबदुसरा प्रकल्पात पाण्याची आवक वाढली. डोकेवाडा, करचुंडी येथील पाण्याचा होणारा विसर्ग िबदुसरेत दाखल होत असल्याने बिंदुसरा नदीला पूर आला आहे. यामुळे अध्रे शहर जलमय झाले असून घरांमध्ये, दुकानांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. पुरात नगरपालिकेचे उद्यान वाहून गेले असून त्या ठिकाणी झाडावर अडकलेल्या पंधरा जणांना प्रशासनाने सुखरूप बाहेर काढले.

नगर जिल्ह्य़ात संततधार

नगर : जिल्ह्य़ात परतीच्या पावसाने सलग दुसऱ्या दिवशी संततधार धरली आहे. नगर शहरात आज, रविवारी दिवसभर मुसळधार पाऊस सुरू होता. जोरदार पावसाने जामखेड तालुक्यातील तीन गावांना मोठा फटका दिला. तेथील मांजरा नदीला पूर आल्याने १२० कुटुंबांना प्रशासनाने रात्रीतून सुरक्षितस्थळी हलवले. आज सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्य़ात झालेला पाऊस असा (आकडे मि.मी.मध्ये) : अकोले ४, संगमनेर ६, कोपरगाव १०, श्रीरामपूर १३, राहुरी ४.२, नेवासे ५, राहाता १३, नगर १३, शेवगाव ३१, पाथर्डी ४०, पारनेर २९, कर्जत ६०, श्रीगोंदे ५० व जामखेड ४५.४. एकूण २३.१२ मि.मी. जामखेड तालुक्यातील दिघोळ, जातेगाव व माळेवाडी या गावांना मांजरा नदीच्या पुराने फटका दिला.

Check Also

aawaz-news-image

गोरेगावातील नाट्यगृहाला प्रभाकर पणशीकर यांचे नाव

आवाज न्यूज नेटवर्क – मुंबई – गोरेगाव पश्चिम येथील टोपीवाला मंडईच्या पुनर्विकासानंतर उभारण्यात येणाऱ्या इमारतीत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *