facebook
Thursday , April 27 2017
Breaking News
Home / Featured / धान्य काळाबाजार करणारा अटकेत

धान्य काळाबाजार करणारा अटकेत

सरकारी अन्नधान्याची काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या गोकुळ साहेबराव साबळे (वय ३३, रा. माळवाडी, हडपसर) याच्या विरोधात ‘महाराष्ट्र प्रिव्हेन्सिव्ह डेंजरस अॅक्टिव्हिटी’ कायद्यानुसार (एमपीडीए) कारवाई करण्यात आली. अत्यावश्यक वस्तू कायद्यात सुधारणा केल्यानंतर सरकारी अन्नधान्याचा काळाबाजार करणाऱ्यावर करण्यात आलेली ही राज्यातील पहिलीच कारवाई आहे.
साबळे यांना अमरावती तुरुंगामध्ये स्थानबद्ध करण्यात आले आहे, अशी माहिती पुण्याच्या पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पत्रकार परिषदेत दिली. ‘पुण्यात आतापर्यंत एमपीडीएनुसार तेरा कारवाई करण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक वस्तू कायद्यामध्ये सुधारणा केल्यानंतर सरकारी धान्याची काळ्या बाजारात विक्री करणाऱ्यावर पुण्यात प्रथमच कारवाई करण्यात आली आहे. साबळे याने संघटित टोळी तयार केली होती. या टोळीच्या मदतीने त्याने पुणे शहरातील रेशन दुकानदारांना धमकावून, प्रसंगी मारहाण करून रेशनिंगचे धान्य विकत घेतले. या धान्याची खुल्या बाजारात अधिक दराने विक्री करण्यात येत होती. गेल्या तीन ते चार वर्षांपासून साबळे याचा गोरखधंदा सुरू होता. या प्रकरणी त्याच्यावर निगडी पोलिस ठाण्यात २०१३मध्ये गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी त्याच्याकडून १६, ७५० किलो तांदूळ, ९,८०० किलो गहू असा पंधरा लाखांचा माल जप्त करण्यात आला होता,’ अशी माहिती श्रीमती शुक्ला यांनी दिली.

 अमरावतीमध्ये केले स्थानबद्ध

साबळेच्या गोरखधंद्याची अन्नधान्य वितरण कार्यालयास देण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर त्याने वार केले होते. या प्रकरणी साबळेवर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. रेशन दुकानदारांमध्ये साबळेची दहशत होती. त्याच्यामुळे गरिबांना जास्त दराने खुल्या बाजारातून धान्य विकत घ्यावे लागत होते. अन्नधान्य पुरवठा करण्याच्या व्यवस्थेत बाधा निर्माण होऊन त्याद्वारे सार्वजनिक कायदा सुव्यवस्थेला बाधा निर्माण झाल्यामुळे साबळेच्या विरोधात खडक पोलिसांकडून ‘एमपीडीए’चा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला परवानगी देण्यात आली असून, सोमवारपासून त्याला अमरावती तुरुंगात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *