नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात कितीही तणाव आणि कितीही वाद असले तरी भारतीय जवानांनी आणि भारतीयांनी कधीही माणूसकी सोडलेली नाहीये. याचंच एक उदाहरण म्हणजे पाण्याच्या शोधात चुकून भारतीय सीमेत आलेल्या पाकिस्तानी तरूणाला सुखरूप मायदेशी परत पाठवण्यात आले आहे. चुकून पाकिस्तानी सीमेत गेलेल्या चंदू चव्हाणबद्दल पाक अनेक खोटे दावे करत असतानाही भारतीय जवानांनी दाखवलेल्या या माणूसकीचं कौतुक केलं जात आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्या सीमा अतिशय जवळजवळ असून सीमेवर अनेक गावे आहेत. असाच कसूर जिल्ह्यातील धारी गावात राहणारा १२ वर्षाचा मोहम्मद तन्वीर पाण्याच्या शोधात चुकून भारतीय सीमेत दाखल झाला. बीएसएफ जवानांनी त्याला ताब्यात घेतलं. चौकशी केल्यावर त्याने सांगितले की, तो पाण्याच्या शोधात चुकून इकडे आला. तेव्हा त्याला रात्रभर चौकीतच ठेवण्यात आले आणि त्याच्या जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली.

त्यानंतर भारतीय अधिका-यांनी पाकिस्तानी अधिका-यांना याबाबत माहिती दिली. आणि सोमवारी सकाळी या मुलाला पाकिस्तानात त्याच्या गावी परत पाठवण्यात आले. यावरून भारतीय जवानांची माणूसकी दिसून येते. तर दुसरीकडे चंदू चव्हाण हा भारतीय जवान चुकून पाकिस्तान सीमेत गेला. त्याला पाक सैनिकांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. तरीही पाकिस्तान आमच्या ताब्यात कोणताही भारतीय सैनिक नाही, असा कांगावा करतो आहे.