facebook
Monday , December 5 2016
Home / Featured / निवडणूक आरक्षण सोडत शुक्रवारी
pmc-2

निवडणूक आरक्षण सोडत शुक्रवारी

आवाज न्यूज लाईन

पुणे : महापालिकेच्या आगामी निवडणुकीत एकूण १६२ जागांपैकी २२ जागा अनुसूचित जातींसाठी (एससी) , दोन जागा अनुसूचित जमातींसाठी (एनटी), ४४ जागा अन्य मागासवर्गीयांसाठी (ओबीसी) आरक्षित असणार आहेत. सर्वसाधारण गटासाठी (ओेपन) ९४ जागा सोडण्यात येणार आहेत. ४१ प्रभागांमध्ये निवडणूक होणार असून, या विषयीची आरक्षण सोडत येत्या शुक्रवारी (७ ऑक्टोबर) काढण्यात येणार आहे.
महापालिकेची आगामी निवडणूक फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये होणार आहे. या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, ४१ प्रभागांमध्ये १६२ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामधील ३९ प्रभागांमध्ये चार सदस्यीय तर, दोन प्रभागांमध्ये तीन सदस्यीय पद्धती अवलंबण्यात येणार आहे. आरक्षण सोडत येत्या शुक्रवारी गणेश कला क्रीडा मंचात काढण्यात येणार आहे. या प्रभागांमध्ये आरक्षण नेमक्या कोणत्या पद्धतीने असेल, याची माहिती महापालिकेचे निवडणूक अधिकारी आणि उपायुक्त सतीश कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी ५० टक्के आरक्षण असल्याने सर्वसाधारण आणि आरक्षित जागांमध्ये ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव असतील, असे कुलकर्णी यांनी सांगितले.
आरक्षणाची सोडत काढण्यासाठी संबंधित प्रभागांच्या चिठ्ठ्या काढण्यात येणार आहेत. शाळेतील मुलांच्या हस्ते चिठ्ठी काढून आरक्षण निश्चित केले जाणार आहे. ज्या प्रभागात अनुसूचित जातीच्या नागरिकांची संख्या अधिक आहे, तेथील आरक्षण प्रथम जाहीर करण्यात येईल. उतरता क्रम लावून २२ आरक्षणे काढली जाणार आहेत. त्यानंतर दोन आरक्षणे अनुसूचित जातीची, त्यानंतर ओबीसी आणि उर्वरित एक जागा खुल्या गटासाठी असणार आहे.

प्रत्येक प्रभागात ‘ओबीसी’ आरक्षण
ओबीसी प्रवर्गासाठी लोकसंख्येनुसार ४४ जागा आरक्षित आहेत. मात्र, प्रभागांची संख्या ४१ आहे. त्यामुळे सर्वच ४१ प्रभागांमधील एक जागा ‘ओबीसीं’साठी आरक्षित असेल. या व्यतिरिक्त ज्या प्रभागांमध्ये एससी आणि एसटीचे आरक्षण नाही, अशा प्रभागांमध्ये ओबीसीच्या उर्वरीत तीन जागांचे आरक्षण असणार आहे. यामधील २२ जागा महिलांसाठी राखीव असतील.

सोडतीवेळी प्रभागरचना कळणार
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रभाग रचनेचा प्रारूप नकाशा १० ऑक्टोबरला प्रसिद्ध केला जाणार असला तरी, सोडतीच्या दिवशीच आरक्षणाची माहिती इच्छुकांना समजावी, यासाठी नकाशे लावले जाणार आहेत. गणेश कला क्रीडा मंच येथे ४१ प्रभागांचा मोठा नकाशा आणि प्रत्येक प्रभागाचे छोटे असे ४१ स्वतंत्र नकाशे लावले जाणार आहेत. १० ऑक्टोबरला पालिका अधिकृत नकाशे प्रसिद्ध करणार असल्याने २५ ऑक्टोबरपर्यंत नागरिकांनी हरकती, सूचना मांडाव्यात असे कुलकर्णी म्हणाले.

आरक्षण तक्ता
प्रवर्ग महिलांच्या जागा सर्वसाधारण गट एकूण
अनुसूचित जाती ११ ११ २२
अनुसूचित जमाती ०१ ०१ ०२
ओबीसी २२ २२ ४४
सर्वसाधारण ४७ ४७ ९४
एकूण ८१ ८१ १६२

Check Also

news-4

बारा हजार सेटटॉप बॉक्स

आवाज न्यूज नेटवर्क –  अहमदनगर – शहरी भागातात फेज थ्री मध्ये सेटटॉप बॉक्स बसविण्याची कार्यवाही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *