facebook
Sunday , April 23 2017
Breaking News
Home / Featured / डॉ.रावसाहेब कसबे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार प्रदान 

डॉ.रावसाहेब कसबे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार प्रदान 

आवाज न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी – सोमनाथ कड

पुणे : सध्या निघणारे मोर्चे, जटील प्रश्न आणि त्यांची उकल याविषयांवर सामान्यांमध्ये वैचारिक गोंधळ सुरु आहे. या गोंधळामध्ये आपण कोणत्या मार्गाने जायचे, हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. यामध्ये सरकारची भूमिका महत्त्वाची असली, तरी सरकारच्या भूमिकेवर लोकांना विश्वास नाही. दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी या घटनांची उदाहरणे ताजी आहेत. लोकहित कशामध्ये आहे,याचे सरकारला भान नाही. त्यामुळे समाजातील सध्याचा वाढता वैचारिक दहशतवाद मोडून काढण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.

मारवाडी फाऊंडेशन, नागपूरतर्फे टिळक रस्त्यावरील मराठा चेंबर आॅफ कॉमर्स येथील सभागृहात झालेल्या कार्यक्रमात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत डॉ.रावसाहेब कसबे यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे , माजी राज्यपाल डॉ.डी.वाय.पाटील, ज्येष्ठ विचारवंत माजी खासदार डॉ.भालचंद्र मुणगेकर, फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.गिरीश गांधी यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. पाच लाख रुपये, स्मृतीचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होते.

अशोक चव्हाण म्हणाले, आजच्या बदलेल्या काळात देखील डॉ.आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेचा उपयोग होतो. त्यांची दूरदृष्टी ही प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावी, अशीच आहे. परंतु लोकशाहीला पोषक असे वातावरण सध्या हरवत चालले आहे. यामध्ये जे चुकीचे घडत आहे, ते सांगण्याची ताकद विचारवंतांमध्ये आहे. त्यामुळे डॉ.कसबे यांच्यासारखे विचारवंत या वैचारिक प्रदूषणातून सामान्यांना वाट दाखविण्याचे काम यापुढेही करत राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

पुरस्काराला उत्तर देताना डॉ.रावसाहेब कसबे म्हणाले, सर्वसामान्य नागरिक जेव्हा संभ्रमात असतात, तेव्हा राजकीय लोक त्यांना अधिक संभ्रमित करतात. त्यांना प्रकाश दाखविण्याचे काम विचारवंत करतात. आज देशात अशांततेचे वातावरण आहे. महात्मा गांधी, पंडित नेहरु आणि डॉ.आंबेडकर हा तीन महापुरुषांची विस्मृती आपल्याला झाली आहे. त्यामुळे भविष्यकाळ अंधारात जाण्याची भिती आहे. आज मराठा समाजातील तरुण मोर्चाद्वारे मागण्या करीत आहेत. हा जाती-धर्माचा संघर्ष नसून नव्या समाजशक्तींचा संघर्ष आहे. त्यांना ब्राह्मण आणि दलितांविरोधात चुकीच्या पद्धतीने फसविले जात आहे. हे प्रश्न लवकर सुटले नाहीत, तर तरुण पिढी मोठ्या प्रमाणात पुढे येऊन प्रश्न विचारेल, असेही त्यांनी सांगितले.

 

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *