facebook
Sunday , April 30 2017
Breaking News
Home / Featured / नाशिकमध्ये वाढला तणाव ,व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनला अटक

नाशिकमध्ये वाढला तणाव ,व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनला अटक

सोशल मीडियाच्या गैरवापरप्रकरणी अंबड पोलिसांनी सर्वाधिक चार जणांना, गंगापूर पोलिसांनी दोघांना, तर सातपूर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. हे सर्व व्हॉट्सअॅप ग्रुपचे अॅडमिन असल्याची माहिती या वेळी पोलिसांनी दिली. दोन समाजांत तेढ निर्माण करणे, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण करणे, तसेच दंगा भडकविण्यास कारणीभूत ठरल्याचे व सायबर अॅक्टअंतर्गतचे गुन्हे या सर्व आठ जणांवर दाखल करण्यात आले आहेत. अनेकांनी मेसेज, तसेच फोटोंची खात्री न करता ते पुढील व्यक्तींना पाठवून दिले. त्यामुळे अशा व्यक्तींनाही पोलिस स्टेशनमध्ये बोलावण्यात येऊन समज देण्यात येणार आहे. फेसबुकचाही या काळात गैरवापर करण्यात आला असून, एक गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉ. सिंघल यांनी दिली. मोबाइल इंटरनेटवर शनिवारी दुपारी एकपर्यंत बंदी असल्याची माहितीही देण्यात आली आहे.

 

तळेगाव अंजनेरी येथील घटनेनंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या व्हॉट्सअॅपवरील सात ग्रुप अॅडमिनसह आठ जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यातील सर्व ग्रुप अॅडमिनना अटक करण्यात आली आहे. सोशल मीडियाचा गैरवापर केल्याबाबत पोलिसांनी गेल्या पाच ‌दिवसांत ही कारवाई केली आहे. अत्याचाराची घटना ज्या तळेगाव अंजनेरीत घडली तेथील एका ग्रुप अॅडमिनचा यात समावेश असल्याची माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक चौबे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल उपस्थित होते.

दोन अधिकारी रडारवर

शहरात निर्माण झालेली दंगलसदृश परिस्थिती हाताळताना दोन पोलिस अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद राहिल्याच्या तक्रारी पोलिस आयुक्त डॉ. सिंघल यांच्याकडे करण्यात आल्या आहेत. तणाव निवळला की याबाबतची चौकशी केली जाणार आहे. पक्षपातीपणे कारवाया करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही सिंगल यांनी दिली आहे.दंगलीचे व्हिडीओ शूटिंगही!

दंगलसदृश परिस्थितीत शहरात पाच लोक जखमी झाले असून, त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. गोंधळाची, तसेच दंगलसदृश परिस्थिती जेथे जेथे निर्माण झाली त्या ठिकाणचे व्हिडीओ शूटिंग पोलिसांनी केले आहे. त्यावरून संशयितांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून, संबंधितांवर कारवाई केली जात असल्याची माहिती डॉ. सिंघल यांनी दिली.

अॅट्रॉसिटीचे सात गुन्हे दाखल

तळेगाव अंजनेरी येथे अल्पवयीन मुलीवरील बलात्काराचे शहरासह जिल्ह्यात जोरदार पडसाद उमटले. ही सर्व परिस्थिती हाताळताना ग्रामीण पोलिसांनी सर्वाधिक २७ गुन्हे दाखल केले असून, त्यापैकी २३ प्रकरणांमध्ये ८२ संशयितांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये सहा गुन्हे जातिवाचक शिवीगाळीचे आहेत, तर उर्वरित गुन्हे दंगल, सरकारी कामात अडथळा, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन अशा स्वरूपाचे आहेत.

५३ गुन्हे; ११८ संशयितांना अटक

गेल्या रविवारपासून जिल्ह्यात दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने शहर व ग्रामीण पोलिसांनी एकूण ५३ गुन्हे दाखल केले असून, ११८ संशयितांना अटक करण्यात आली आहे. पोलिस निष्पक्षपातीपणे हे प्रकरण हाताळत असून, कायदा आणि सुव्यवस्था हातात घेणाऱ्या कुणाचीही गय केली जाणार नाही, अशी ग्वाही पोलिस आयुक्त डॉ. सिंघल आणि विशेष पोलिस महानिरीक्षक चौबे यांनी दिली.

सोशल मीडियाचा गैरवापर करणाऱ्यांवर आम्ही गुन्हे दाखल करीत आहोत. आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्या जात असतील तर नागरिकांनी पोलिसांना माहिती द्यावी.

– डॉ. रवींद्र सिंघल, पोलिस आयुक्त

जिल्ह्यात परिस्थिती नियंत्रणात आहे. कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. प्राप्त सूचनांचीदेखील आम्ही निश्चितपणे दखल घेऊ.

– विनयकुमार चौबे, विशेष पोलिस महानिरीक्षक

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *