facebook
Thursday , April 27 2017
Breaking News
Home / Featured / केएमटी कर्मचाऱ्यांनी पुकारला बेमुदत संप सुरू

केएमटी कर्मचाऱ्यांनी पुकारला बेमुदत संप सुरू

आवाज न्यूज नेटवर्क –

कोल्हापूर : शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेल्या केएमटीच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे जनजीवन कोलमडणार आहे. सहावा वेतन आयोग लागू करावा या प्रमुख मागणीसाठी केएमटीचे एक हजारहून अधिक कर्मचारी गुरुवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर गेले आहेत. संपामुळे दैनंदिन एक लाख प्रवाशांच्या वाहतुकीचा प्रश्न निर्माण होणार आहे. सध्या माध्यमिक शाळांच्या सहामाही परीक्षा सुरू आहेत. उपनगरासह आसपासच्या गावातून सुमारे दहा हजार पासधारक विद्यार्थी केएमटीमधून ये-जा करतात. संपामुळे विद्यार्थ्यांच्या वाहतुकीची समस्या उभी ठाकणार आहे. महापालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवारी (ता. २०) आहे. सभेवेळी सकाळी दहा वाजता कर्मचारी मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी निदर्शने करणार आहेत. वाहक, चालक, आस्थापना आणि वर्कशॉप विभागातील सर्व कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.

बुधवारी सायंकाळी बहुतांश कर्मचारी ड्यूटी संपवून शाहू क्लॉथ मार्केट येथील केएमटीच्या मुख्य कार्यालयासमोर जमले. संघटनेचे अध्यक्ष निशिकांत सरनाईक, राजेंद्र तिवले, प्रमोद पाटील, विश्वनाथ चौगुले, मनोज नार्वेकर, बापू भोसले, अमर पाटील, के. व्ही. जाधव,डी. एस. माळी यांच्या उपस्थितीत तेथे निदर्शने झाली. सहावा वेतन आयोग लागू करावा, दरमहा २५ तारखेपूर्वी वेतन मिळावे, पीएफ, अल्पबचत खात्यावरील फरकाची रक्कम तत्काळ मिळावी अशा विविध मागण्या कर्मचारी संघटनेने केल्या आहेत. संघटनेने प्रशासनाला याबाबत पाच ऑक्टोबरलाच संपाची नोटीस दिली होती. त्यानंतर या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी आयुक्त, केएमटी प्रशासन आणि कर्मचारी प्रतिनिधींची सोमवारी (ता. १७ ऑक्टोबर) चर्चा झाली. यात सहाव्या वेतन आयोगाचा विषय वगळता अन्य मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली. संघटना सहावा वेतन आयोग लागू करण्यावर ठाम राहिल्याने चर्चा फिसकटली.

दरम्यान, आयुक्त पी. शिवशंकर हे कार्यालयीन कामानिमित्त मंगळवारपासून मुंबईत आहेत. परिणामी गेले दोन दिवस प्रशासकीय पातळीवरून अन्य कोणत्याच अधिकाऱ्यांनी कर्मचारी संघटनेशी चर्चा केली नाही. केएमटीचे अतिरिक्त व्यवस्थापक संजय भोसले यांनी मंगळवारी मान्यताप्राप्त कर्मचारी संघटेनेचे अध्यक्ष निशिकांत सरनाईक यांना संप मागे घेण्याविषयी पत्र दिले. मात्र सरनाईक यांनी, ‘कर्मचारी सहावा वेतन आयोगाच्या मागणीसाठी आक्रमक आहेत. प्रशासनाने ठोस निर्णय होत नसल्याने संप अटळ आहे’ असे सांगितले.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *