facebook
Monday , February 27 2017
Breaking News
Home / Featured / गडांवरच्या तोफा तस्करांच्या रडारवर

गडांवरच्या तोफा तस्करांच्या रडारवर

आवाज न्यूज नेटवर्क –

पुणे – कधीकाळी भडिमार करीत गरजणाऱ्या आणि शत्रूचे आक्रमण रोखणाऱ्या गडांवरच्या तोफा ऊन-वारा-पाऊस आणि अक्षम्य दुर्लक्ष यामुळे जाया झाल्या. याच तोफांकडे आता तस्कर आणि भुरट्या चोरांची नजर वळली आहे. गडांवरच्या तोफांमागे चोरीचे शुक्लकाष्ट लागले असून, दिवसेंदिवस त्या गायब होण्याचे प्रकार वाढले आहेत. राज्य सरकार, पुरातत्त्व विभाग आणि स्थानिकांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष केल्यानेच तस्करांचे फावते आहे.

लोखंडासह पंचधातूच्याही तोफा आढळत असल्याने त्यांची चोरी होत आहे. मध्यंतरी मराठवाड्यातील औसा या राज्य पुरातत्त्व खात्याच्या ताब्यात असणाऱ्या गडावरील मौल्यवान तोफ चोरीला गेल्यावर राज्य सरकार आणि पुरातत्त्व खात्याला खडबडून जाग आली होती. मात्र, त्यानंतर कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही. पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यासह मराठवाडा, विदर्भ आणि कोकणातील महत्त्वाच्या गडांवरच्या तोफा अद्याप उपेक्षित आहेत. नुकत्याच कोकणातील रामगड (जि. सिंधुदुर्ग) येथील चार तोफा चोरीला गेल्या असून, त्याबाबतची साधी तक्रारही कुठे नोंदवण्यात आलेली नाही. या तोफा मुंबई, दिल्लीच्या चोर बाजारात आणि तिथून ‘अँटिक कलेक्शन’ करणाऱ्यांकडे तसेच तिथून श्रीमंतांचे बंगले, फार्महाउस आणि हॉटेलमध्ये जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याबाबत तोफांचे अभ्यासक आणि दुर्ग संवर्धन समितीचे सदस्य डॉ. सचिन जोशी म्हणाले, ‘तोफांच्या चोरीचा प्रकार गेल्या चार ते पाच वर्षांपासून वाढला आहे. मूळातच राज्यातील अनेक गड संरक्षित नाहीत त्यामुळे असंरक्षित गडांवर सरकार किंवा पुरातत्त्व विभागाला काही काम करता येत नाही. त्यामुळे समितीने पुरातत्त्व खात्याला ८३ गडांची यादी दिली होती. गड संरक्षित झाले तरच या तोफांचे रक्षण करता येईल. ८३ गड संरक्षित करणे आणि तोफांचे जतन या दोन विषयांबाबत राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांना सविस्तर ई-मेल केला असून, त्यांच्याकडे वेळही मागितली आहे.’

‘तोफांना नाही वाली’

नाशिकजवळच्या हरगडला तेरा टन वजनाची तोफ आहे. त्याची एक रिंग चोरट्यांनी कापून नेली आहेत. उरलेल्या रिंग कापल्या तर, भविष्यात तिथे काहीच शिल्लक राहणार असेही दुर्ग संवर्धन समितीचे सदस्य डॉ. सचिन जोशी यांनी सांगितले. जोशी यांनी विविध गडांवरील २३८ तोफांचे ड्रॉइंग आणि मॅपिंग केले आहे. यापूर्वी धातूतज्ज्ञ बालसुब्रमण्यम यांनी देशभरातील महत्त्वाच्या ठिकाणी असणाऱ्या तोफांचे ड्रॉइंग आणि माहिती संकलन केले आहे. ते पाहूनच २३८ तोफांवर काम केल्याचे जोशी यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर आपला वारसा सांभाळण्यासाठी प्रशासनासह स्थानिकांनीही दक्ष राहणे गरजेचे आहे.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *