facebook
Monday , February 27 2017
Breaking News
Home / Featured / गोदाकाठी समृद्धीची छटपूजा

गोदाकाठी समृद्धीची छटपूजा

आवाज न्यूज नेटवर्क –

नाशिक – घरात सुखशांती लाभू दे, धनधान्य, समृद्धी मिळू दे, अशी प्रार्थना करीत नाशिक शहर व परिसरातल्या हजारो उत्तर भारतीय दाम्पत्यांनी गोदावरी किनारी रविवारी छटपूजा केली. कार्तिक महिन्याच्या सहाव्या दिवशी ही पूजा करण्यात येते. रविवारी सायंकाळी झालेल्या विशेष कार्यक्रमाला उपमहापौर गुरुमित बग्गा, पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल, विनिता सिंघल आदी या वेळी उपस्थित होते.

आगामी काळात घरात सुखशांती समृद्धी नांदावी, यासाठी उत्तर भारतीयांतर्फे रामकुंडावर छटपूजा करण्यात आली. पूजेसाठी घरातल्या अबालवृद्धांपासून हजारो नागरिक नाशिकरोड, देवळाली कॅम्प, भगूर, सातपूर, सिडको, अंबड या भागातून आपल्या कुटुंबासह आले होते. सूर्यास्ताच्या वेळी महिलांनी पाण्यात उभे राहून मावळत्या सूर्याला अर्ध्य दिले. शेतात पिकत असलेल्या सर्व फळांचा नैवेद्य दाखवून सूर्याची प्रार्थना करण्यात आली. पूजेसाठी टोपल्यातून फळे आणण्यात आली होती. त्यात सर्व प्रकारच्या भाज्या, सफरचंद, केळी, अननस इत्यादींचा समावेश होता, तसेच घरात तयार केलेल्या मिष्टांन्नांचा नैवेद्य दाखवण्यात आला. आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्या, यासाठी काही लोकांनी अर्ध्य दिले, तर काहींनी नवसपूर्ती झाली म्हणून पूजा केली. या वेळी सूर्याच्या १०८ वेळा जप करण्यात आला. या पूजेसाठी घरातल्या महिलांनी ४८ तासांपासून पाणी न पिता उपवास केले होते. या पूजेची सांगता सोमवारी पहाटे (७ नोव्हेंबर) सूर्य उगवण्याच्या वेळेस होणार असून, त्या वेळी सूर्याला दुधाचे अर्घ्य दाखविण्यात येणार आहे. रामकुंड परिसरात महापालिकेच्या वतीने तयारी करण्यात आली होती. गणराज्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व संत गाडगे महाराज कनोजिया धोबी मंडळातर्फे लोकसंगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या वेळी महापौर गुरुमित बग्गा म्हणाले, की उत्तर भारतीयांतर्फे छटपूजा होते. त्यामुळे एक धार्मिक वातावरण तयार झाले आहे. या पूजेमुळे प्रत्येकाच्या मनातील इच्छा निश्चित पूर्ण होतील. या वेळी पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल म्हणाले, की छटपूजेमुळे गोदावरी किनारी एक प्रकारची ऊर्जा, स्फूर्ती संचारली असून, यामुळे प्रत्येकाच्या मनात धार्मिक सलोख्याचे वातावरण तयार झाले आहे. या ऊर्जेमुळे शहराची, देशाची प्रगती होण्यास निश्चित हातभार लागेल, यात शंका नाही.

फटाक्यांची आतषबाजी

सूर्य अस्ताला जात असताना ढोल वाजवले जात होते, तर पुरुषांनी फटाक्यांची आतषबाजी केली. व्हिक्टोरिया पूल ते टाळकुटेश्वर मंदिरापर्यंतचा परिसर दुमदूमून गेला होता.

जेलरोडला प्रथमच छटपूजा

नाशिकरोड ः जेलरोड येथे प्रथमच छटपूजा होणार आहे. जेलरोडच्या गोदावरी घाटावर सोमवारी पहाटे पाच ते आठदरम्यान हा कार्यक्रम होणार आहे. भाजपच्या प्रभाग ३५ च्या नगरसेविका मंदाताई ढिकले आणि अरुण ढिकले यांनी या पूजेचे आयोजन केले आहे. या वेळी उत्तर भारतीयांची बैठक झाली. बैठकीस संयोजक राजेंद्र सावंत, राजेंद्र ढिकले, संजय पवार, विलास रामराजे, किरण आहिरे आदी उपस्थित होते. नाशिकरोडला उत्तर भारतीयांची संख्या वाढली आहे. जेलरोडच्या प्रभाग ३५ मध्ये सुमारे सातशे उत्तर भारतीय राहतात. नगरसेविका ढिकले यांच्या पुढाकाराने घाटावर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली असून माईक, मंडप, पिण्याचे पाणी आदी सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. नाशिकरोड, जेलरोड परिसरातील उत्तर भारतीय दरवर्षी पंचवटीत रामकुंडावर छटपूजेसाठी जातात. मात्र, तेथे गर्दी असते. पंचवटीतील गोदावरी जेलरोडहून वाहते, असे सांगून जेलरोडच्या गोदाघाटावर पूजा करण्यासाठी उत्तर भारतीयांचे मतपरिवर्तन करण्यात आले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *