facebook
Saturday , April 29 2017
Breaking News
Home / Featured / शहराचा वारसा जपण्याची गरज

शहराचा वारसा जपण्याची गरज

आवाज न्यूज नेटवर्क –

 पुणे –  ऐतिहासिक नगरीची बिरुदावली मिळवलेल्या, सांस्कृतिक वाटचालीत अग्रभागी असणाऱ्या, पुरोगामी चळवळींमध्ये नेहमी पुढाकार घेतलेल्या पुण्याचे नाव जागतिक नकाशावर कोरले गेले आहे. स्मार्ट सिटीची स्वप्ने पाहाताना शहराच्या सांस्कृतिक बाजाला धक्का लावता कामा नये. ऐतिहासिक वास्तूंचे कोंदण लाभलेल्या पुण्याचा नावलौकिक सर्वदूर पोहोचविण्यासाठी महापालिकेने वारसा संवर्धनाचा स्वतंत्र आराखडा तयार करावा, अशी अपेक्षा पुण्यातील वारसा अभ्यासक आणि पर्यटन व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
आगामी महापालिका निवडणुकीत पुणे शहराच्या विकासाच्या दृष्टीने आश्वासनांचा पाऊस पडणार आहे. यातून वर्षानुवर्षे रखडलेले बांधकाम प्रकल्प, मुबलक पाणी, सार्वजनिक व्यवस्था सुधारण्यासाठी अनेक उत्तमोत्तम पर्याय पुढे येतील. पण, यात शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन, पर्यटनाला चालना देणाऱ्या उपक्रमांची कधीही चर्चा होताना दिसत नाही. आपल्या प्रभागातील वारसा स्थळे, पर्यटनक्षेत्रांच्या संवर्धनाचा मुद्दा अजेंड्यात घ्यावा, असे एकाही उमेदवाराला वाटत नाही. चोहोबाजूला विस्तारलेल्या उंचच्या उंच इमारती ही पुण्याची ओळख नसून, मध्यवर्ती शहरातील ऐतिहासिक वास्तू, शैक्षणिक संस्था, मंदिरे आणि तिथे घडलेला इतिहास ही या शहराची खरी ओळख आहे. या वारसास्थळांचे संवर्धन आणि पर्यटनाकडे गांभीर्याने बघितलेच पाहिजे. हे काम सर्वसमावेशक आणि परिपूर्ण करण्यासाठी निर्णय प्रक्रियेत अभ्यासक, संस्थाचालकांना सहभागी करून घेण्याची गरज आहे. शहरातील पर्यटन ही चळवळ झाली पाहिजे, असे स्पष्ट मत या वेळी व्यक्त करण्यात आले.
पुणे महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारराजा असलेल्या सामान्य नागरिकांसह विविध घटकांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’ने पुढाकार घेतला आहे. शहरातील वारसास्थळांचे संवर्धन आणि पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांची मते ‘मटा’ने जाणून घेतली. अपुरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, पर्यटनस्थळांची अस्वच्छता, वारसास्थळांच्या जतनाबद्दल प्रशासकीय पातळीवर असलेले नैराश्य, पर्यटकांना मिळणाऱ्या अपुऱ्या सुविधा अशा विविध मुद्द्यांवर उपस्थितांनी परखडपणे मते नोंदविली.
……..
किशोरी गद्रे
सल्लागार जनवाणी संस्था
नागरिक असो वा प्रशासकीय व्यवस्था, प्रत्येकालाच स्वतःच्या शहराचा अभिमान असतो. पर्यटकांना शहराचा वारसा सांगताना लोक भरभरून बोलतात. आपल्याकडे प्रशासकीय पातळीवर याबद्दल मात्र निराशा दिसते. विमानतळावर उतरल्यावर पर्यटकाला पुणे म्हणजे काय याची सचित्र माध्यमातून प्रचिती येणे अपेक्षित असते. शहराचे नकाशे, येथील प्रेक्षणीय स्थळांची माहिती, सहलींचे पॅकेज आदी बाबी पर्यटकाला पुण्यात पाय ठेवल्यावर तत्काळ उपलब्ध झाले पाहिजे, पण तसे होत नाही. आपण पर्यटकांच्या आदारातिथ्याच्या दृष्टीने विचार करत नाही. दुसरी महत्त्वाची बाजू म्हणजे ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनाच्या बाबतीत महापालिका आणि लोकप्रतिनिधी उदासीन आहेत. मध्यवर्ती पुण्याचे चित्र आज वेगाने बदलते आहे. वाडा संस्कृती झपाट्याने लोप पावत आहे. हे असेच सुरू राहिले तर पुढच्या पिढीला आपण नक्की काय दाखविणार, याचा विचार अजूनही झालेला नाही. पुण्याचे अस्तित्व जपायचे असले तर शहरात हेरिटेज कॉरिडॉर निर्माण झाले पाहिजेत. मध्यवर्ती पुण्यातील वाडे, ऐतिहासिक वास्तूंना वाचविण्यासाठी प्रशासनाने बांधकाम परवानग्यांच्या धोरणांमध्ये ठोस बदल करण्याची गरज आहे. तेथील रहिवाशांना योग्य तो मोबदला देऊन वाडा संस्कृतीला वाचविले पाहिजे. स्मार्ट सिटीच्या दिशेने पावले उचलताना मूळ पुण्याला संपविणे योग्य नाही. अन्यथा सांस्कृतिक पुणे म्हणजे काय हे पुस्तकातून वाचण्याची वेळ येईल.

…………….

नीलेश भन्साळी

संचालक, पुणे ट्रॅव्हल एजंट असोसिएशन

नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने अनेक पर्यटक पुण्यात येतात. त्यांना शहरात फिरण्याची, माहिती जाणून घेण्याची इच्छा असते, पण त्यांना सहलीची आकर्षक पॅकेज मिळत नाहीत. अपुऱ्या वाहतूक व्यवस्थेमुळे ते नकाशा घेऊन एकट्याने सुरक्षित प्रवास करू शकत नाहीत. प्रेक्षणीय स्थळे पाहताना त्यांना पटकन गाइड उपलब्ध होत नाहीत; एवढेच कशाला शहरातून परतताना आठवण म्हणून एखादे कॉफीटेबल बुकदेखील आपण त्यांना देऊ शकत नाही. सर्वाधिक पर्यटन करणारे नागरिक अशी पुणेकरांची इतर राज्यात ओळख आहे. आपले लोक जगभ्रमंती करतात; तेथील आदरातिथ्याचे गोडवे गातात. मात्र, आपल्याकडे येणाऱ्या पर्यटकांना स्थानिक प्रशासन कोणतीही सुविधा चांगल्या पद्धतीने देऊ शकत नाही, ही शोकांतिका आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी महापालिकेने या क्षेत्रातील तज्ज्ञ, संस्थाचालक, अभ्यासकांचे एकत्रित व्यासपीठ सुरू करावे. पर्यटनाची दिशा ठरवून कायमस्वरूपी योजना प्रत्यक्षात येण्याची गरज आहे. त्या दृष्टीने प्रयत्नही करणे आवश्यक आहे.

…………………

देवेंद्र गोगटे

निसर्ग पर्यटन व्यावसायिक, फोलिएज आउटडोअर्स

पुणे परिसरातील टेकड्या, नदी, उद्यानांमध्ये निसर्ग सौंदर्याची खाण दडलेली आहे. शहरात अजूनही मुबलक प्रमाणात पक्षीवैविध्य पाहायला मिळते. आपल्याकडे खूप काही सांगण्यासारखे आहे. निसर्गभ्रमंतीची आवड असलेल्या उत्साही मंडळींसाठी शहरात उत्तमोत्तम सहलींचे नियोजन करता येऊ शकते. या पूर्वी असे प्रयोगही झाले. पण, दुर्दैवाने या सर्व ठिकाणी असलेली असुरक्षितता आणि अस्वच्छतेमुळे पर्यटक संभ्रमात पडतात. टेकड्यांवर भटकंतीसाठी गेलेल्यांना असुरक्षित वाटते. या बहुतांश ठिकाणी उत्तम माहितीफलक नाहीत की स्वच्छतागृहांसारखी प्राथमिक सुविधा नाही. परिणामी, इथे सहज दिसणारे पक्षी बघण्यासाठी लोक तास-दोन तासाचा प्रवास करून दुसऱ्या ठिकाणी जाण्यावर भर देतात. पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी सोशल नेटवर्किंग साइट, मॉल, मल्टिप्लेक्समध्ये जाऊन प्रचार, प्रसाराची आवश्यकता आहे.

….

दया सुदामा

केंद्र सरकारच्या शहरातील अधिकृत गाइड

पुण्याबद्दल परदेशी पर्यटकांमध्ये आदराची भावना आहे. त्यांना फिरताना कुतहूल वाटते. पण, अपुऱ्या सुविधांमुळे पर्यटक नाराज होतात. दररोज शेकडो पर्यटकांचा राबता असताना बहुतांश पर्यटन स्थळांजवळ आजही स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा नाहीत. पार्किंगसाठी गल्लोगल्ली फिरावे लागते. पर्यटकांना रिक्षाचालक सहकार्य करीत नाहीत. परदेशी पर्यटकांची पैशांवरून सर्रास फसवणूक होते. शहराचा नकाशा पटकन उपलब्ध होत नाही. मंदिरे, ऐतिहासिक वास्तूंच्या बाहेर उत्तम दर्जाचे माहिती फलकही पाहायला मिळत नाहीत. किती ही उदासीनता…पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटकांच्या आदरातिथ्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत.

….

साईली पलांडे–दातार

वारसा अभ्यासक

पुणे शहराचे व्यापक आणि परिपूर्ण चित्र मांडण्यात आजही आपण मागे आहोत. संस्कृती, ऐतिहासिक वारसा, देशपातळीवर गाजलेल्या चळवळींची समृद्ध परंपरा शहराला लाभली आहे. त्याचे एकत्रित डॉक्युमेंटेशन, प्रभावीपणे मांडण्यात प्रशासन कमी पडते आहे. महापालिकेच्या हेरिटेज सेलने केलेल्या वारसा स्थळांच्या यादीतील स्थळांना वाचविण्यासाठी अपेक्षित अंमलबजावणी झालेली नाही. या यादीत काही महत्वाच्या ठिकाणांचा समावेश करणे गरजेचे आहे. मध्यवर्ती पुण्यातील वाडे वाचविण्यासाठी ठोस भूमिका घेऊन रेंगाळलेली प्रकरणे तातडीने निकालात काढणे आवश्यक आहे. हेरिटेज सेलचे काम अधिक व्यापक करण्यासाठी त्याला स्वतंत्र विभागाचा दर्जा दिला पाहिजे. आपल्या शहराचा वारसा प्रगल्भ असून, तो पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शाश्वत पर्यटनाचा आराखडा तयार करावा. ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी प्रशासकीय पातळीवर ठोस आणि नेमकेपणाने पावले उचलावीत. वारसा संवर्धनाला चळवळीचे रूप देण्याची वेळ आली आहे.

…..

डॉ. मंजिरी भालेराव

सहयोगी प्राध्यापिका, संस्कृत आणि भारतीय विद्याविभाग, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ

शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि त्याचे महत्त्व इतरांपर्यंत पोहोचविण्यात आपण खूप मागे पडतो आहोत. अलीकडे पर्यटक खूप जागरूक झाला असून त्याच्या अपेक्षाही वाढल्या आहेत, त्या पूर्ण करण्यामध्ये महापालिकेचे काम निराशाजनक आहे. इतर शहरांच्या तुलनेत पर्यटनाला बळ देणाऱ्या कोणत्याही प्रभावी योजना प्रशासन स्तरावर आपल्याकडे राबविल्या जात नाहीत. सध्याच्या इंटरनेट आणि सोशल नेटवर्किंगच्या काळात महापालिकेने अद्याप शहराचा इतिहास सांगणारी, पर्यटन स्थळांची माहिती देणारी परिपूर्ण वेबसाइट सुरू केलेली नाही, ही दुर्देवाची बाब आहे. शहरात प्रचंड वैविध्य असून, वेगवेगळ्या माध्यमातून पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आक्रमक झाले पाहिजे. यासाठी इंटरनेटबरोबरच विमानतळ, रेल्वे, स्टेशन, सार्वजनिक ठिकाणी माहितीचे फलक किंवा फोटो, फिल्म्सच्या माध्यमातून शहराचे महत्व अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविणे शक्य आहे.

……………

प्राजक्ता पणशीकर

वारसा अभ्यासक, जनवाणी संस्था

महापालिकेच्या गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या विकास आराखड्यामध्ये शहराच्या वारसा स्थळांच्या संवर्धनाचा समावेश करण्यात आला आहे. पण, सरकारकडून मान्यता मिळेपर्यंत यातील काही स्थळे नष्ट होतील अशी भीती आहे. महापालिकेच्या हेरिटेज सेलचा कारभार उदासीन आहे. त्यांनी केलेल्या अधिकृत वारसा स्थळांच्या यादीत अद्या अनेक स्थळांच्या नोंदी नाहीत. यातील काही वारसा स्थळे नष्ट झाली आहेत तर, काही धोक्यात असून त्यांना तातडीने वाचविण्याची गरज आहे. शहरातील समृद्ध ऐतिहासिक वारसा पाहता आज महापालिकेकडे वारसा संवर्धनाचा स्वतंत्र विभाग असणे आवश्यक आहे. महापालिकेने वारसा संवर्धनाचे धोरण तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी.

..

काय करायला हवे?

– सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम हवी.

– शहराच्या विकासात वारसा स्थळांच्या संवर्धनाला प्राधान्य द्यावे.

– ऐतिहासिक आणि पर्यटनस्थळांजवळ स्वच्छतागृहांची उभारणी आवश्यक.

– वारसास्थळांच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष दिले पाहिजे.

– पर्यटकांसाठी ठिकठिकाणी मराठी, इंग्रजी भाषेत माहिती फलक हवेत.

– प्रवेशशुल्काबरोबर संबंधित ठिकाणी माहितीपत्रके उपलब्ध करावीत.

– पुणे दर्शनच्या बसमध्ये थीम बेस्ड सहली असाव्यात.

– विमानतळ, रेल्वेस्टेशनन, पंचतारांकित हॉटेलमध्ये पुणे पर्यटनाचे साहित्य हवे.

– महापालिका, टूर ऑपरेटर आणि गाइड यांच्यातील संवाद वाढवावा.

– मॉल, हॉटेल्स, सार्वजनिक ठिकाणे पुणे पर्यटनाच्या व्हिडिओ क्लिप लावल्या पाहिजेत.

– पुणे दर्शनसह पर्यटकांचा प्रवासासाठी स्वतंत्र पर्याय उपलब्ध असावेत.

– पुणे पर्यटनाची वेबसाइट अद्ययावत आणि सोशल नेटवर्किंग साइटवरील सहभाग वाढवावा.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *