facebook
Thursday , February 23 2017
Breaking News
Home / Featured / शिस्तबद्ध शक्तिप्रदर्शन

शिस्तबद्ध शक्तिप्रदर्शन

आवाज न्यूज नेटवर्क –

मुंबई – मुंबई मधील मराठा महामोर्चाची तारीख अद्याप गुलदस्त्यात असली तरीही या महामोर्चाची रंगीत तालीम म्हणून ‘मराठा क्रांती मूक मोर्चा’ने रविवारी मुंबईत आयोजित केलेल्या बाइक रॅलीमध्ये मराठा समाजाच्या शिस्तबद्ध शक्तिप्रदर्शनाचे दर्शन घडले. हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूर येथे मराठा समाजाचा मोर्चा धडकणार असला तरीही तोपर्यंत समाजाच्या एकजुटीची धग ओसरू नये यासाठी बाइक रॅलीच्या रूपाने आयोजन समितीने हा जागृती मोर्चा घेतला होता. सकाळी ९.३०च्या सुमारास शीव-चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानात जिजाऊ वंदना करून मोर्चाची सुरुवात झाली. महिलांच्या हाती मोर्चातील बाइकचे सारथ्य असले तरीही प्रत्यक्ष नोंदणीपेक्षा महिलांचा सहभाग कमी होता.

‘मी मराठा एक लाख मराठा’, असे काळ्या रंगाचे टीशर्ट घातलेल्या,पारंपारिक वेशभूषेतील महिला, डोक्यावर भगवे फेटे व हातात भगवे झेंडे घेतलेले हेल्मेटधारी बाइकस्वार सकाळी नऊच्या सुमारास सोमय्या मैदानावर जमण्यास सुरुवात झाली. राज्यात ठिकठिकाणी झालेल्या मराठा मोर्चाने जी शिस्त पाळली आहे, त्याच शिस्तीचे पालन येथे करायचे आहे, अशा सूचना वारंवार आयोजकांकडून दिल्या जात होत्या. भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांच्या सहभागाने भाजपचा या मोर्चाला पाठिंबा असल्याचे प्रतित होत होते, मात्र शेलार यांनी ‘मराठा’ या नात्यानेच मोर्चात सहभागी झाल्याचे सांगितले. असंख्य शिवसैनिकांनी दादर, परळ, लालबाग या भागात या रॅलीला जोडून घेतले. सोमय्या मैदानवरून निघालेली ही रॅली सायन सर्कलवरून लोकमान्य टिळक रुग्णालय, माटुंगा सर्कल, दादर,परळ , लालबाग, भायखळ्याहून थेट सीएसटी रेल्वे स्थानकासमोर पोहचली.

ठाणे, नवी मुंबई, पालघर, डहाणू येथून आलेला मराठा समाजही रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. ‘एक मराठा लाख मराठा’ या घोषणांसह ‘मराठा एकटा नाही मराठा एकता’, ‘कुणासाठी, कशासाठी जिजाऊंच्या लेकींसाठी’चा दमदार नारा देत ही भव्य रॅली शिस्तबद्ध पद्धतीने पुढे सरकत होती. आरक्षणाच्या मागणीसह कोपर्डीतील घटनेतील आरोपींना कडक शिक्षा व्हायला हवी,अॅट्रॅासिटी कायद्यातील जाचक अटी रद्द व्हाव्या या मागण्या यावेळी करण्यात आल्या. स्वयंसेवकांनी मोर्चाच्या शिस्तीला कुठेही गालबोट लागणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली. सीएसटी येथे शिवाजी महाराजाच्या प्रतिमेला महिलांच्या हस्ते पुष्पवंदना करून या मोर्चाची सांगता झाली. मोर्चा संपल्यानंतरही आंदोलनाची पुढील रणनिती ठरवण्यासाठी सोशल मिडियावरून नव्याने संदेशवहन जोमात सुरू झाले होते.

‘शासनासोबत चर्चेला यावे’

मराठा समाजाच्यावतीने आयोजित केलेल्या बाइक रॅलीचे शिस्तबद्ध आयोजन केल्याबद्दल मराठा समाज आरक्षण समितीचे अध्यक्ष व शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मराठा समाजाचे जाहीर अभिनंदन केले. या बाइक रॅलीनंतर मराठा समाजातील मान्यवरांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शासनासोबत चर्चेसाठी पाठविले पाहिजे. मराठा समाजातील निवृत्त न्यायमूर्ती ज्येष्ठ कायदेपंडीत, ज्येष्ठ घटनातज्ज्ञ, समाज विश्लेषक व अन्य मंडळी या शिष्टमंडळासोबत शासनासोबत चर्चेला आले तर मराठा समाजाच्या मागण्यांची अंमलबजावणी अधिक परिणामकारक कशी करता येईल याची सविस्तर चर्चा होऊ शकते, असे मतही तावडे यांनी व्यक्त केले.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *