facebook
Sunday , April 23 2017
Breaking News
Home / Featured / आणखी पाच मुले उपचारासाठी दाखल

आणखी पाच मुले उपचारासाठी दाखल

आवाज न्यूज नेटवर्क –

 कोल्हापूर – शित्तूर पैकी मलकापूर (ता. शाहूवाडी) येथील आधार आश्रमशाळेतील आणखी पाच मुलांना सोमवारी (ता. ७) उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचबरोबर भाजून जखमी झालेल्या मुलीलाही खासगी रुग्णालयातून सीपीआरमध्ये हलवले आहे. गेल्या तीन दिवसात आधार आश्रमशाळेतील १३ मुले उपचारासाठी दाखल करण्यात आली आहेत. यातील दोघांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. दरम्यान, सोमवारी (ता. ७) सीपीआरच्या वैद्यकीय पथकासह जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनीही आधार आश्रमशाळेची पाहणी केली असून, संस्थेची मान्यता रद्द करण्यासह फौजदारीही दाखल होणार आहे.

शित्तूर येथील आधार आश्रमशाळेतील मतिमंद मुलाचा कुपोषणाने मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ निर्माण झाली आहे. प्रशासनासह लोकप्रतिनधींनीही या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून, सलग दुसऱ्या दिवशी प्रशासनाने आश्रमशाळेची झाडाझडती घेतली. सीपीआरमधील वैद्यकीय पथकासह जिल्हा परिषदेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सोमवारी दिवसभर आधार आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी केली. या तपासणीत बहुतांश मतिमंद मुलांना रक्तक्षय असल्याचे निदर्शनास आले आहे. याशिवाय मुलांच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण अत्यल्प आहे. ज्या मुलांना तातडीने उपचाराची गरज आहे, अशा पाच मुलांना वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. मोनिश भीमाप्पा (वय १६), गगनदीप राजकुमार (१२), राजनंदिनी केवत (१२), छोटी गीता (१२) आणि मंगल (१४) या पाच जणांवर सीपीआरमध्ये उपचार सुरू केले आहेत. दरम्यान, आठवड्यापूर्वी फटाक्यांमुळे भाजलेल्या फातिमा या मुलीस खासगी रुग्णालयातून सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. तिची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शनिवारी दाखल केलेले खुशी आणि कार्तिक या दोघांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.

सोमवारी दिवसभरात जिल्हा आरोग्य अधिकारी, शाहूवाडी तालुका अधिकारी बी. के. सरूडकर, सीपीआरमधील बालरोग तज्ज्ञ आणि जिल्हा परिषदेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने शित्तूर येथील आधार आश्रमशाळेची तपासणी केली. या तपासणीत अनेक अनियमित बाबी निदर्शनास आल्या आहेत. या पाहणीचा अहवाल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार आणि जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्याकडे पाठवला जाणार आहे. यानंतर आधार आश्रम शाळेवर कारवाई होईल. या घटनेमुळे जिल्ह्यातील आश्रमशाळांमधील भयावह वास्तव समोर आले असून, दर तीन महिन्यांनी होणाऱ्या शासकीय तपासणीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

चौकट

आश्रमशाळेत अधिकाऱ्यांचा ठिय्या

सोमवारी दिवसभर आश्रमशाळेत अधिकारी ठिय्या मारून होते. संस्थापक पंचरत्न पांडुरंग राजपाल यांच्याकडून आश्रमशाळेची माहिती घेऊन धर्मादाय आयुक्तालयाकडून घेतलेल्या संस्थेच्या परवानग्याही तपासण्यात आल्या. याशिवाय संस्थेला मिळालेल्या देणग्या आणि प्रत्यक्षात आश्रमशाळेतील मतिमंद मुलांवर होणाऱ्या खर्चाचा तपशीलही अधिकाऱ्यांनी तपासला. मुलांना अतिशय कमी प्रमाणात आणि निकृष्ट दर्जाचे अन्न मिळत असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे.

….

चौकट

संस्थेची मान्यता रद्द करा

आमदार राजेश क्षीरसागर यांनी सोमवारी सीपीआरमध्ये जाऊन उपचारासाठी दाखल केलेल्या मतिमंद मुलांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मतिमंद बालकांची हेळसांड करणाऱ्या संबंधित संस्थेवर फौजदारी दाखल करून ही संस्था कायमस्वरुपी बंद व्हावी यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार आहे, अशी माहिती आमदार क्षीरसागर यानी दिली. उपचारासाठी दाखल केलेल्या सर्व मतिमंद मुलांच्या उपचारात कोणतीही हयगय होऊ नये, अशा सूचना आमदार क्षीरसागर यांनी सीपीआरमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *