facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / Featured / एसटी चालकच करणार वाहकांचेही काम

एसटी चालकच करणार वाहकांचेही काम

आवाज न्यूज नेटवर्क –

अहमदनगर – एसटी महामंडळाच्या विनावाहक गाड्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आता थेट चालकांवरच वाढीव कामाचा बोजा टाकण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्यानुसार वाहकाचे लायसेन्स असणाऱ्या चालकांकडून वाहकाचेही काम करून घेतले जाणार आहे. विनावाहक गाड्या रस्त्यातील प्रवाशांनाही सेवा देणार असून या प्रवाशांना तिकीट देण्याचे काम चालकांना करावे लागणार आहे. दरम्यान, महामंडळाच्या या निर्णयाची नगर विभागात लवकरच अंमलबजावणी होणार असून पहिल्या टप्प्यात वाहकाचे लायसेन्स असणाऱ्या शंभर चालकांची नियुक्ती केली जाणार आहे.

प्रवाशांचा वेळ वाचण्यासाठी महामंडळाने राज्यभरात विनावाहक विनाथांबा गाड्या सुरू केल्या आहेत. या बसेस बसस्थानकावरून निघाल्यानंतर बसमध्ये जागा असली तरी कुठेच थांबत नाही. यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊन उत्पन्न कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच, प्रवाशांकडून विनावाहक बसेसच्या तक्रारी केल्या जाऊ लागल्यानंतर या धोरणात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार नगर विभागातील विनावाहक बसेसवर वाहकाचे लायसेन्स असणाऱ्या चालकांची नियुक्ती केली जाणार आहे. बसस्थानकावर वाहकाकडून तिकीट बुक केल्यानंतर पुढील प्रवासात मात्र हे काम चालक करणार आहेत. बसमध्ये जागा असल्यास रस्त्यावर हात करणाऱ्या प्रवाशांसाठी बस थांबणार आहे. या प्रवाशांना चालक तिकीट देणार असल्याचे सांगण्यात आले.

वाढीव मोबदला दिला जाणार का?

महामंडळाच्या या निर्णयामुळे वाहकाचे काम कमी होणार असले तरी चालकांचे काम मात्र वाढणार आहे. चालकास मध्येच गाडी थांबवून प्रवाशांना तिकीट द्यावे लागणार आहे. तसेच, या कामाचा हिशेब ठेवावा लागणार आहे. हिशेबात घोळ झाल्यास कारवाई होण्याचीही शक्यता आहे. या वाढीव कामाच्या मोबदल्याबाबत मात्र काहीच बोलले जात नाही. या कामासाठी वेगळा पगार दिला जाणार का, याबाबतही माहिती दिली जात नाही. महामंडळाचेच तसे धोरण असल्याची अपुरी माहिती अधिकाऱ्यांकडून दिली जात आहे. त्यामुळे या कामाचा वाढीव मोबदला दिला जाणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नगर विभागाने सुरू केलेल्या विनावाहक बसेसवर वाहकाचे लायसेन्स असणाऱ्या शंभर चालकांना नियुक्ती दिली जाणार आहे. याबाबत नियोजन झाले असून प्रत्यक्ष कार्यवाहीस लवकरच सुरुवात होणार आहे.

– अशोक जाधव, विभाग नियंत्रक

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *