facebook
Saturday , April 29 2017
Breaking News
Home / Featured / ऑस्कर म्युझियममध्ये भारताला स्थान

ऑस्कर म्युझियममध्ये भारताला स्थान

आवाज न्यूज नेटवर्क –

मुंबई – समाजातील त्या त्या काळाचे प्रतिबिंब म्हणून चित्रपट, माहितीपटांकडे पाहिले जाते. म्हणूनच हॉलिवूडमध्ये जुन्या चित्रपटांचे जतन केले जाते. ऑस्कर अकादमी यासाठी सातत्याने सजग असते. जगभरातील उत्तमोत्तम कलाकृतींना एका जागी आणण्यासाठी सध्या लॉस एंजल्स येथे सिनेमा संग्रहालय उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २०१८ मध्ये ते खुले होणार आहे. अकादमीतर्फे उभारल्या जाणाऱ्या या प्रतिष्ठीत संग्रहालयात भारतीय चित्रपटांनाही स्थान मिळणार आहे. भारताच्या नॅशनल फिल्म हेरिटेज मिशनचे सल्लागार उज्ज्वल निरगुडकर आणि अकादमीचे माइक पोगोरझस्की यांच्यात बोलणी झाली असून, अकादमीने यास तत्वतः मान्यता दिली आहे.

लॉस एंजल्स येथे तीन लाख चौरस फुटांवर उभारल्या जाणाऱ्या या संग्रहालयासाठी तब्बल ३० कोटी डॉलर खर्च करण्यात येणार आहे. जगभरातील उत्तमोत्तम चित्रपट, त्यांच्या पटकथा येथे ठेवण्यात येणार आहेत. अकादमीचे भारतातील समन्वयक व अर्काइव्ह हेरिटेज मिशनचे सल्लागार निरगुडकर यांनी काही दिवसांपूर्वीच अमेरिकेतील ऑस्कर अर्काइव्हला भेट दिली. त्यावेळी अकादमीतर्फे तत्वतः ही मंजुरी मिळाली. आता यापुढे माहिती व प्रसारण मंत्रालयामार्फत पुढील बोलणी लवकरच सुरू होतील. ऑस्कर अकादमीच्या फिल्म अर्काइव्हमध्ये एक कोटी फोटो, ८० हजार पटकथा, एक लाख ९० हजार सिनेमे व माहितीपट आदी ऐवज आहे. यातील निवडक गोष्टी या नव्या संग्रहालयात असतील.

सत्यजीत रे यांना मानवंदना

अकादमीच्या याच फिल्म अर्काइव्हमध्ये सत्यजीत रे यांच्या १७ सिनेमांना स्थान देण्यात आले आहे. रे यांना ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांचे चित्रपट अकादमीने स्वखर्चाने रिस्टोअर केले आहेत. त्यापैकी पथेर पांचाली, अपराजितो, अपूर संसार ही अपू ट्रायॉलॉजी यंदा गोव्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत दाखवण्यात येणार आहे. अकादमीने रिस्टोरेशन केलेले हे चित्रपट या निमित्ताने प्रथमच भारतात दाखवण्यात येणार आहेत.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *