facebook
Monday , February 27 2017
Breaking News
Home / Featured / शाळेने दिले ते केवळ अनमोल!

शाळेने दिले ते केवळ अनमोल!

आवाज न्यूज नेटवर्क –

औरंगाबाद – भाजपच्या ज्येष्ठ नेत्या व माजी केंद्रीय मंत्री जयवंतीबेन मेहता यांचे मुंबईतील निवासस्थानी निधन झाले. मेहता यांचे माहेर औरंगाबाद. त्यांचे शिक्षण शारदा कन्या प्रशालेत झाले. सरस्वती भुवन संस्थेच्या जन्मशताब्दी मेळाव्यानिमित्त १३ एप्रिल २०१४ रोजी त्या औरंगाबादला आल्या होत्या. यावेळी त्यांनी शाळेपासून ते राजकारणापर्यंतचा प्रवास भाषणातून मांडला. त्यांच्या या आठवणी त्यांच्याच शब्दांत…
बालपणी फुलपाखरांच्या मागे धावणारी मी. माहेरी संस्कारी वातावरणात वाढले. शाळेने दिलेले मूल्य, संस्कार व शिस्त यामुळे माझी जडणघडण झाली. शाळेतले दिवस, मैत्रिणी व शिक्षक आयुष्यभराची शिदोरी ठरले. म्हणूनच पत्नी, आई व राजकारणी या सर्व आघाड्यांवर मी यशस्वी ठरले. देशाच्या सामाजिक व सांस्कृतिक विकासाकरिता शिक्षण मातृभाषेत असायला हवे. राजकारणात मी महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करू शकले, ते माझ्या मराठीतल्या शिक्षणामुळेच.
बालपणी बाजारात फिरायला परवानगी नसायची. दुकानात जाऊन आपली साडी विकत घेण्याचीही परवानगी नव्हती. एकदा शाळेत पाऊल टाकताच मस्ती सुरू व्हायची. शाळेच्या बागेतली फुलपाखरे पकडण्यात मी आघाडीवर असायचे. शिक्षकांचा प्रचंड धाक होता. अभ्यासही शिस्तीत झालाच पाहिजे. आमच्या ग्रुपमध्ये प्रत्येकीला अभ्यास करणे आवडायचे, पण आमच्या मैत्रीत स्पर्धा नसायची. प्रत्येकीची स्वप्नांना आदर देणे आम्हाला जमले होते. मुक्तीसंग्रामावेळी एकाच वर्षी चार शाळा बदलाव्या लागल्या. शेवटी मी याच शारदा कन्या प्रशालेत परत आले. आता मला कुठेच जायचे नाही, मला याच शाळेत शिकायचे, असे वडिलांना स्पष्ट सांगितले.
शाळेतल्या प्रत्येक मैत्रिणी, प्रत्येक शिक्षक आजही जशाच तसे आठवतात. वैशंपायन मॅडम नऊवारी साडीत शिकवायला यायच्या. अस्सल भारतीय सौंदर्य व बुद्धीमत्ता यांचा तो संगमच होता. याच वातावरणात मी शिक्षण घेतले. म्हणून शाळा माझे दुसरे माहेर. जेव्हा औरंगाबादला येते, तेव्हा एकदा तरी शाळेमध्ये येते. माहेरचे संस्कारी वातावरण, शाळेने दिलेले मूल्य, संस्कार व शिस्त यामुळे माझी जडणघडण झाली. या शिदोरीने पत्नी, आई व राजकारणी या सर्व आघाडींवर मला यशस्वी केले. लग्न झाल्यानंतर मी मुंबईला आले. मुंबइची गर्दी व नातेवाईकांच्या गोतावळ्यात आपले कसे होणार, असे सारखे वाटायचे. माझे पती मात्र मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सभेला न्यायचे. त्यामुळे बाहेरच्या वातावरणात जाण्याची भीती कमी झाली. नंतर प्रत्यक्ष राजकारणात उतरले आणि प्रत्येक निवडणूक जिंकले. गुजराती भाषक असूनही मराठी शिक्षणाने लोकांचा विश्वास संपादन करता आला. प्रत्येक महाराष्ट्रीयन सण मी साजरा करायचे. मराठी जेवणही शिकले. संसदेतही मराठीतूनच प्रश्न मांडायचे. मातृभाषेतल्या शिक्षणामुळे लागणारी शिस्त आयुष्याच्या प्रत्येक प्रसंगी मदत करते. म्हणूनच मातृभाषेतील शिक्षण देशाच्या विकासासाठी आवश्यक आहे, यावर ठाम विश्वास आहे.
मुंबईला दिवंगत गोपीनाथ मुंडे व दिवंगत विलासराव देशमुख आणि आम्ही एकाच अर्पाटमेंटमध्ये राहायचो. पक्ष वेगळे असले, तरी मूळ मराठवाडा होता. राजकीय मतभेद असूनही वैयक्तिक संबंध जिव्हाळ्याचे होते. वैयक्तिक टीका करूनच राजकारण करता येते, ही आजची संकल्पना मला मान्य नाही. ही माझ्या आयुष्यभराची शिदोरी सतत माझ्या जवळ असते. या पलीकडेही आपली ओळख हवी, आपले स्वतंत्र अस्तित्व हवे. या शाळेने आम्हाला ओळख दिली, विचार दिले. म्हणूनच लग्नासाठीचे वधू संशोधन मराठवाड्यात येऊन थांबायचे. कारण इथल्या दुकानांवर लिहलेले होते, स्वस्त, सुंदर व टिकाऊ…कधी फुलपाखरांना पकडणारी मी माझ्या शाळेच्या शताब्दी महोत्सवात प्रमुख पाहुणी असेल, असे मला अजिबात वाटले नव्हते. शाळेने जे दिले ते केवळ अनमोल आहे.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *