facebook
Wednesday , December 7 2016
Home / Featured / ऐतिहासिक वारशांची नोंद गरजेची
dr-kirit

ऐतिहासिक वारशांची नोंद गरजेची

आवाज न्यूज नेटवर्क –

पुणे – ‘राजस्थान, मध्य प्रदेशनंतर तस्करांच्या टोळीची नजर महाराष्ट्राकडे वळणे, ही गंभीर बाब आहे. सरकारवर अवलंबून न राहता दुर्गम भागात फिरणाऱ्या गिर्यारोहकांनी तातडीने खेड्यापाड्यातील ऐतिहासिक वारशाचे फोटो काढून प्राथमिक माहिती गोळा केली पाहिजे. त्या विषयीचे पुरावे असतील तर, जगाच्या पाठीवर कोठेही गेलेली मूर्ती कायद्याने सन्मानाने परत आणता येईल,’ असे स्पष्ट मत ज्येष्ठ पुरातत्व संशोधक डॉ. किरीट मनकोडी यांनी व्यक्त केले.
अमेरिका आणि युरोपमध्ये तस्करी मार्गाने पोहोचलेली अब्जावधी रुपयांची शिल्पे डॉ. मनकोडी यांनी सन्मानाने मायदेशी परत आणली आहे. ‘मटा’मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘वारशाची चोरी’ या वृत्त मालिकेच्या निमित्ताने मनकोडी यांनी भारतीय शिल्पाकृती आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची माहिती विशद केली.
‘अपुऱ्या डॉक्युमेंटेशनचा गैरफायदा घेऊन आंतरराष्ट्रीय दलाल प्राचीन ठेव्याची चोरी करीत आहेत. मात्र, ही चोरी सिद्ध करण्यासाठी आवश्यक डॉक्युमेंटशनमध्ये आपण कमी पडतो. अनेक मूर्तींना वाली नसल्याने पोलिसांकडे चोरीची तक्रारही दाखल होत नाही. राजस्थान, मध्य प्रदेश, तमिळनाडू येथून काही वर्षांपूर्वीपर्यंत मोठ्या प्रमाणात मौल्यावान प्राचीन शिल्पे, दस्ताऐवजांची तस्करी होत होती. मंदिरांमधूनही दैवतांच्या मूर्ती चोरीला गेल्या आहेत. चोरलेली मूर्ती कुठे आहे, याची माहिती मिळाल्यावर मी तत्काळ संबंधित देशाकडे पत्रव्यवहार करून ती मूर्ती भारतीय असल्याचे पुरावे पाठवतो. कायद्याच्या मदतीने सतत पाठपुरावा केल्यामुळे आजपावेतो अमेरिका, युरोपातील अनेक संग्रहालयांतील, खाजगी संग्राहकांच्या वैयक्तिक खजिन्यातील, दलालांच्या दुकानात गेलेल्या मौल्यवान मूर्ती परत आणल्या आहेत. मात्र, वाढत्या तस्करीचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी सजग होण्याची गरज आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशमधील काही उत्साही गावकऱ्यांनी माझ्याकडून डॉक्युमेंटशन कसे करायचे याचे प्रशिक्षणही घेतले असून, गावपातळीवर त्यांचे काम सुरू झाले आहे,’असेही मनकोडी यांनी सांगितले.
महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत तस्करांचे लोन आले नव्हते. अन्य राज्यांपाठोपाठ तस्कर महाराष्ट्रात घुसले असण्याची शक्यता आहे. डॉक्युमेंटशनच्या बाबतीत सतर्क राहण्याशिवाय पर्याय नाही. पुरातत्व विभागाने प्राचीन वास्तू आणि शिल्पांच्या अधिकृत नोंदणी ठेवल्या पाहिजेत. त्याच वेळी खेड्यांमधील गावकरी, पंचायती, उत्साही तरुण मंडळींनी पुढाकार घेऊन स्थानिक पातळीवर ऐतिहासिक वारशांच्या नोंदीचा संग्रह केला पाहिजे, असा सल्ला मनकोडी यांनी दिला.
………………….
भारतातून तस्करी झालेल्या शिल्पकृती शोधण्यासाठी मी www.plunderedpast.in ही वेबसाइट सुरू केली आहे. या वेबसाइटवर प्रत्येक मूर्तीची माहिती आणि छायाचित्रे आहेत. जगभरात कोणालाही भारतातील शिल्पकृती चोरल्याची माहिती मिळाल्यास ती तपासून पाहण्यासाठी ही वेबसाइट मार्गदर्शक ठरते. विशेष म्हणजे यामुळे काही आंतरराष्ट्रीय दलालांनीही संपर्क साधून त्यांच्याकडील भारतीय मूर्तींची माहिती दिली आहे.
डॉ. किरीट मनकोडी
…………………………….
मनकोडी यांची लढाई सुरूच
– अमेरिकेच्या गृहखात्याच्या मदतीने दलालांच्या घरांवर छापे घालून, अब्जावधी रुपयांच्या भारतीय शिल्पकृती जप्त केल्या.
– अमेरिकेच्या गृहखात्याच्या मदतीने भारहूतची यक्षिणी साडेसहा फूट उंचीची एक अब्ज रुपये किमतीची मूर्ती परत आणण्यात यश.
– राजस्थानातील घटेश्वर मंदिरातील मंडपात कोरलेल्या छतावर आम्रवृक्षाखाली उभ्या असलेल्या महिलेची ११व्या शतकातील शिल्पकृतीही अचानक गायब झाली. डेनेव्हरच्या संग्रहालयातून ती कायदेशीररित्या परत मिळविली.
– राजस्थानातील एका मंदिराच्या पट्टीकेवरील २००९मध्ये गायब झालेली शिल्पे त्यांना २०१० मध्ये एका आंतरराष्ट्रीय मासिकात काही कोटी अमेरिकन डॉर्लसना विक्रीसाठी उपलब्ध असल्याची आढळली. अमेरिकन प्रशासनाच्या सहकार्याने या शिल्पकृती परत येण्याच्या मार्गावर आहेत.
– गुजरातमधील पाटणमधून २००१मध्ये चोरीला गेलेले शिल्प लंडनमधील एका वेबसाइटवर दिसले. पाठपुरावा करून गेल्या महिन्यात ते शिल्प परत आणण्यात यश आले.

Check Also

swapnil-shinde_2051

विविध कार्यक्रमांनी महामानवाला अभिवादन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६०व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मंगळवारी शहरात विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *