facebook
Thursday , April 27 2017
Breaking News
Home / कोल्हापूर / चित्रपट महामंडळात खर्चाचे कवित्व

चित्रपट महामंडळात खर्चाचे कवित्व

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक होऊन सात महिने लोटले तरी महामंडळातील राजकारणाचे कवित्व अजूनही संपायला तयार नाही. महामंडळाच्या निवडणुकीसाठी अंदाजपत्रकात सात लाखांची तरतूद केलेली असताना सुमारे १५ लाख खर्ची पडले आहेत. हा खर्च कुणाच्या संमतीने केला? अन्य संचालकांना त्याची माहिती होती का?अशी विचारणा करणारी नोटीस महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांनी गेल्या कार्यकारिणीतील १४ संचालकांना पाठविली आहे. निवडणूक खर्च ही प्रशासकीय बाब असताना संचालकांकडे विचारणा कशासाठी? अशी भूमिका माजी संचालकांनी घेतल्याने महामंडळातील राजकारण पुन्हा एकदा रंगण्याची चिन्हे आहेत.

महामंडळाच्या १४ संचालकांच्या कार्यकारिणीसाठी एप्रिल २०१६ मध्ये निवडणूक झाली होती. या निवडणुकीत नऊ पॅनेल आणि ११५ उमेदवार​ रिंगणात होते. मागील निवडणुकीतील मर्यादित उमेदवार व पॅनेलची संख्या विचारात घेत माजी अध्यक्ष विजय पाटकर यांच्या नेतृत्वाखालील कार्यकारिणीने २०१६ मधील निवडणुकीसाठी सात लाखांची तरतूद केली होती. जानेवारी २०१६ मध्ये झालेल्या महामंडळाच्या सभेने त्या अंदाजपत्रकाला मंजुरी दिली. प्रत्यक्ष निवडणुकीत मतदानप​त्रिका, कर्मचारी, मतदान आणि मतमोजणी अशा विविध कामासाठी​ जादा यंत्रणा कार्यान्वित करावी लागल्याने निवडणुकीचा खर्च १५ लाखापर्यंत पोहचला. निवडणुकीत महामंडळात सत्तांतर झाले. अध्यक्ष मेघराज भोसले यांनी अंदाजपत्रकात सात लाखांची तरतूद असताना पंधरा लाख रुपये कुणाच्या संमतीने खर्ची पडले या संदर्भात जुन्या कार्यकारिणीला नोटीस काढली.

१४ जणांना नोटिसा

महामंडळाचे माजी अध्यक्ष विजय पाटकर, माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर, तत्कालिन खजीनदार सतीश बीडकर, कार्यवाह सुभाष भुरके, संजीव नाईक, अनिल निकम, अलका आठल्ये, प्रसाद सुर्वे, विजय कोंडके, सतीश रणदिवे, प्रिया बेर्डे, इम्तियाज बारगीर, सदानंद सूर्यवंशी, बाळकृष्ण बारामती यांना नोटीसा काढल्या आहेत. बहुतांश माजी संचालकांनी नोटिसीला उत्तर पाठविले नाही. निवडणूक खर्च ही प्रशासकीय बाब असून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या अखत्यारित ही प्रक्रिया होते, असे माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांनी म्हटले आहे. महामंडळाच्या आगामी सर्वसाधारण सभेत त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

निलंबित कर्मचारी पुन्हा कामावर

महामंडळाच्या पुणे कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला जुन्या कार्यकारिणीने पैशाच्या गैरवापरावरून निलंबित केले होते. सुमारे साडेचार लाखाचा गैरव्यवहार केल्याचे या कर्मचाऱ्याने कबूल केले होते. त्याची चौकशी सुरू आहे. ​दरम्यान विद्यमान अध्यक्ष व संचालकांनी त्या कर्मचाऱ्याला पुन्हा कामावर घेतले आहे. कोल्हापूर येथील मुख्य कार्यालयात त्याची बदली केली आहे.

सत्ताधाऱ्यांतही धुसफूस

सध्या चित्रपट महामंडळात अध्यक्ष मेघराज भोसले यांचे वर्चस्व आहे. निवडणुकीत भोसले व सतीश रणदिवे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला १४ पैकी बारा जागा मिळाल्या. मात्र सात महिन्याच्या कालावधीतच सत्ताधाऱ्यांत धुसफूस सुरू आहे. संचालक सतीश रणदिवे, पितांबर काळे, विजय खोचीकर हे अध्यक्ष भोसले यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याचे वृत्त आहे.

सध्याचे अध्यक्ष हे महामंडळाच्या हितापेक्षा राजकारणच जास्त करत आहेत. निवडणूक खर्चाबाबत जुन्या संचालकांना नोटीस पाठविण्याचे कारणच काय? सर्वसाधारण सभेपुढे विषय मांडून वाढीव खर्चाला रितसर मान्यता घेण्याऐवजी अध्यक्ष नको ते उद्योग करत आहेत.

माजी अध्यक्ष विजय पाटकर

निवडणुकीसाठी वाढीव खर्च कुणाच्या संमतीने केला हे जुन्या कार्यकारिणीतील अनेक संचालकांना माहीत नाही. महामंडळाच्या खर्चाची माहिती संचालकांना व्हावी यासाठी वाढीव खर्चाची माहिती मागवली आहे. लवकरच जुन्या संचालकांसोबत बैठक घेऊ.

मेघराज भोसले, अध्यक्ष, चित्रपट महामंडळ

Check Also

वाहतूकदारांचा शुल्कवाढीला विरोध

केंद्रीय मोटार वाहन नियमांतील विविध शुल्कात पाचपट वाढ केल्याच्या निषेधार्थ बुधवारी कोल्हापूर डिस्ट्रीक्ट लॉरी ऑपरेटर्स …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *