facebook
Wednesday , April 26 2017
Breaking News
Home / नाशिक / मिळकत सर्वेक्षणाचे शुक्लकाष्ट संपेना

मिळकत सर्वेक्षणाचे शुक्लकाष्ट संपेना

महापालिकेच्या मिळकत सर्वेक्षणामागे लागलेले शुक्लकाष्ट संपत नसल्याचे चित्र आहे. विविध अडचणींमुळे दोन वर्षांपासून कात्रीत सापडलेल्या मिळकत सर्वेक्षणाला स्थायी समितीने हिरवा कंदील दाखवला होता. खडखडाट झालेल्या महापालिकेच्या तिजोरीला संजीवनी देणाऱ्या या मिळकत सर्वेक्षणाचा विषय प्रशासनानेही तातडीने मार्गी लावला होता. मात्र, महापालिका निवडणुकीसाठी मतदारयाद्या फोडण्यासाठी करसंकलन विभागाचे सर्व कर्मचारी निवडणूक शाखेने पळविल्याने आता पुन्हा हे सर्वेक्षण लटकले आहे. निवडणुकीच्या कामांमुळे अगोदरच वसुलीला ओहोटी लागली असताना आता पुन्हा कर्मचारी पळविल्याने वसुलीची प्रक्रिया ठप्प होणार आहे.

शहरातील अनेक मिळकतींची नोंद महापालिकेकडे झालेली नाही, तर अनेक मिळकतींची नोंदणी निवासीसाठी असताना त्याचा वापर व्यावसायिक कारणासाठी केला जात आहे. त्यामुळे शहरातील सर्व मिळकतींचा सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी निविदाही काढण्यात आल्या. मात्र, स्पेक वीक या कंपनीने संबंधित काम अर्ध्यावर सोडले. त्यानंतर पुन्हा ही प्रक्रिया सुरू करण्यात आली. निविदाप्रक्रियेला प्रतिसादच मिळाला नव्हता. त्यामुळे तीनदा निविदाप्रक्रिया राबविल्यानंतर आता दिल्लीतल्या जीओ इन्फोसिस या कंपनीला मिळकत विभागाचे काम देण्यात आले. त्यासाठी चार कोटींची तरतूदही करण्यात आली. या संपूर्ण प्रक्रियेला जवळपास दोन वर्षांचा कालावधी गेल्यानंतर आता कुठे या सर्वेक्षणाचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र, या सर्वेक्षणाला पुन्हा महापालिका निवडणुकीचा फटका बसला आहे. मिळकत सर्वेक्षणासाठी कंपनीतर्फे १५० पथके तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकात करसंकलन विभागाचा एक कर्मचारी असणार आहे. करसंकलन विभागाकडे ११९ कर्मचारी असून, त्यांना या सर्वेक्षणासाठी मदत घेतली जाणार होती. मात्र, निवडणूक शाखेने या सर्व कर्मचाऱ्यांना आता मनपा मतदार याद्या फोडण्याचे काम सोपविल्याने हे मिळकत सर्वेक्षण पुन्हा लटकले आहे. अगोदरच जानेवारीपासून हे कर्मचारी मतदार याद्या तयार करण्याचे काम करीत होते. पुन्हा त्यांना त्याच कामासाठी लावल्याने आता सर्वेक्षणाचे काम पुन्हा तीन ते चार महिन्यांसाठी लटकले आहे.

वसुलीत मोठी घट

चालू वर्षाची घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीत मोठी घट झाली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरपर्यंत घरपट्टी वसुली ५३ कोटी झाली होती. मात्र, चालू वर्षी ही वसुली ४७ कोटी झाली असून, गेल्या वर्षीपेक्षा हा घाटा सहा कोटी दहा लाखांचा झाला आहे. गेल्या वर्षी पाणीपट्टीतून पालिकेला १८ कोटी रुपये मिळाले होते. चालू वर्षी नोव्हेंबरपर्यंत ही रक्कम ११ कोटींपर्यंतच वसूल झाली आहे. पुढील तीन ते चार महिने निवडणुकीच्या कामामुळे वसुली होणे शक्य नाही.

तिजोरीत खडखडाट

स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांसह विकासकामांसाठी सर्वाधिक हातभार हा घरपट्टी व पाणीपट्टीच्या वसुलीतून येणार आहे. मात्र, आता ही वसुलीच ठप्प झाल्याने त्याचा थेट परिणाम विकासकामांसह स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांवर होणार आहे. तिजोरीत वसुलीत पैसेच येणार नसल्याने तिजोरीत खडखडाट राहणार आहे, तसेच प्रशासनाचा कारभार हाकण्यासाठी लागणारा निधी याच वसुलीतून येतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारावरही त्याचा परिणाम होणार आहे.

Check Also

मार्केट फुलले; चेहरे उतरले

रविवारच्या साप्ताहिक सुटीनंतर सोमवारी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे येवला मुख्य बाजार आवार लाल कांदा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *