facebook
Sunday , April 30 2017
Breaking News
Home / पुणे / मोर्च्यांच्या धसक्यानेच ‘युती’

मोर्च्यांच्या धसक्यानेच ‘युती’

राज्यात निघालेल्या मराठा मोर्च्यांचा धसका घेतल्यानेच भाजप-शिवसेनेने पंचायत समिती, नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये युती केल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी केली. ‘देशाच्या इतिहासात मराठा मोर्च्यासारखे इतके शिस्तबद्ध मोर्चे निघालेले नाहीत. मात्र, जातीचा हा विचका मंडल आयोगामुळे झाला आहे. प्रत्येकजण एकमेकांकडे जातीने बघायला लागला आहे. मी जात मानत नाही, तुम्हीही मानू नका,’ असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गणेश कला क्रीडा मंच येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना ठाकरे यांनी भाजप-सेनेच्या युतीवर टीका केली. ‘मराठा मोर्च्यांचा धसका घेतल्यामुळेच ही युती झाली असून, मनापासून झालेली नाही. कोणी कोण्याच्याही जातीसाठी काहीही करत नाही. हे सगळे निवडणुकीसाठी वापर करून घेतील, बाकी काहीही नाही,’ असा टोलाही त्यांनी लगावला. ​
……
विकला जाणारा राज ठाकरे नाही
पाक कलाकारांचा समावेश असलेल्या चित्रपटांना विरोध केला, तर राज ठाकरेंनी मांडवली केल्याची टीका सुरू केली. पाक कलाकार असलेल्या चित्रपटांना मी आधीपासूनच विरोध केला होता. ​आता विरोध केला; कारण तो चित्रपट लागणार होता. निवडणुकांच्या तोडांवर विरोध केला असे कसे म्हणता. या भिकारड्यांच्या हातून विकला जाणारा राज ठाकरे नाही, अशी टीका त्यांनी या वेळी केली.
ते फेरीवाले, कधी या तर कधी त्या फूटपाथवर​
निवडणुकांचे वारे सुरू झाले असून अनेकांना तिकीट मिळण्याचे स्वप्न पडत आहे. मात्र, माझ्या भागाचा विकास करेन, असे कोणाला स्वप्न पडत नाही. निवडणुकीच्या तोंडावर इकडे तिकडे उड्या मारण्यास सुरुवात झाली आहे. यांना मी फेरीवाले नाव ठेवले आहे, अशी टीका ठाकरे यांनी या वेळी केली. पुणे महानगरपालिकेतील मनसेच्या तीन नगरसेवकांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला असल्याची किनार त्यांच्या या टीकेला होती. निवडून आले की हे दुकानदारी करतात आणि निवडणूक आली की फेरीवाले होतात. आज या फूटपाथवर उद्या त्या फूटपाथवर अशी यांची अवस्था असते. यांच्या घरच्यांना तरी काय वाटत असेल, असा टोला ठाकरे यांनी लगावला.
…….
मराठा नाहीतर मराठी म्हणून अन्याय?
विशेष पोलिस ​महानिरीक्षक विठ्ठल ​जाधव यांची बातमी वाचली. मराठा असल्याने त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अन्याय कोणी केला हे वाचत होतो तर ते नाव ‘माथूर’ होते. जाधव तुमच्यावर अन्याय मराठा म्हणून नाही तर मराठी म्हणून झाला असेल. कारण आपली ओळख मराठी आहे, असे ठाकरे म्हणाले.

अणे नावाचे ‘पाप्याचं पितर’
‘बेळगावात सीमाभागात आपल्या बांधवांना मारले जाते आहे, पकडले जाते आहे ते मराठी म्हणून होत आहे. या मराठी बांधवांना माझे सांगणे आहे की, हा विषय केंद्र सरकार सोडवील. त्या भागात राहत असताना त्यांचा जो कुठला दिन असेल तो काळा दिन म्हणून साजरा करू नका. महाराष्ट्रात जर महाराष्ट्र दिनाला कोणी काळा दिन म्हणून साजरा करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना कानफडवेल. अणे नावाचे ‘पाप्याचे पितर’ आले होते. विदर्भ स्वतंत्र करायचा म्हणे,’ अशा शब्दांत ठाकरे यांनी समाचार घेतला.
….
दर वर्षी दोन लाख विद्यार्थी पुण्यात
पुण्यात दरवर्षी दोन लाख परप्रांतीय विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. त्यातील ८० हजार विद्यार्थी पुण्यातच वास्तव्य करतात. अशा प्रकारे महानगरपालिकांची लोकसंख्या वाढत आहे. कुठपर्यंत या पालिका पुरणार आहेत. एकट्या ठाणे जिल्ह्यात सात महानगरपालिका आहेत. देशात ठाणे हा असा जिल्हा आहे की ज्यात देशभरातून सर्वाधिक लोक येत आहेत. मराठी तरुणांना येथे नोकऱ्या मिळत नाहीत. येथील शहरे बकाल होत आहेत आणि आपण भांडत आहोत, असेही ठाकरे म्हणाले.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *